व्यावसायिक मालमत्ता आणि उत्पन्न

जागेमध्ये गुंतवणूक करून त्यामधून चांगला परतावा मिळवणे हा एक लोकप्रिय अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय आहे.

जतीन सुरतवाला

जागेमध्ये गुंतवणूक करून त्यामधून चांगला परतावा मिळवणे हा एक लोकप्रिय अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय आहे. परंतु ही गुंतवणूक नेमकी  कशी आणि कुठे करावी, कोणत्या प्रकारच्या जागेमध्ये करावी हा एक अभ्यासाचा विषय आहे.

जागेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तीन पर्याय आहेत :

१) प्लॉट किंवा मोकळ्या जागेतील गुंतवणूक.

२) निवासी जागेतील गुंतवणूक

३) व्यावसायिक जागा जसे की- ऑफिसेस, दुकान, शोरूम, रिटेल जागा अशा

व्यावसायिक जागेमधील गुंतवणूक.

वरील गुंतवणुकीच्या प्रत्येक पर्यायांमधील गुंतवणुकीसाठी लागणारी रक्कम व त्यावरील मिळणारे परतावे हे वेगवेगळे आहेत. या लेखातून आपण व्यावसायिक जागेमधील  गुंतवणूक, त्याकरिता  लागणारे  भांडवल व  त्यावरील परतावा याविषयीची माहिती जाणून  घेणार आहोत. पूर्वी असा समज होता की, व्यावसायिक जागेमध्ये गुंतवणूक करण्याकरिता  मोठे भांडवल लागते, यामधील गुंतवणूक हे केवळ मोठे गुंतवणूकदारच करू शकतात व या मानसिकतेमुळे मध्यमवर्गीय गुंतवणूकदार हा निवासी जागेमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य  देत असे. परंतु आता या विचारसरणीत बदल होत आहे. सामान्य मध्यमवर्गीय गुंतवणूकदारसुद्धा व्यावसायिक जागेमध्ये गुंतवणूक करून अधिक  प्रमाणात परतावा मिळवू  शकतो या मान्यतेकडे  कल वाढत चालला आहे.

आपल्याला माहीतच आहे की भारतात शहरीकरण वेगाने वाढत चालले आहे. वाढत्या  शहरीकरणामुळे  निवासी आणि व्यावसायिक  संकुलांची मागणी सातत्याने वाढत आहे. दुकान, ऑफिसेस यांची संख्यादेखील तेवढीच  आवश्यक आहे. युवावर्गाचे उत्पन्न आणि त्यांची  खर्च करण्याची क्षमता लक्षात घेता अनेक नव्या  व्यवसायांना संधी उपलब्ध होत आहेत. याचबरोबर व्यावसायिक जागेतील गुंतवणुकीसाठीही संधी उपलब्ध होत आहेत. छोटे व्यावसायिक, आयटी स्टार्टअप कंपनी यांना व्यवसाय चालू करण्यास जागेची गरज असते. परंतु भांडवलाचा अभाव असल्याने ते  स्वत: जागेत गुंतवणूक न करता भाडेतत्त्वावर  जागा घेण्यास प्राधान्य देतात. म्हणूनच व्यावसायिक जागेत गुंतवणूक करून आपली जागा अशा व्यावसायिकांना किंवा स्टार्टअपला  भाडेत्त्वावर देणे हा अतिरिक्त उत्पन्न म्हणून  मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांकरिता चांगला पर्याय  आहे. भाडेस्वरूपातील वार्षिक परतावा हा जागेच्या  किमतीच्या अंदाजे ६ ते ७ टक्क्यांपर्यंत मिळतो व कालांतराने तो वाढत जातो़. जो निवासी जागेतून  मिळत असलेल्या भाडय़ाच्या २ ते ३ पट अधिक  आहे. तसेच  आरबीआयने  बदल केलेल्या  नियमांनुसार व्यावसायिक लोन कमी व्याजदरात  म्हणजे ८ ते ९ टक्के व्याजदरात उपलब्ध होत आहेत. गुंतवणुकीसाठी फक्त २० टक्के रक्कम ही स्वत:ची असणे आवश्यक आहे. उर्वरित ८० टक्के रक्कम कोणतीही बँक किंवा वित्तसंस्था देऊ शकतात.

 गुंतवणूकदारास मिळत असलेल्या भाडय़ामुळे बँकेच्या हप्त्यांचा भार जास्त येत नाही. बँकेला  दिलेल्या व्याजावर आयकरामध्ये सूट मिळते. तसेच आयकराच्या नियमानुसार मिळालेल्या भाडे  स्वरूपातील मोबदल्यावर मेन्टेनन्स आणि रिपेअर अशी मिळून ३० टक्के स्टॅंडर्ड वजावट मिळते. जर  आपण या गुंतवणुकीवरील परताव्याचा खूप बारीक विचार केला तर हा परतावा खूपच  अधिक प्रमाणात मिळू शकतो असे जाणवेल.

गुंतवणूक करताना काही बाबी आवर्जून तपासून व माहिती करून घ्याव्या, जर आपण  कोणत्या बांधकामाधीन व्यावसायिक जागेत गुंतवणूक करत असाल तर ज्या विकासकाकडून  आपण ही जागा विकत घेताय त्याचा ट्रॅक रेकॉर्ड  तपासून घ्यावा, ताबा  सांगितलेल्या मुदतीत  मिळेल त्याची खात्री करून घ्यावी. इमारतीची देखभाल कोण व कशा प्रकारे करणारआहे याची सविस्तर माहिती घ्यावी. कारण इमारतीची निगा नीट राखली गेली नाही तर भाडेकरू मिळण्यास अडचणी येऊ शकतात. जिथे व्यावसायिक जागा घेत आहेत त्याचे ठिकाण, संपर्कसाधने व तेथे भाडे तत्त्वावर घेणारे  संभाव्य भाडेकरू कोण असू  शकतात याची माहिती करून घ्यावी. शक्यतो चांगल्या ठिकाणी नावाजलेल्या विकासकाच्या ‘ए’ दर्जाच्या व्यावसायिक जागेत गुंतवणूक करणे सुरक्षित व फायद्याचे ठरू शकते.

मराठीतील सर्व वास्तुरंग ( Vasturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Commercial assets income business profit ysh

Next Story
गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी