scorecardresearch

Premium

निवारा : भारतातील पारंपरिक बांधकाम पद्धतींची विविधता

प्रत्येकाच्या व्यक्तित्वाला ओळख देणारी ही गावाची संकल्पना प्रत्येकासाठी वेगळे स्वरूप घेते.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

शार्दूल पाटील

‘गाव’ ही कल्पना भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. The soul of India lives in its villages. म्हणणारे महात्मा गांधी असो किंवा ‘ग्रामगीता’ या ग्रंथात आपल्या ग्रामसंस्कृतीचे निर्मळ रूप मांडणारे संत तुकडोजी महाराज असो; अनेक भारतीय महापुरुषांची नाळ आणि त्यांची प्रेरणा भारतीय गावांशी जुळली होती, असे म्हणायला हरकत नाही.

Chatgpt
विश्लेषण : रिअल टाइम अपडेट, संवाद आणि बरेच काही… अद्ययावत चॅटजीपीटी किती उपयुक्त?
artist tourism painting
कलावंतांचे आनंद पर्यटन : प्रत्यक्षाहुनि प्रतिमा सुंदर..
Lucky Zodiac Sign
वयाच्या तिशीनंतर प्रचंड श्रीमंत होतात ‘या’ राशींचे लोक? शनिदेवाच्या कृपेने व्यवसायात मिळू शकतो भरपूर नफा
upsc exam preparation information
यूपीएससीची तयारी  : कर्तव्यवादी नैतिक सिद्धांत

प्रत्येकाच्या व्यक्तित्वाला ओळख देणारी ही गावाची संकल्पना प्रत्येकासाठी वेगळे स्वरूप घेते. ‘गाव’ ही कल्पना कोणाला दाट हिरवळीत, मुसळधार पावसाला तगून राहणाऱ्या कौलारू छपरे असलेल्या घरांकडे नेते, तर कोणाला रूक्ष वाळवंटात वसलेल्या मातीच्या सपाट धाब्याने झाकलेल्या घरांकडे नेते. गावाची संकल्पना आणि त्या संकल्पनेला आसरा देणारे पारंपरिक घर हे भारतात असलेल्या ग्राम संस्कृतीचे प्रतीक आहे. नैसर्गिक विविधतेने नटलेल्या भारतात अशा अनेक ग्रामसंस्कृत्या विकसित होत गेल्या. त्याच ग्रामसंस्कृतीबरोबर विकसित होत गेली ती भारतीय पारंपरिक बांधकामशैली. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारतात जसे दर ५ कि.मी.नंतर भाषा, हवामान, राहणीमान, पिके, जंगल, माती, दमटपणा इत्यादींमध्ये बदल होत असतो, तसाच बदल होत असतो तो पारंपरिक घरांच्या रचनेमध्ये.

कोणत्याही पारंपरिक घराचे सूक्ष्म निरीक्षण केल्याने आपल्या समोर त्या गावाची संपूर्ण कहाणी ठळकपणे उभी राहते. आसाममधली उंचीवर बांधलेली बांबूची घरे आपल्याला ब्रह्मपुत्रेच्या पुराची गोष्ट सांगतात. मराठवाडय़ातील २ फूट रुंदीच्या, घराच्या अंतरभागाला सहजपणे थंड ठेवणाऱ्या पांढऱ्या मातीच्या भिंती, तिथल्या रखरखीत उन्हाळ्याची गोष्ट सांगतात. जैसलमेरच्या वाळवंटी भागातील, फक्त पिवळा वालुकाश्म दगडाचा वापर करून उभारलेल्या भव्य हवेल्या पाहताच तिथल्या व्यापारी समाजाचे वैभव, तिथल्या कारगिरांचे दगड घडवण्याचे कौशल्य आणि दगड सोडून इतर कोणतेही बांधकाम साहित्याची अनुपलब्धतेची साक्ष देतो. तसेच लडाख प्रदेशातील उंच उंच बांधलेल्या मातीच्या भिंती आपल्याला तेथील मातीच्या सुदृढतेची, तेथील थंड व अतिशय कोरडय़ा हिवाळ्याविरुद्ध प्रतीकारशक्तीची जाणीव करून देतात.

‘स्लेट’ (पाटीचा दगड) या अतिशय गुळगुळीत अशा दगडाच्या चकत्यापासून तयार केलेले हिमाचली घराचे छप्पर, बर्फाचे हवे इतकेच प्रमाण घरावर ठेवून बाकी बर्फ सरकवून बाद करते (बर्फ हा उष्णतेचा कुवाहक असल्याने घरावरील बर्फाच्या थराने घराची ऊब टिकून राहते). अशी तांत्रिक व सांस्कृतिक प्रतिभेची अनेक उदाहरणे भारतभरात प्रत्येक प्रांतात, प्रत्येक गावात दिसून येतात.

एखाद्या गावाची बांधकामशैली तिथली भौगोलिक परिस्थिती, राहणीमान, जैवविविधता, मातीचा कस, तिथली शेतकी परंपरा, तिथले वार्षकि तापमान, वाऱ्याच्या गती व दिशेत होणारे वार्षकि बदल, पाण्याची उपलब्धता, लाकडाची उपलब्धता, मातीत असलेले घटक, उपलब्ध दगडाची मजबुती, जमिनीचा कडकपणा, जागेचा उतार अशा अनेक कारणांमुळे एक विशिष्ट स्वरूप व आकृती घेते. पारंपरिक घराची ही आकृती त्या त्या गावाची ओळख ठरते. त्या गावाच्या, वरील सगळ्या घटकांना प्रतिसाद देत हे पारंपरिक घर त्यातील कुटुंबाचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करते. तेथील स्थानिक साधनांचा काटेकोर वापर करून बनवलेले हे घर, तेथील बांधकामशैलीचे एक शोभिवंत उदाहरण ठरते. घरातल्या कुटुंबाच्या आवडीनिवडी, कुटुंबाची सामाजिक बांधिलकी, त्या त्या गावाच्या प्रथा आणि रूढींचे प्रतीक असते हे घर. तेथील हवामानानुसार घरातील वातावरण (कोणत्याही बाह्य़ ऊर्जेचा वापर न करता) योग्यरीत्या आरामदायी करण्याचे काम पारंपरिक बांधकामशैलीत बांधलेले घर करत राहते. हे घर गावाच्या परिस्थितीला इतके अनुकूल असते की, ते तसेच्या तसे दुसऱ्या गावात बांधले तर ते तितकेच कार्यक्षम ठरेल असं नाही. दमट वातावरणात बांधली जाणारी, कमी जाडीच्या भिंतींची कुडाची घरे कच्छसारख्या वाळवंटात बांधली तर घरात उष्णता तर वाढेलच, पण त्याचबरोबर कच्छच्या गतिमान आणि उष्ण वाऱ्याला ही घरे सामोरी जाऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे कच्छमध्ये सजून दिसणारे ‘एरोडायनामिक’ आकाराचे भुंगे (म्हणजेच स्थानिक भाषेत माती आणि गवताची गोलाकार घरे) जर कोकणात बांधली तर कदाचित त्यात दमटपणा अडकून राहिल्यामुळे गुदमरायला होईल. अति पावसाने गवताचे छप्पर असणाऱ्या भुंग्याचे छप्परसुद्धा कुजेल.

कोणतीही नैसर्गिक किंवा सामाजिक परिस्थिती असो, पारंपरिक बांधकामशैलीत त्याचे उत्तर शोधले तर ते जरूर सापडेल. कमी जंगल किंवा काटेरी वने असलेल्या लातूर व उस्मानाबादसारख्या प्रदेशात लाकूड न वापरता, निव्वळ विटेला वीट जोडून गोलाकार छप्पर करणे (याला स्थानिक भाषेत ‘लाडनी’ असं म्हटले जाते) ही परंपरेतून आलेली शिकवण. भूकंपग्रस्त मेघालयात स्थानिक बांबू वापरून बांधलेली गारो समुदायाची लांबलचक घरे प्रसिद्ध आहेत. बांबूची ताणप्रतिकारक क्षमता, म्हणजेच ‘टेन्साइल स्ट्रेन्थ’ ही स्टीलइतकीच आहे असे वैज्ञानिक संशोधन सांगते. ही घरे अतिशय हलकी असून भूकंपाबरोबर झुलतात, पण कोलमडत नाहीत. तमिळनाडूच्या निलगिरी जंगलात वसणाऱ्या तोडा समुदायाची वक्राकार छपराची घरे तेथील वेगवान वाऱ्याला सामोरी जाण्यास समर्थ ठरतात. घनदाट जंगल, अति दमटपणा, मुसळधार पाऊस, रेताळ वादळे, समुद्री खारे वारे, भूकंप, वारंवार येणारे पूर, टोकाची गर्मी आणि पाण्याला गोठून बर्फ बनवणारी टोकाची थंडी अशा अनेक स्थानिक नैसर्गिक संकटांचे पर्याय तेथील स्थानिक बांधकामशैलीत सापडतात. ही घरे त्या त्या वातावरणात, त्या त्या प्रांतात शाश्वत बांधकामाची अव्वल उदाहरणे ठरतात.

आपल्या अनेक पिढय़ा अशा नैसर्गिक घरांत वावरल्या. त्या घरांमुळे आपल्या संस्कृतीला ओळख मिळाली. त्यात काळानुसार बदलही होत गेले. पण तेथील स्थानिक कलाकुसरीची, तेथील स्थानिक साधनांची, ऊर्जेचा वापर न करता निर्माण होणाऱ्या पूरक अंतरवातावरणाची मूळ तत्त्वे कधीच बदलली नाहीत. पण आज हे दृश्य बदलताना दिसतंय. आधुनिकतेच्या नावाखाली पारंपरिक बांधकाम शैलीच्या या वारशाला आपण मागे टाकून आज पाश्चिमात्य तंत्रज्ञानाचे अंधानुकरण करायला जातो. आपली ‘आधुनिक’ घरे उन्हाळ्यात आपल्याला पंखा, किंवा त्याहूनही वाईट म्हणजे ए. सी. लावल्याशिवाय आराम देत नाहीत. ही घरे खूप महाग तर असतातच, पण त्या रकमेत पुरेसे आपत्तीविरोधात संरक्षण देत नाहीत, हिवाळ्यात अतिशय थंड होतात आणि पाऊस पडला की हजारो रुपयांचे वॉटर प्रूफिंग हमखास धोका देते. त्याव्यतिरिक्त केरळमधील घर हे हिमालयात बांधलेल्या घरासारखेच दिसते. शाश्वत बांधकामाची ही विविधता आता असे अनेक अयोग्य, एकसारख्या आकाराचे, अशाश्वत आणि अनसार्गिक आधुनिक बांधकामामुळे लोप पावत आहे. असे असताना आपल्या आजीच्या गोष्टींसारखी लळा लावणारी गावाची संकल्पना, त्या संकल्पनेला आकार देणारी पारंपरिक घरे आणि आपल्या ग्रामसंस्कृतीचे भवितव्य काय, याचा प्रश्न पडतो.

shardul@designjatra.org

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Diversity of traditional construction practices in india

First published on: 06-04-2019 at 01:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×