सरकार, समाज, वसाहती आणि इतर कुणी कुणी काय काय करावं याविषयी आपल्या ठाम समजुती असतात. आपल्या घरात केलेले काही छोटे बदल मोठे ठोस परिणाम घडून येतात. गरज आहे स्वत:पासून, आपल्या घरापासून सुरुवात करायची.
सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे. कोण कुठून, किती कष्टाने पाणी भरतो आहे याच्या बातम्या सारख्या टी.व्हीवर दिसत आहेत. मी जागरूकपणे पाणी वापरतो. भांडी विसळलेलं पाणी घराच्या रोपांना वापरतो. पाणी वाचवण्याची प्रत्येक पद्धत मी घरात अवलंबायचा प्रयत्न करतो.
कपडे धुण्याचं दुष्टचक्र
एक गोष्ट सारखी माझ्या डोक्यात संताप आणायची – घरात चालणारं कपडे धुण्याचं यंत्र. त्यातही पाणी वाचवण्यासाठी मी कपडे साठवून, वेगवेगळे करून आठवडय़ातून एक-दोनदाच धुतो. यंत्र जेव्हा वापरायचं तेव्हा ते पूर्ण क्षमतेनेच वापरायचं हा कटाक्ष पाळतो. मात्र तरीही प्रत्येक कपडे धुण्याच्या वेळेला ड्रेन होणारं प्रचंड पाणी जिवाचे लचके तोडायचं. या पाण्याचं काय करता येईल, त्याचा कसा पुनर्वापर करता येईल याचा विचार करायला लागलो.
एक दिवस विचार केला, जेव्हा सुचायचा तेव्हा मार्ग सुचेल तोपर्यंत ड्रेन होणारं पाणी बादलीत साठवून ठेवायचं. ड्रेन-पाइप बादलीत सोडला. धुण्याच्या एका घाण्यातच एक-दोन नाही तर चांगल्या सहा-सात बादल्या भरल्या. ते सारं पाणी बाथरूमात भरलेलं पाहून मी थक्कझालो. आठवडय़ाभरच्या कपडय़ांच्या धुण्यासाठी धुलाई यंत्राने वापरलेलं ते पाणी रोज हाती कपडे धुण्याच्या तुलनेने कमीच होतं. नक्कीच. मात्र तरी ते फारच जास्त होतं हे नाकारता येत नाही. मग एक कल्पना सुचली. हे पाणी शौचालयात वापरलं तर?
लगोलग अंमलबजावणी सुरू केली. शौचालयात प्रत्येक वापरानंतर चक्क बादलीने फ्लशच्या टाकीत पाणी ओतायचा उद्योग सुरू केला. चांगलं तीन-एक दिवस ते पाणी पुरलं – शौचालयात चांगलं पिण्यायोग्य पाणी वापरण्यापेक्षा हे पाणी वापरणं हा उत्तम पर्याय ठरला. काही वाचकांना हे गलिच्छ वाटेल, अगदी मलादेखील वाटलं सुरुवातीला. मग एक फरक लक्षात आला. या सगळ्या पाण्यात धुण्याच्या साबणाचा अंश असल्याने प्रत्येक फ्लशसोबत माझ्या शौचालयाची स्वच्छता साबणाच्या पाण्याने होत होती.
प्रत्येक वेळी बादलीने फ्लशची टाकी भरण्याची खटपट करण्याला माझी तयारी आहे. मात्र प्रत्येकाला हे शक्य होईलच असं नाही. मी एक कल्पना लढवली. आमच्या शौचालयात थोडय़ा जागेत मी एक १५० लीटरची टाकी आणि त्यात एक छोटा पंप – जो घरच्या वॉटर कूलरमध्ये पाणी फिरवायला वापरतात तो ठेवला. एकूण खर्च ६०० रुपये. धुलाईयंत्राच्या ड्रेनपाइपमधलं पाणी बादलीत पडलं की ते पाणी या छोटय़ा पंपाच्या साहाय्याने मोठय़ा बादलीत भरण्याची व्यवस्था केली आहे. धुणं धुवून झालं की हा पंप मोठय़ा टाकीत सोडतो. हवं तेव्हा पंप एक-दोन मिनिटं चालवला म्हणजे फ्लशची टाकी भरते. मी माझ्या घरात महिन्याला पुनर्वापराच्या माध्यमातून जवळ जवळ ४५० लिटर पाण्याची बचत करतो आहे. यापुढे आंघोळीच्या पाण्याचा कसा पुनर्वापर करता येईल याचा विचार करतो आहे. मोठय़ा कुटुंबांत रोज किंवा दिवसाआड धुणं धुवायला लागत असेल तर धुण्याच्या पाण्याच्या पुनर्वापरातून किती पाण्याची बचत होईल याचं गणित करा बरं?
कचऱ्यातून कडधान्य
वाचकहो, हे मला मान्य केलं पाहिजे की, हा शोध गरजेतून किंवा प्रयत्नांतून नाही तर एका खटय़ाळ वेडातून झाला. माझ्या घरी छोटी, सुबक कुंडीतली बाग आहे. ही बाग नीट ठेवणं हा माझा छंद आहे आणि त्यासाठी मी अनेक प्रयोग करत असतो. प्रत्येक नवं रोप लावताना कुंडीत आधी मी घरच्या कचऱ्यापासून खत तयार करतो, कुंडी पाऊण भरली की त्यात रोप लावतो. मग हळूहळू पालापाचोळा, इतर कचरा यांनी ती कुंडी यथावकाश पूर्ण भरते.
एके दिवशी घराची आणि बागेची साफसफाई केली, त्यानंतर व्हॅक्यून क्लीनर रिकामा करायची वेळ आली तेव्हा लक्षात आलं की त्यात बरीचशी धूळ, माती आणि घरातला कचराच आहे. मग मी त्या कचऱ्यातून प्लॅस्टिक आणि तत्सम गोष्टी वेगळ्या केल्या. उरलेला कचरा एका छोटय़ा कुंडीत भरून ठेवला. दुसऱ्या दिवसापासून का कोण जाणे, पण इतर कुंडय़ांसोबत या कुंडीतही मी पाणी घालायला लागलो. चांगल्या आठ दिवसांनंतर या कुंडीत चिमुकली पाच पानं दिसायला लागली. इवले ते कोंब कशाचे यावर आई-बाबा आणि मी कयास करायला लागलो. आई म्हणे कडवे वाल आले. बाबा म्हणाला, काही का असेना हिरवाई आहे हे महत्त्वाचं. यथावकाश ही मटकीची रोपं आहेत हे कळलं.
मागल्या आठवडय़ात मी चांगल्या दोन-तीन दिवसांच्या ट्रिपनंतर घरी परतलो होतो. दणक्यात सुरू झालेल्या उन्हाळ्यात रोपांना दोन-तीन दिवस पाणी मिळालेलं नसल्याने सारीच रोपं थोडी कोमेजून गेली होती. माती सुकी असल्याने नव्या कुंडीत मटकीची रोपं लावणं सोपं होईल हा विचार मी घरी परततानाच करत होतो. मात्र धास्ती वाटत होती की बिनपाण्याची ती जगली असतील का? पाहतो तर ही रोपं चांगली तकतकीत होती, लागलीच त्यांना दुसऱ्या मोठय़ा कुंडीत हलवलं आणि मला धक्काच बसला. त्या छोटय़ा कुंडीत माझं नेहमीचं पाण्याने भरलेलं सुगड नव्हतं तरी कुंडी बदलताना माझ्या लक्षात आलं की त्या केराच्या मातीने पाणी उत्तम धरून ठेवलं होतं. माती सुकी झालेली नव्हती. बारीक पूडीसारखी धूळ आणि घरातला कचरा यांनी त्या रोपांना पुरेसा ओलावा दिला होता. आता या रोपांना जवळजवळ रोज रात्री नवी पालवी फुटते आहे. लवकरच कदाचित फुलंदेखील दिसायला लागतील. जेमतेम ४-५ सेंटीमीटर वाढलेल्या त्या रोपांनी मला एक मजेशीर धडा दिलेला आहे.
घरातल्या किचनमधल्या कचऱ्यासोबतच आता रोजचा, घरातल्या झाडलोटीचा कचरादेखील मी कंपोिस्टगमध्ये वापरतो आहे. कंपोस्ट करताना माती अधिक ओली आहे असं वाटलं तर त्यात पाणी शोषून घेण्यासाठी शेणाच्या गवऱ्या, विटांचे तुकडे किंवा लाकडाचा भुसा इत्यादी प्रकार टाकले जातात. मी आपला व्हॅक्यूम क्लीनरमधला कचरा टाकतो. बारीक धूळ वगरे सारं पाणी शोषून घेतात, ओलावा टिकवतात आणि कंपोिस्टग अधिक चांगलं होतं, असा माझा अनुभव आहे.
वाचकहो, ‘शिवाजी नेहमी शेजाऱ्याच्या घरात’अशी आपली मानसिकता आहे. दुष्काळ पडला की सरकार दोषी. गरिबांना पाणी नाही त्याला त्यांचं नशीब दोषी. शहरात कचऱ्याची समस्या आहे, महानगरपालिका दोषी. आपली वास्तू या सगळ्या भवतालाचा भाग आहे, तेव्हा आपली जबाबदारी आपण पेलायला नको? आपल्याला पाण्याचा पुनर्वापर करता येईल का? कचरा कमी करता येईल का? आपण पावसाच्या पाण्याची साठवण करू शकतो का? या गोष्टी आपण जबाबदारीने करायला हव्यात. काळाची आणि समाजाची गरज आहे ती. कारण समाजाची सुरुवात आपल्यापासून, आपल्या वास्तूपासून होते, हे विसरून चालणार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 11th May 2013 रोजी प्रकाशित
चिऊचं घर : टाकाऊ ते टिकाऊ व्हाया क्रिएटिव्हिटी
सरकार, समाज, वसाहती आणि इतर कुणी कुणी काय काय करावं याविषयी आपल्या ठाम समजुती असतात. आपल्या घरात केलेले काही छोटे बदल मोठे ठोस परिणाम घडून येतात. गरज आहे स्वत:पासून, आपल्या घरापासून सुरुवात करायची.
First published on: 11-05-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Create home accessories from discarded items