महागडय़ा वस्तूंची जंत्री केली म्हणजे वास्तू सजली असं होत नाही, तर कोणत्याही वास्तूचं सजणं हे नियोजनबद्ध, प्रमाणबद्ध असेल तरच ते मनाला आणि डोळ्यांना भावतं, नव्हे सुखावतं. शास्त्रोक्त पद्धतीने वास्तू सजवणं आणि अंतर्गत सजावट यांविषयी माहिती देणारं सदर..
अं तर्गत सजावट किंवा इंटिरिअर डिझायिनग हा विषय गेल्या काही वर्षांपासून अगदी घराघरात पोहोचला आहे. मुळात आपली वास्तू मग ते वन-टू बीएचके घर असो किंवा बंगला, टेरेस फ्लॅट असो किंवा डुप्लेक्स किंवा एखादं ऑफिस, शॉप असो, सगळीकडेच शास्त्रशुद्ध अंतर्गत सजावट महत्त्वाची ठरते. इंटिरिअर डिझायिनग या शास्त्राचा आधार घेऊन आपण आपल्या वास्तूला नियोजनबद्धरीत्या सुरेख सजवू शकतो. मुळात अशी सजावट अधिक चांगल्या तऱ्हेने अर्थपूर्ण ठरत असते.  
गेलं वर्षभर आपण ‘वास्तुरंग’च्या याच सदरांतर्गत अंतर्गत सजावट किंवा इंटिरिअर या शास्त्राविषयी जाणून घेतलं. इंटिरिअरमधल्या महत्त्वाच्या गोष्टी, आपल्या गरजा, बजेट, नियोजन, इथले ट्रेण्ड्स, बदलते प्रवाह या विषयांना स्पर्श करत असतानाच घरातील महत्त्वाच्या खोल्या, त्यांची स्वतंत्र सजावट, घराच्या सजावटीतला एकसंधपणा, सुसंगतता अशा अनेक मुद्दय़ांविषयी आपण चर्चा केली. शिवाय ते करताना काय काळजी घ्यावी, कोणते मुद्दे विसरून चालणार नाहीत, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या करू नयेत, यासारख्या डू अ‍ॅण्ड डोण्ट्सचं भान असणं गरजेचं आहे, हे मुद्देसुद्धा विचारात घेतले. मुळात इंटिरिअर डिझायिनग हा विषय इतका व्यापक आणि प्रवाही आहे की, कितीही सांगितलं तरी तो न संपणारा आहे. यात काळानुरूप सतत बदल होत असतात, सजावटीची स्टाइलसुद्धा बदलत असते, नवनवीन ट्रेण्ड्स येत असतात. ग्लोबलायझेशनमुळे जग खूपच जवळ आलंय. त्याचे तरंगही इंटिरिअरमध्ये उठत असतात. तंत्रज्ञानात सतत नवनवीन गोष्टी येत आहेत, शोध लागत आहेत, त्यांचा वाटासुद्धा असतोच. या नवीन वर्षांत आपण याच इंटिरिअरमधल्या वेगवेगळ्या मुद्दय़ांना स्पर्श करणार आहोत.
वास्तू मग ते घर असो किंवा बंगला किंवा ऑफिस, शॉप काहीही असो त्याला जर इंटिरिअर ‘टच’ दिला तर त्या वास्तूला नक्कीच वेगळा आयाम मिळतो. या वर्षी आपण हेच विविध पलू लक्षात घेणार आहोत. त्याबरोबरच वास्तूच्या सजावटीत महत्त्वाची भूमिका बजावणारे वेगवेगळे मुद्दे
जसं की, वेगवेगळी मटेरिअल्स, त्यातलं नावीन्य, वैविध्य यावरही प्रकाश टाकणार आहोत. तुम्ही जर आपलं घर किंवा ऑफिस अंतर्गत सजावटीच्या आधारे सजवण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम पुढील मुद्दे विचारात घेणं आवश्यक आहे. तुमच्या गरजा, तुमचं बजेट, तुमच्या आणि घरातल्या व्यक्तींच्या आवडीनिवडी, वास्तूला हवा असलेला वेगळा लूक, त्याची तुमच्या मनातली रूपरेषा, वास्तूमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या, नको असलेल्या किंवा अडगळीतल्या वस्तूंची यादी, वगळता किंवा मोडीत काढता येतील, अ‍ॅडजेस्ट करता येण्यासारख्या गोष्टी किंवा वस्तू उदा. डायिनग टेबल. ते नसलं तरी चालेल किंवा छोटंसं का होईना पण ते हवंच आहे. वॉर्डरोबमध्ये हँिगग स्पेस हवीए किंवा नकोय. यासारख्या आणि इतर अनेक गोष्टी किंवा वस्तू वगरे. ही प्राथमिक तयारी असली की इंटिरिअर करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तीलाही काम करणं सोयीचं जातं. चच्रेला बसताना याचा खूप फायदा होतो. म्हणून ही प्राथमिक तयारी सजावट करण्याआधी नक्की करावी. ती चोख असली की तज्ज्ञाकडून सुरेख सजावट आकारायला मदत होते. पुढच्या लेखापासून आपण गृहसजावटीतल्या अनेक पलूंवर प्रकाश टाकून, या प्रवाही आणि प्रभावी माध्यमाचा वापर करून कल्पक, अर्थपूर्ण सजावट कशी करता येईल हे पाहणार आहोत.