अजित सावंत 

कोणत्याही इंटिरियरचा एक अविभज्य भाग म्हणजे फ्लोरिंग. पंचवीस एक वर्षांपूर्वी फ्लोरिंगचे जास्त पर्याय उपलब्ध नव्हते. हळूहळू नवनवीन पर्याय बाजारात येऊ लागले. आत्ताच्या घडीला तर फ्लोरिंगच्या विविध पर्यायांनी बाजारपेठा भरून गेल्या आहेत. फ्लोरिंग निवडताना सरसकट निवड न करता, खालील मुद्दय़ांचा विचार जरूर करावा. 

इंटिरियर स्ट्राईक : प्रत्येक इंटिरियरची एक स्टाईल असते. या स्टाईलच्या लुकचा विचार करून फ्लोरिंग मटेरियल निवडावे. जसे की एथनिक, इंडियन स्टाईलला मार्बल, इटालियन मार्बल, जयसलमेर स्टोन हे पर्याय अतिशय शोभून दिसतात. तसेच मॉडर्न, कंटेम्पररी स्टाईला विट्रीफाईड टाईल्स, वुडन फ्लोरिंग, आर्टिफिशियल मार्बल जसे पर्याय साजेसे ठरतात. आपल्याला फ्लोरिंग फिकट रंगाचे हवंय की गडद रंगाचे? त्यात काही डिझानर पॅटर्न हवाय का? दोन वेगळय़ा मटेरियल्सचं कॉम्बिनेशन करायचं आहे का? या सगळय़ा बाबींचा विचार करावा. 

फ्लोरिंगची जागा : आपल्याला कोणत्या रूममध्ये फ्लोरिंग करावयाचे आहे हे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे लििव्हग रूममध्ये लाईट रंगाचे फ्लोरिंग लावले जाते. बेडरूममध्ये काहीजण पसंतीनुसार डार्क रंगाचे फ्लोरिंग लावतात, कारण त्यातील बराचसा भाग बेड व वॉर्डरोबखाली लपला जातो. काही वर्षांपूर्वी किचनमध्ये पॉलिश्ड कोटा किंवा ग्रॅनाईटचे फ्लोरिंग केलं जायचं. अजूनही काही क्लायंटस् आग्रहाने किचनमध्ये ग्रॅनाईटचे फ्लोरिंग करून घेतात. पण ९९% किचनमध्ये आज लाईट रंगाचे फ्लोरिंग केलं जातं. कोटा व ग्रॅनाईट डार्क असल्याने हळूहळू ते वापरणं बंद झालं. कोटा व ग्रॅनाईट आधी किचनमध्ये वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या फ्लोरिंगला सहसा तडे जात नसत. 

बजेट : आपल्या इंटिरियरसाठी आखलेल्या बजेटचा विचार करावा. फ्लोरिंगचं काम हे थोडं खर्चीक असतं. त्यासाठी तरतूद करावी. पण फ्लोरिंगचे अनेकविध पर्याय उपलब्ध असल्याने प्रत्येक बजेटसाठी काही ना काही नक्कीच उपलब्ध असते. 

टिकाऊपणा व मेटेनन्स : हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण लावत असलेलया फ्लोरिंग मटेरियलची डय़ुरेबिलिटी खूप महत्त्वाची आहे. फ्लोरिंग मटेरियल जितके मजबूत अर्थातचे तितके ते जास्त टिकते. उदा : ग्रॅनाईट हा अतिशय टणक व मजबूत दगड असल्याने खूप टिकतो. यावर सहजासहजी चरे पडत नाहीत. तडे जात नाहीत. तर तुलनात्मकदृष्टय़ा मार्बल हा ठिसूळ दगड असल्याने यावर लवकर चरे पडू शकतात तसेच तडे जाऊ शकतात. आपण ज्या ठिकाणी फ्लोरिंग लावत आहात त्या ठिकाणी असलेली वर्दळ, डाग, ओरखडे, पाणी, जळत्या गोष्टी, जड वस्तू या गोष्टींचा फ्लोरिंग मटेरियलवर होणारा परिणाम याची माहिती घ्यावी. काही फ्लोरिंग मटेरियल्सना मेंटेनन्सची गरज भासते. जसे की मार्बल व जयसलमेर स्टोनच्या फ्लोरिंगला ते फिक्स केल्यानंतर त्यावर पॉलिश केले जाते. हे पॉलिश साधारणपणे तीन / चार वर्षांनंतर पुन्हा करावे लागते. कारण त्या पॉलिशमुळे येणारा ग्लो म्हणजे चमक कमी होते. अशा तांत्रिक गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करावा. डय़ुरेबिलिटी व मेंटेनन्स या गोष्टी तपासाव्यात आणि त्यानंतरच फ्लोरिंग मटेरियल निवडावे.

फ्लोरिंग लावताना घ्यायची काळजी : जिथे फ्लोरिंग लावायचे आहे, तिथे सूर्यप्रकाश किती प्रमाणात येतो ते तपासावे. जर सूर्यप्रकाश कमी प्रमाणात येत असेल तर गडद रंगाचे फ्लोरिंग कटाक्षाने टाळावे, कारण गडद रंगामुळे रूममध्ये आणखी अंधार होईल व रूम आहे त्यापेक्षा लहान भासेल म्हणून लाईट रंगाचे फ्लोरिंग वापरावे, जेणेकरून येणारा सूर्यप्रकाश फ्लोरिंगवरून परावर्तीत होऊन रूम उजळेल. हा वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे, पण लाईट रंगाचे फ्लोरिंग वापरणे हितावह ठरते. लाईट रंगाच्या फ्लोरिंगवर वापरण्यासाठी फर्निचरमध्ये डार्क रंगाचे खूप पर्याय आहेत. याउलट डार्क रंगाच्या फ्लोरिंगवर वापरण्यासाटी लाइट रंगाचे तुलनेने कमी पर्याय आहेत. वुडन फ्लोरिंग व कारपेट वगळता इतर कोणतेही फ्लोरिंग आधीच्या फ्लोरिंगवर लावू नये. काही जण वेळ वाचवण्याकरिता आधीच्या फ्लोरिंगवरच नवीन फ्लोरिंग लावतात. आधीचे फ्लोरिंग तोडून काढून फेकणे टाळल्यामुळे थोडय़ा प्रमाणात वेळ व पैसा जरूर वाचतो, पण याचा अतिशय मोठा दुष्परिणाम म्हणजे असे केल्याने आपल्या स्लॅबवरील व पर्यायाने इमारतीवरील वजन अक्षरश: शेकडो किलोंनी वाढते व इमारतीच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अपायकारक आहे.

प्रत्येक फ्लोरिंग लावण्याची पद्धत तसेच लावण्याचे दर वेगवेगळे असतात, त्यामुळे याची माहिती घेऊन फ्लोरिंग मटेरियल निवडावे. 

मटेरियलची उपलब्धतता : आपण निवडत असलेले मटेरियल आपल्याला हव्या त्या प्रमाणात डिलरकडे उपलब्ध आहे याची खात्री करावी. आपल्याला हव्या असलेल्या प्रमाणात मटेरियल खरेदी करून ते साईटवर स्टोर करावे. शक्यतो थोडेसे जास्त प्रमाणात मटेरियल विकत घ्यावे. जेणेकरून कालांतराने एखादी टाईल बदलायची असेल तर ती आपल्याकडे उपलब्ध असते. (केवळ टाईल्स बाबत). बऱ्याच वेळेस टाईल्स मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्या चालू असलेल्या टाईल्सचे प्रॉडक्शन बंद करून नवीन डिझाइनच्या टाईल्स बाजारात आणतात. त्यामुळे कालांतराने जर एखादी टाईल तुटली फुटली तर जादा घेऊन ठेवलेली टाईल कामी येते. या आणि अशा इतर मुद्दय़ांचा विचार करून फ्लोरिंग मटेरियल निवडावे. पुढील भागात आपण फ्लोरिंग मटेरियल्सच्या नैसर्गिक पर्यायांची माहिती घेऊ या.

 (इंटिरियर डिझायनर)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ajitsawantdesigns@gmail.com