मी राहत असलेली सदनिका माझ्या पत्नीच्या नावे आहे, तिचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. वारसदार म्हणून माझ्या मुलाचे नाव नोंदवले आहे. मुलगा परदेशात असतो. या पाश्र्वभूमीवर माझे प्रश्न पुढीलप्रमाणे-
– ग. वि. गोसावी, कांदिवली (पश्चिम).
*    सदर सदनिका माझ्या मुलाच्या व्यतिरिक्त अन्य कुणाच्या नावे वा संयुक्त नावे होऊ शकते का?
*    याचे उत्तर नाही असे आहे. मुलगा वारसदार म्हणजे नामनिर्देशित (नॉमिनी) केला गेला आहे, तेव्हा संस्थेच्या उपविधीमधील तरतुदीनुसार सदर सदनिका ही नॉमिनीच्या नावावर होऊ शकते. म्हणूनच ती तुमच्या मुलाच्या नावे होईल. अन्य कुणाच्या वा संयुक्त नावे होणार नाही.
*    सदर सदनिका दोघांच्या नावे केल्यास व काही काळानंतर तिची विक्री केल्यास प्राप्तिकरात काही सूट मिळू शकते का?
*    सदर सदनिका दोघांच्या नावे करण्यासाठी ती तुम्हाला रीतसर स्टॅम्पडय़ुटी भरून इतर सर्व सहवारसांकडून विकतच घ्यावी लागेल. अथवा अन्य वारसांकडून हक्क सोडपत्र करून ते नोंदणीकृत करून घेतल्यानंतरच सदर सदनिका संयुक्त नावे होऊ शकेल. मात्र याचा प्राप्तिकराच्या दृष्टीने काही फायदा होईल असे वाटत नाही. सदनिका विकताना तुम्हाला भांडवली नफा जर आला (कॅपिटल गेन) तर तो तुम्हाला तुमचा इन्कम म्हणून दाखवून त्यावर प्राप्तिकर भरावा लागेल. सदनिका संयुक्त नावे आहे म्हणून प्राप्तिकर भरण्याचे टाळता येणार नाही.
*    मुलगा ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास तयार असला तर सदर सदनिका दोघांच्या नावे करता येईल का?
*    याचे उत्तर नाही असे आहे. कारण आपणाला किती मुले आहेत याचा उल्लेख आपण आपल्या पत्रात केलेला नाही. आपल्या पत्नीचे आपण व आपली मुले ही सर्व जण वारस होता. त्यामुळे एकटय़ा मुलाच्या ना-हरकतीवर व विनारजिस्टर डॉक्युमेंट बनवल्याशिवाय असे करणे शक्य नाही.
* सहकारी सोसायटय़ांमधील स्टिल्ट एरिया ही सर्व सभासदांची सामूहिक जागा असते का? – रत्नाकर र. हरिनामे,अंधेरी-पश्चिम, मुंबई.
*    या प्रश्नाचे उत्तर कागदपत्रे पाहिल्याशिवाय देणे कठीण आहे. स्टिल्ट एरिया पार्किंगसाठी विकला गेला आहे काय याची शहानिशा करून घेणे आवश्यक आहे. तसा तो विकला गेला असल्यास स्टिल्ट एरिया ही सामूहिक जागा रहाणार नाही.
*    जर स्टिल्ट एरिया हा कॉमन/सामूहिक असेल तर त्याचा कर (महापालिका कर) सर्व सभासदांमध्ये विभागला जाईल का?
*    होय. सदर स्टिल्ट एरिया हा सामूहिक असेल तर त्याचा महानगरपालिकेचा कर हा सर्व सभासदांमध्ये विभागला जाईल.
*    सदर स्टिल्टचा कर हा फक्त जे सभासद आपल्या गाडय़ा पार्क करतात त्यांच्याकडून वसूल करणे आवश्यक आहे का?
*    या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी सदर स्टिल्ट हे संस्थेच्या मालकीचे आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी लागेल. संस्थेने जर स्टिल्ट पार्किंगचे अ‍ॅलॉटमेंट केले असेल व संस्था गाडी पार्क करण्याचे पैसे त्यांच्याकडून वसूल करत असेल तर त्यांच्याकडून महापालिकेचा कर वसूल करता येणार नाही.
*    एखाद्या सदस्याने त्याच्या पार्किंग जागेत बॅराकेट केले व इतर सभासदांना तो एरिया वापरण्यास मज्जाव केला तर ते कॉमन एरियाचे उल्लंघन होईल काय?
*    या प्रश्नाचे उत्तरही वरील प्रश्नाच्या उत्तराप्रमाणेच आहे. प्रथम त्यासाठी पेपर पाहावे लागतील. संस्थेने कोणत्या टर्म व कंडिशनवर सभासदाला जागा वापरायला दिली आहे हे पाहावे लागेल. पार्किंग जागेत एखाद्या सदस्याने काही बांधकाल केले असेल तर ते कुणाच्या परवानगीने उभारले ते पाहणे जरुरीचे आहे. या सर्व गोष्टींच्या अभ्यासानंतरच आपल्या प्रश्नाचे उत्तर देता येईल.
*    स्टिल्ट पार्किंग कॉमन एरिया म्हणून गणला गेला असून त्या एरियाचे पार्किंगसाठी संस्थेने अ‍ॅलॉटमेंट केले आहे. संस्था त्यांच्याकडून पार्किंग चार्जेसही घेते. असे असताना वार्षिक सर्वसाधारण सभा बहुमताच्या जोरावर पार्किंग एरिया अ‍ॅलॉट केला गेलेल्या सदस्यांकडूनच महापालिकेचा कर वसूल करायचा असा ठराव मंजूर केला तर तो ठराव रद्दबातल ठरतो का?
*    एखाद्या नैसर्गिक न्यायतत्त्वाविरुद्ध जर एखादा ठराव एखाद्या संस्थेने मंजूर करून घेतला म्हणून तो ठराव कायदेशीर ठरतोच असे नाही. कित्येक बहुमताने मंजूर केलेले ठराव न्यायालयात बेकायदेशीर ठरतात. म्हणूनच बहुमताच्या जोरावर आपल्या अधिकार कक्षेबाहेरील मंजूर केलेले ठराव हे नेहमीच अवैध ठरतात. आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी कागदपत्र पाहणेच जास्त बरोबर ठरेल. मात्र प्रथमदर्शनी वर म्हटल्याप्रमाणे मंजूर केलेला ठराव आमच्या मते बेकायदेशीर ठरेल.
*    गृहनिर्माण संस्थेमधील २०% हून अधिक लोकांनी (सभासदांनी) मागणी केल्यास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते का?
– अशोक जोशी, बदलापूर (पूर्व) जि. ठाणे.
* होय. संस्थेच्या उपविधीमध्येच अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र त्यासाठी संस्थेच्या सदस्यांकडून तशा प्रकारची लेखी मागणी येणे आवश्यक आहे.
* एखाद्या गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला ठराव जर बदलायचा असेल अथवा त्यामध्ये काही सुधारणा करावयाची असेल किंवा तो ठराव रद्दबातल ठरवायचा असेल तर तसे करता येते का?
* हो, तसे करता येते. एखादा ठराव रद्दबातल अथवा बदलता येतो, मात्र असा ठराव मंजूर झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत तो रद्दबातल करता येत नाही अथवा बदलता येत नाही.    
पत्ता- द्वारा घैसास अँड असोशिएटस्,
टॅक्स कन्सल्टंट अँड लीगल अ‍ॅडव्हायझर्स, ब्लॉक नं.२, चंदन सोसा., ठाणे (प.) – ४००६०१. फोन- ०२२-२५४०१८१३

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidance about property
First published on: 12-04-2014 at 01:35 IST