|| मैत्रेयी केळकर
आपण आपल्यापुरतं नक्की पिकवू शकतो. सोसायटीच्या गच्चीचा, आवाराचा जर कल्पक वापर केला, थोडंफार श्रमदान केलं तर हिरवा भाजीपाला सगळ्यांना सहज उपलब्ध होईल. त्यासाठी जमीन घेऊन प्रयोग करायला नकोत. मला तर वाटतं, इवला मातीचा तुकडा, थोडी गच्चीवरची मोकळी जागाही आपल्या प्रयोगासाठी पुरेल. हवी ती फक्त इच्छा!
संकटं आपल्याला कणखर बनवतात, नवीन काही शिकवतात, ही सुविचारी वाक्यं आपण नेहमी ऐकली-वाचलेली असतात. पण जेव्हा खरोखरच मोठं संकट उभं राहतं त्या वेळी त्याच्याशी सामना करता करता त्या संघर्षांतून नवीन वाटा आपल्यासमोर नकळतपणे उघडल्या जातात. करोनाच्या महाभयंकर संकटाची दीड वर्षांपूर्वी जेव्हा चाहूल लागली त्या वेळी माझ्या हौसेचं रूपांतर गरजेत झालं आणि त्यातून स्वयंपूर्णतेची एक वेगळीच जाणीव मिळाली.
झालं असं की, करोनामुळे लॉकडाऊन लागला. वेगानं धावणारी गाडी अचानक एकाएकी बंद पडावी असं आयुष्य संथावलं. घरात डाळ, तांदूळ, गहू अशी जुजबी साठवणूक होती, त्यामुळे त्यासाठी रांगा लावाव्या लागल्या नाहीत. पण तेल, भाजीपाला, रवा, पोहे यांसारख्या गोष्टींची किती साठवणूक करणार? कधी कोणत्या गोष्टी उपलब्ध होतील त्याची शाश्वती नाही, अशी एक विचित्र समस्या उभी राहिलेली.
इथे माझ्या भाज्या लागवडीच्या छंदाने मला साथ दिली. माझी हौस आता चक्क माझी गरज झाली. बाहेरून कोणतीही गोष्ट आणली की ती आधी धुऊन घ्यायची, कधी त्यावरून गरम वाफ फवारायची, भाज्या सोडय़ाच्या पाण्यातून धुऊन घ्यायच्या यांसारख्या सोपस्कारांनी काही गोष्टी तर खराब व्हायच्याच, पण सगळ्यात जास्त निस्तेज व्हायच्या त्या पालेभाज्या. महागमोलाची आणि कष्टाने मिळवलेली कोथिंबीर तर दुसऱ्याच दिवशी साथ सोडून द्यायची. बाहेरून सामान मिळवून आणणारी व्यक्ती जणू काही एक लढाई मारल्याच्या आविर्भावात असायची. ‘पुरवून वापरा’ हे पालूपद त्या वेळी चालू असायचं. हे सगळंच नवीन होतं, घाबरवणारं होतं, चिंता वाढवणारं होतं.
भाज्या आणि फळांची ती अवस्था बघून फार वाईट वाटायचं. रोज किती कांदे-बटाटे उपयोगी पडणार, रोज किती उसळी कामाला येणार, हिरव्या दोस्तांना पर्याय नाहीच. मग चक्कं कागद पेन घेतलं आणि यादी केली. काय काय आणि कसं कसं लावता येईल, त्याचा एक आराखडा बनवला. कधी किती दिवसात लावल्यापासून भाज्या वापरता येतील त्याचं एक कोष्टक बनवलं.
जुन्या कुंडय़ा, कोपडी कुंडय़ा, जुने माठ असं सगळं गोळा केलं. नर्सरीतून रोपं, कुंडय़ा, माती आणणं असे सगळे मार्ग बंदच होते. त्यामुळे उपलब्ध ते उपयोगात आणायचं आणि गरजेवर लक्ष ठेवून प्रयोग करायचा हे मनाशी पक्कं ठरवलं.
रताळी एका कुंडीत लावली होतीच. चांगली फोफावली होती. त्याचा पाला उपयोगात आणला. एक वेळच्या भाजीची सोय झाली. रताळ्याच्या पानांच्या भाजीला खरंच उत्तम चव असते. ही भाजी होतेही चटकन आणि चांगली सारक असते. रताळ्याचा वेल अगदी कुठलीही फारशी काळजी न घेता मुकाटय़ाने वाढतो. रताळी आणि पानं असा दुहेरी लाभ होतो तो वेगळाच. पाला वापरल्यावर माती उकरून छोटी रताळी काढली आणि ती दोन तीन छोटय़ा कुंडय़ामधे लावली. एक दोन अळकुडय़ा होत्या त्या लावल्या, दोन कुंडय़ांमध्ये ऑर्किडच्या सोबत अळू लावलाच होता. ऑर्किडला दिलेलं बरचसं पाणी वाहून जातं त्याचा उपयोग व्हावा म्हणून मी अळूचे कंद त्याबरोबर लावले होते. आता त्यांना सोडवून तीन-चार कुंडय़ा तयार केल्या. भाजीच्या अळूची सोय केली.
अंबाडीच्या बिया होत्या त्या मोठय़ा कापडी कुंडीत पेरल्या. महालक्ष्मी सरसच्या प्रदर्शनात एका ठिकाणी भाज्यांच्या बिया मिळाल्या होत्या, काही कोकण कृषी विद्यापीठातून आणल्या होत्या. त्या सगळ्या लावण्यासाठी छोटय़ा मिळतील तशा कुंडय़ा जमवल्या, रोपं तयार करायला त्या उपयोगी आल्या. यात काकडी, दुधीभोपळा, कारलं, घोसाळी, वांगी, मिरची, चेरी टोमॅटो, साधे टोमॅटो, पालक, मेथी, धने आणि मोहरी असं सगळं पेरलं. मार्चचा महिना त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढलेला होताच. मग कमी ऊन येणाऱ्या आणि त्यातल्या त्यात थंड असलेल्या गॅलरीत त्या नेऊन ठेवल्या. वरून वर्तमानपत्राचा कागद घालून त्यावर हलके हलके पाणी घालू लागले. प्रत्येक कुंडीत लावलेल्या भाजीची पद्धतशीरपणे नोंद केलेल्या काठय़ा रोवल्या. पहिला टप्पा पार केला. पाच-सहा दिवसांत हलकी रोपं भुईतून वर आली. आता वर्तमानपत्राचा अडथळा दूर केला आणि त्यांना वाढू दिलं. हिरवीगार इवली रोपं सुरेख दिसत होती, डोळ्यांना सुखावत होती. हँगिंगमधे लावलेला पालक तर फारच देखणा वाटत होता. हळूहळू अंबाडी, दुधीभोपळा, काकडी जोम धरू लागली. मग सशक्त रोपं निवडून वेलवर्गीय भाज्यांना बांबूच्या काठय़ांनी कुंडीतल्या कुंडीतच मांडव केले आणि वाढीला वाव दिला. अंबाडी मोठय़ा कुंडीत लावली. कोबी, फ्लॉवर बुटक्या कुंडीत वाढत होते. टोमॅटो मिरचीची रोपं वेगवेगळ्या बेताच्या कुंडीत लावून घेतली. घरचे कांदे लावलेल्या कुंडीत कांद्याची पात जोम धरून वाढत होती. भोपळी मिरची वाढीला लागली होती. हळदीलाही सूर सापडला होता. या सगळ्या भाज्यांसोबत घोळ (एक प्रकारची रानभाजी) आपसूकच वाढत होती. हिरव्या माठाला तर कमालीचा आनंद झाल्यासारखा तो सरसर वाढायला लागला होता.
मग गरजेप्रमाणे आणि वाढीनुसार प्रतवारी करून, उन्हाची गरज बघून प्रत्येकाला आपापल्या जागेवर हलवलं. ब्राह्मीची चटणीसाठी वापरली जाणारी जात चार-पाच लहानग्या कुंडय़ांमधे वाढत होती. पुदिना आणि चेरी टोमॅटो जिवलग मित्र झाले होते. वाढणाऱ्या त्या हिरव्या दोस्तांकडे बघून त्या तणावाच्या काळातही प्रेरणा मिळत होती. कारलं घोसाळी, घेवडा फोफावला होता. दुधी भोपळा, लाल भोपळा थोडे संथ गतीने वाढत होते. खत, माती कोणती वापरायची असे कुठलेही प्रश्न पडून काही उपयोगाचं नव्हतं. त्यामुळे नेहमीप्रमाणे घरातल्या कचऱ्यापासून तयार केलेल्या माती कम खताचा वापर कुंडय़ा भरताना केला होता. किचन वेस्टपासून खत तयार होताना त्यातून निघणारं पाणीही साठवून ठेवलं होतं, त्याची फवारणी वाढीच्या रोपांवर केली तेव्हा जाणवलं बराच फायदा होतोय. ऑर्किड, कमळ यांच्यावरही त्याचा चांगला परिणाम दिसायला लागला. एक नवा शोध लागला. भाजीपाला लावलेल्या या माझ्या इवल्याशा मळ्यात देशी गुलाब, मदनबाण, मोगराही झपाटय़ाने वाढत होते. मग गुलाबाच्या रोजच्या पाकळ्या साठवत गुलकंद करायला ठेवला. मोगऱ्याची फुलं माठातल्या पाण्यात टाकू लागले. गांधीजींच्या साहित्याचा अभ्यास करताना त्यांची स्वयंपूर्ण खेडय़ांची कल्पना फार भावली होती. त्यांचे आहारातील निरनिराळे प्रयोग वाचले होते. आपणच लावलेल्या या भाजीपाल्याकडे बघत असताना त्यातील सत्यता अनुभवाला येत होती. त्यातून नवीन प्रयोग सुचत होते.
आता भाजीची समस्या सुटली होती. सुरुवातीला अळू, घोळ, रताळ्याचा पाला वापरत वापरत हळूहळू माठ, अंबाडी हाताशी आली. भोपळ्याच्या फुलांची भाजी, कधी ब्राह्मीची चटणी असं सुरू झालं. कोबी-प्लॉवर होतेच. बियांपासून कोबी लावण्याचे यशस्वी प्रयोग मी याआधीसुद्धा केले होते. या वेळी फक्त फार मोठे होऊ न देता बरी वाढ झाल्यावर ते वापरायला लागले. मिरचीला यथावकाश फुलं येऊन सुरेख मिरच्या लागल्या. जुन्या वांग्याच्या झाडाला आलेल्या वांग्याच्या वापराने एखादी वेळ साधत होतीच. नवी वांगीही जोर धरत होती. माझं वेळापत्रक चांगलंच जमलं होतं. खरोखरच बाहेरून भाजी आणणं आणि ती धुणं या त्रासातून मुक्ती मिळाली होती. काकडीच्या वेलाला पहिली काकडी आली तेव्हा इतका आनंद झाला. रोज दोन-तीन काकडय़ा मिळत होत्या. कधी घेवडय़ाच्या शेंगा मिळायच्या तर कधी कारली, भेंडीने एखादी वेळ साजरी व्हायची तर कधी पालक मेथीचा नंबर लागायचा. मायाळूची ताकातली भाजी व्हायची तर कधी घरचं आलं, पुदिना, मिरची वापरून चटणी व्हायची. कधी कच्च्या टॉमेटोची भाजी व्हायची, तर रोज काकडीच्या जोडीला चेरी टोमॅटो असायचे. पुदिन्याची पानं पाण्यात घालून ते पाणी पिताना हॉटेलमधल्या स्टाइलिश पुदिन्याच्या काडय़ांनी सजलेल्या बाटल्या आठवायच्या. घरच्या खऱ्याखुऱ्या सेंद्रिय भाज्या खाऊन सगळ्यांच्या तब्येतीही ठणठणीत होत्या. आपला छंद आज चक्कं आपली गरज भागवतोय. त्रास वाचवतोय याचं एक वेगळं समाधान वाटत होतं. ‘‘वा आई! मानलं तुला.’’ मुलांच्या अशा प्रतिक्रिया तर अधिकच सुखावत होत्या. माझी झाडं ही माझी हौस आहे असं मानणारे घरातले सदस्य जेव्हा यात रस घेऊ लागले तेव्हा तर फार आनंद वाटला.
यातून एक अधोरेखित झालं ते म्हणजे, आपण आपल्यापुरतं नक्की पिकवू शकतो. सोसायटीच्या गच्चीचा, आवाराचा जर कल्पक वापर केला, थोडंफार श्रमदान केलं तर हिरवा भाजीपाला सगळ्यांना सहज उपलब्ध होईल. त्यासाठी जमीन घेऊन प्रयोग करायला नकोत. मला तर वाटतं, इवला मातीचा तुकडा, थोडी गच्चीवरची मोकळी जागाही आपल्या प्रयोगासाठी पुरेल. हवी ती फक्त इच्छा!
भाजीपाल्याचा प्रयोग करण्याआधी मला जमेल का? बिया कुठून मिळतील? खत कोणतं वापरू? असले असंख्य प्रश्न विचारत बसण्यापेक्षा सरळ एक छोटी कुंडी घेऊन प्रयोगालाच सुरुवात केली तर!
मी हे केलं, त्यातला आनंद, सुख अनुभवलं. भाजीपाल्याच्या जोडीला खत, मातीचे नवीन प्रयोग केले. गुलकंद केला, हळदीच्या कंदांपासून हळद तयार करून पाहिली, कमळ फुलं, गोकर्ण, जास्वंद यांच्या फुलांचा वापर करून काही प्रयोग केले. रानभाज्या घरच्या घरी कशा मिळतील ते पाहिलं. त्या सगळ्याविषयी सविस्तर पुढे कधी तरी लिहीन. पण एक मात्र खरं की, आता करोनाच्या संकटाने अवलंबित्वाचे धोके अधोरेखित झालेत. त्यामुळे स्वावलंबनाचा पर्याय आता स्वीकारायला हवाच आहे. त्या दृष्टीने प्रयोग व्हायलाच हवेत.
mythreye.kjkelkar@gmail.com