सुचित्रा साठे

भाग्यात लोकप्रियता असल्यामुळे पन्हं घराबाहेरही रमतं. पण आंब्याची डाळ मात्र घरातच  घोटाळणे पसंत करते. तशी आंब्याच्या डाळीची प्रकृती नाजूकच. आंब्याच्या डाळीने तीन-चार तासांपेक्षा जास्त पाण्यात मुक्काम केला तर वेगळा उग्र ‘वास’ येऊ लागतो.  त्यामुळे घडय़ाळाकडे लक्ष ठेवून तिला चाळणीत उपसून ठेवावे लागते. पाणी राहता कामा नये, नाहीतर पचपचीत होऊ शकते.

खरं तर निसर्गातली ‘रंगपंचमी’ डोळ्यांना सुखावत असते. आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती ‘रंग’ पालटून लक्ष वेधून घेत असते. तरीसुद्धा हातगाडीवरचे अपायकारक नसलेले ‘रंगांचे’ चिमुकले डोंगर पोखरून ‘रंग’ घरी आणले जातात. प्रेमाने लावले जातात, तेव्हा कुठे मनातली होळी शांत होते. ही शांतता घरामधील विद्यार्थीदशेला अभ्यासात गुंतवून ठेवते. त्या गांभीर्याने शिशिर हळूच काढता पाय घेतो. ही संधी साधत सूर्याच्या सोनपिवळ्या उष्ण प्रकाशाला अनुभवण्याच्या मोहाने वृक्षवल्ली पल्लवित होऊ लागतात, मोहरतात. नवसृजनाच्या नांदीचे सूर आसमंतात निनादू लागतात. हिरव्या बाळकैऱ्या वाऱ्याची मर्जी राखत हिंदोळत राहतात. ते हिरवं चैतन्य हळूच घराघराचे दरवाजे ठोठावतं. शाळांच्या परीक्षाही अखेरच्या टप्प्यावर असतात. त्यामुळे साहजिकच ‘या..’ म्हणत त्या हिरव्या बाळांना थेट स्वयंपाकघरात प्रवेश दिला जातो.

उन्हाळा जाणवायला लागलेला असतो. घामाच्या धारा बेचैन करत असतात. अशा वेळी स्वयंपाकघरातले ते हिरवे पाहुणे आपलं महत्त्व कानात सांगतात. त्यांच्या गुणधर्माचे पोवाडे गायले जातात. ‘क’ वर्गातला असूनही ‘अ’ वर्गातल्या शहाण्या मुलासारखा कसा झाला, हे पटविले जाते. ‘त्रास’ न देता ‘चव’ कशी आणतो याचा पाढा वाचला जातो. चैत्र त्याचं तोरण बांधूनच उभा राहतो. शिवाय गौर माहेरपणाला, तृतीयेला येणारच असते. मग काय हाच मुहूर्त साधून गौरीची घरातील देव्हाऱ्यात वेगळ्या चांदीच्या कमळात स्थापना केल्यावर तिच्या नैवेद्याचा प्रश्न चुटकीसारखा सुटतो, नव्हे प्रश्नच नसतो. हिरव्या कैऱ्यांच्या उपस्थितीची विशेष दखल घेत आंब्याची डाळ आणि पन्ह्यची काही काळासाठी ‘युती’ पक्की होते.

आंब्याची डाळ आणि पन्हं अशी जरी जोडी जमली असली तरी पन्ह्यचा स्वभाव फारच गोड, अल्पावधीत सगळ्यांचं प्रेम संपादन करतो. घरातल्यांचे डोहाळे पुरवले की पन्ह्यला घराबाहेर डोकवायचे वेध लागतात. कोणताही समारंभ, वसंत व्याख्यानमाला, लग्नकार्य, सगळीकडे स्वत:ची वर्णी लावून घेतो. घरांत चांदीच्या भांडय़ातून किंवा चांदीच्या वाटीतून खानदानी श्रीमंती उपभोगतो. बाहेर काचेच्या ग्लासची अपेक्षा ठेवतो. पण अपेक्षाभंगच पदरी पडतो. जीव नसलेल्या हलकुडय़ा कागदी ग्लासांची खास सोय केलेली असते. परंतु त्याचा म्हणजे पन्हय़ाचा कल ‘जड’त्वाकडे, परिणामी सांडलवणाची भीती बाळगत हातात संभाळून राहण्याची धडपड केली जाते. जरा बोटांनी ग्लासवर दाब दिला गेला तर नाइलाजास्तव ग्लासच्या बाहेर डोकावंच लागतं ना! ओठाला लावून पोटात जाऊन बसलं की थंड होतो. ‘इथे केशर वेलचीयुक्त थंडगार पन्ह मिळेल,’ असा बोर्ड तिरका उभा ठेवून समोर स्वत:ची हजेरी लावली की हां हां म्हणता भांडय़ाचा तळ गाठत क्षुधाशांती  करता येते. तरतरी वाटण्याचं गणित तर मांडायलाच नको.

भाग्यात लोकप्रियता असल्यामुळे पन्हं घराबाहेरही रमतं. पण आंब्याची डाळ मात्र घरातच  घोटाळणे पसंत करते. तशी आंब्याच्या डाळीची प्रकृती नाजूकच. आंब्याच्या डाळीने तीन-चार तासांपेक्षा जास्त पाण्यात मुक्काम केला तर वेगळा उग्र ‘वास’ येऊ लागतो.  त्यामुळे घडय़ाळाकडे लक्ष ठेवून तिला चाळणीत उपसून ठेवावे लागते. पाणी राहता कामा नये, नाहीतर पचपचीत होऊ शकते. पूर्वी मिक्सर नसण्याच्या काळात खलबत्त्यातच तिला चांगला व्यायाम घडवला जायचा. वेगवेगळ्या आकाराचे असंख्य ‘कण’ तयार व्हायचे. ‘र्अध बोबडं’ रूप असं त्याचं बारसंही व्हायचं. आता मात्र मिक्सरमुळे एकदम गुळगुळीत (की गिळगिळीत) अशा रूपात भिजलेल्या डाळीचा कायापालट होतो. कारण पाणी घातल्याशिवाय मिक्सर ‘न’ फिरण्याचे आडमुठे धोरण स्वीकारत असतो. कधी कधी तर भिजलेल्या डाळीचे काही अख्खे दाणे तसेच राहतात, बारीक व्हायला राजी नसतात. म्हणजे अगदी दोन टोकाचं परिवर्तन, पूर्ण बारीक नाहीतर असहकार. परंतु मिक्सरमध्ये डाळीत पाणी न घालता, मिक्सर जरासा फिरवायचा, पुन्हा चमच्याने ढवळायचं, असं करत राहिलं तर डाळ व्यवस्थित गरबरीत वाटली जाते. अशा वाटलेल्या डाळीत भरपूर ओलं खोबरं घातलं की ती गोडसर सात्त्विक होते. मग त्यात मीठ, साखर, हिरव्या कुटुंबाच्या सदस्यांमधील बारीक वाटलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किसलेली कैरी घालायची. वाळलेल्या लाल मिरच्या, कढीलिंब घातलेली मोहरी, जिरं, हिंग हळद घातलेली गार फोडणी कालवली की झाली. आंब्याची डाळ तयार. पिवळ्या उन्हाचा रंग ल्यालेल्या डाळीचे रूप तर मोहकच, पण कैरीची लागणारी चव जिभेवर रेंगाळणारी. केळीच्या फाळक्यावर विसावली ना तर तिची दृष्टच काढायला हवी.

अक्षय तृतीयेपर्यंत गौरीचा पाहुणचार म्हणून तिचे अगदी हक्काचे दिवस. या दिवसात कधी जेवणाच्या पानांत ती कोशिंबिरीची जागा पटकावते. मधल्या वेळी खायला केली तर नको कोणी म्हणेल का? चैत्रातलं हळदीकुंकू डाळ आणि पन्ह्यशिवाय कधी साजरंच होत नाही. पण तिथे ‘लिमिटेड’ मिळाल्यामुळे जीव जास्तच जडतो. घरी मात्र आपला हात जगन्नाथ. ‘कच्ची’ म्हणून काहीजण तिच्यापासून जरा संभाळून राहतात. एकाच दिवशी खूप करून ठेवू, म्हणूनही चालत नाही. तिचा ‘चांगुलपणा’ तीन चार तासांपेक्षा जास्त टिकत नाही. जरा जरी ‘वास’ आला तरी मग तोंडात घालण्याची इच्छा होणार नाही, एकदम तिची घसरगुंडीच.

एक मात्र उपाय आहे, उरली तर परतून ‘वाटल्या डाळीत’ रूपांतर करता येतं. केवळ फुकट जाऊ नये म्हणून ही सोय. पण मजा नाही. शिवाय नाराजीनं करावं लागणारं वाढीव काम.

त्यापेक्षा सर्वसाधारणपणे घरीच आढळणारा हा सिझनल ‘घरेलू’ पदार्थ अनेकदा करावा. त्याच्या जोडीला कैरीचं पन्हं करावं. एकदा किंचितशा तिखट आंब्याच्या डाळीचा घास घ्यावा, त्यावर पन्ह्यचा गोड घोट घ्यावा. पुन्हा डाळ, पुन्हा पन्हं.. संपेपर्यंत..

suchitrasathe52@gmail.com