हेमाडपंथी मंदिराच्या बांधणीची विविध वैशिष्टय़े टाकाहारीच्या जगदंबा मंदिराच्या बांधकामातही आढळतात. बांधकामासाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. कापलेले व कोरीवकाम केलेले दगड विशिष्ट पद्धतीने एकात एक बसवून संपूर्ण मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे.
कोकणचा शेजार लाभलेल्या, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले (जि. अहमदनगर) तालुक्याला जसे अभिजात निसर्गसौंदर्याचे वरदान मिळाले आहे; त्याबरोबरच वैभवशाली इतिहास आणि समृद्ध वास्तुरचनेचाही वारसा लाभला आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड, विश्रामगड यांसारखे लहान-मोठे दीड डझन गडकिल्ले आणि हरिश्चंद्रेश्वर (हरिश्चंद्रगड), सिद्धेश्वर (अकोले), अमृतेश्वर (रतनवाडी) यांसारखी अप्रतिम शिल्पसौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे याचीच साक्ष देतात. तालुक्यातील टाहाकारी या छोटय़ाशा खेडेगावातील जगदंबादेवीचे मंदिर या समृद्ध, सांस्कृतिक व वास्तुशास्त्रीय परंपरेतील असाच एक अनमोल ठेवा.
सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर (उंची १ हजार ६४६ मीटर) असणाऱ्या शिखर स्वामिनी कळसूबाईपासून काही अंतरावर आहे पट्टाकिल्ला ऊर्फ विश्रामगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला हा अकोले तालुक्यातील एकमेव किल्ला. या विश्रामगडाच्या परिसरातच आढळा नदी उगम पावते. येथून काही अंतरावर आहे टाहाकारी हे खेडे. या खेडय़ातच आढळा नदीच्या काठावर अप्रतिम शिल्पसौंदर्याचा आविष्कार असणारे पुरातन देखणे जगदंबामातेचे मंदिर आहे.
अकोले येथून टाहाकारी २८ किमी अंतरावर आहे. मुंबई, नाशिकवरून इगतपुरी-घोटी मार्गाने टाकेदजवळचा म्हैसवळण घाट चढूनही टाहाकारीला पोहोचता येते. हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील टाहाकारीचे हे मंदिर बाराव्या अथवा तेराव्या शतकात बांधले गेले असावे. काळाच्या ओघात मंदिराच्या बाह्य़स्वरूपात काही बदल झाले. मंदिरावरची मूळची तीन शिखरे पडून गेली. प्रवेशद्वारालगतच काही वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रीटमध्ये एक सभामंडप बांधण्यात आला. पूर्वी मंडपात असणारे होमकुंड मंदिरासमोर मोकळय़ा जागेत हलविण्यात आले. मूळच्या शिखरांच्या जागी नव्याने बांधलेल्या कळसांना रंगरंगोटी करण्यात आली. तथापि शिखरापर्यंतचा मंदिराचा मुख्य दगडातील भाग आजही मूळ अवस्थेत मंदिराच्या वैभवाची साक्ष देत उभा आहे.
हे मंदिर उत्तराभिमुख आहे. समोरूनच आढळा नदी वाहते. नदीपासून सुमारे शंभर फूट उंचीवर मंदिर उभे असून तेथपर्यंत पायऱ्या पायऱ्यांचा बांधलेला घाट, सभोवताली असणारी उंच वाढलेली नारळाची व अन्य झाडे आणि सभोवताली असलेल्या डोंगररांगा यामुळे हा परिसर रमणीय बनला आहे. मंदिराच्या सभोवताली तीन बाजूने सात फूट उंचीची दगडी तटबंदी आहे. पूर्वेकडील रस्त्याने मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करता येतो. पूर्वी दक्षिण दिशेला असणारा प्रवेशमार्ग पुरातन खात्याने आता बंद केला आहे. इंग्रजी राजवटीत ४ मार्च १९०९ रोजी हे मंदिर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

टाहाकारीचे हे मंदिर भूमीज प्रकारचे आहे. मंदिर उत्तराभिमुख असून मुखमंडप त्यामागे दोन्ही बाजूस एक एक उपगर्भगृह असलेला मंडप नंतर अंतराळ व मुख्य गर्भगृह अशी मंदिराची देखणी रचना आहे. हे मंदिर तीन गाभाऱ्यांचे आहे म्हणून याला त्रिदल मंदिर म्हणतात. या तिन्ही गाभाऱ्यांना एकच सामायिक मंडप आहे. या मंदिराचे एक वैशिष्टय़ म्हणजे या तीनही गाभाऱ्यांवर एक एक शिखर आहे. वस्तुत: महाराष्ट्रात जी त्रिदल मंदिरे आहेत त्या मंदिरांच्या मुख्य गाभाऱ्यावरच शिखर असल्याचे आढळते.
मंदिराची रचना चार मुख्य भागांत आहे. मंदिराचा दर्शनी भाग १५ बाय १५ फूट, त्यामागे सभामंडप हा २० बाय २० फूट, नंतर मुख्य गाभारा २० बाय २० फूट आणि मुख्य मंडपाला लागून पूर्व व पश्चिम बाजूला ८ बाय १२ फूट आकाराचे दोन लहान गाभारे. मंदिराने एकूण ७० बाय ४० फूट एवढी जागा व्यापली आहे.
हेमाडपंथी मंदिराच्या बांधणीची विविध वैशिष्टय़े या मंदिराच्या बांधकामातही आढळतात. बांधकामासाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. कापलेले व कोरीव काम केलेले दगड विशिष्ट पद्धतीने एकात एक बसवून संपूर्ण मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. शिखरांचा मात्र याला अपवाद आहे. एकूण ७२ दगडी खांबांच्या आधारावर हे मंदिर उभे आहे. हे सर्व स्तंभ सुंदर शिल्पांनी अलंकृत केलेले आहेत. मंदिराचे खांब तसेच तुळया अखंड असून त्यांना कोठेही जोड देण्यात आलेला नाही.
मंदिराच्या खांबांवर, छतावर तसेच िभतीच्या आतील व बाहेरील बाजूने मुक्तहस्ते विपुल प्रमाणात केलेले कोरीव काम लक्षवेधी आहे. विविध देवदेवतांच्या मूर्ती, पौराणिक प्रसंगांची चित्रे, हत्ती, घोडे असे प्राणी, काही भौमितिक आकृत्या, यक्ष, अप्सरा, सुरसुंदरी याबरोबरच काही मैथुन शिल्पेही जिवंतपणे साकारली आहेत.
बारा खांबांनी सभामंडपाचे घुमट आकार छत पेलले आहे. हे छत खूपच कोरीव आहे. छताच्या उत्तरोत्तर लहान होत जाणाऱ्या वर्तुळाकार भागांमध्ये ठराविक अंतरावर सिंह, यक्ष आणि आठ अप्सरांच्या मूर्ती आहेत. मंडपाचे तीन दिशांना गर्भगृहे आहेत. प्रमुख गाभारा व सभामंडप यादरम्यान अंतराळाची रचना केलेली आहे. अंतराळाला आयताकृती छत असून, त्यात मधोमध छोटा घुमट आहे. मंदिर गाभाऱ्याचा दरवाजा बारा बाय पाच फूट आकाराचा असून त्याच्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. ही सर्व कलाकुसर पाहून थक्क व्हायला होते. चौरसाकृती गाभाऱ्यात अठरा हात असणारी महिषासुरमर्दिनीची काष्ठमूर्ती विराजमान आहे. या मूर्तीसमोर अडीच फूट उंचीचा तांदळा आहे.
मंदिराची बाह्य़रचना तारकाकृती आहे. मंदिराची बाह्य़ िभत छोटय़ा छोटय़ा कोनात दुमडलेली आहे. ही बाह्य़ िभत अधिष्ठान (ओटा) मंडोवर (ओटय़ावरील िभतीचा भाग), जंगा (मंडोवरावरील शिल्पांची पट्टी) यांनी सजलेली आहे. अधिष्ठान, साध्या दोन पट्टय़ा, त्यावर पुष्पपट्टी, त्यावर पद्मपट्टी, पुन्हा पुष्पपट्टी यांनी युक्त आहे. मंडोवरावर तिन्ही बाजूस देवकोष्टात शैव प्रतिमा आहेत आणि अर्धस्तंभांची रचना आहे. अर्धस्तंभांच्या मधल्या जागेत सुरसुंदरीची सुंदर शिल्पे आहेत. तब्बल बावीस प्रकारचे सुरसुंदरींचे आविष्कार येथे प्रगटले आहेत. कोणी सौंदर्यवती स्वत:चे प्रतििबब आरशात न्याहाळते आहे, डाव्या हातात आरसा, उजवा हात वर उचललेला, डौलाने माथ्यावरची िबदी नीट करते आहे, कोणी वात्सल्यमूर्ती मातृका रडणाऱ्या मुलाला जोजवणारी, कोणी वेणुवादिनी, कोणी नृत्यमग्न, तर कोणी हातातील तालवाद्य वाजविण्यात मग्न असणारी, कोठे विषकन्या, डाव्या हाती कपाल, उजवा हात डोक्यावर उचललेला आणि तिच्या पायाला सर्पाचा विळखा, कुठे धनुर्धारी रंभा-डाव्या हातात इक्षुदंडाचे धनुष्य, उजव्या हातात पुष्पबाण, पायाशी एक सेवक, जिच्या मनगटावर पोपट बसला आहे अशी शुकसारिका यातील एक प्रतिमा थोडी परकीय पद्धतीची असणारी, केशभूषा, कर्णफुले ही भारतीय वाटत नाहीत. अशी विभिन्न अवस्थेतील असे नाना शिल्पाविष्कार केवळ विलोभनीय असेच आहेत. विघ्नहर्ता गणेश आणि चामुंडा यांची शिल्पेही अशीच लक्षवेधी आहेत. मंदिराच्या दक्षिण बाजूस देवकोष्टात नृत्यभैरव आहे. त्याचे डाव्या गुडघ्याखाली तालवाद्य वाजवत असणारा गण आहे. भैरवाच्या एका हाती त्रिशूल तर दुसऱ्या हाती खट्वांग आहे. देवकोष्टाच्या मखरावर ब्रह्मा, विष्णू, महेश यांची स्थापना केलेली दिसते. हा सर्वच शिल्पसमूह अवर्णनीय असाच आहे.
या मंदिरावर उंच शिखरेवरती हेंद्री कझिन्स याने १८८०मध्ये या मंदिराचे काढलेले चित्र उपलब्ध आहे. त्या चित्रात या शिखरांची आणि त्यामुळेच मंदिराची मूळ भव्यता लक्षात येते. अर्थात, तीनपैकी दोनच शिखरे तीही ढासळण्याच्या अवस्थेत असणारी त्या छायाचित्रात दिसून येतात. मूळची शिखरे नंतर पूर्णपणे पडून गेली. अवशेष रूपात राहिलेली शिल्पे काढून टाकण्यात आली. नंतर या शिखरांच्या जागेत चुना आणि विटांचा वापर करून सध्या दिसणारी गोलाकार पाच शिखरे तयार करण्यात आली.
नदीच्या काठावर घाटाच्या साधारणपणे मध्यावर दोन दगडी बांधणीतील मंदिरे आहेत. त्यातील एक शेषनारायणाचे आहे, तर दुसऱ्या अर्धवट पडलेल्या मंदिरात सध्या कोणतीही मूर्ती नाही. गावकऱ्यांनी परिसरात पडलेल्या अनेक भग्नावशेषांचे प्रयत्नपूर्वक जतन केलेले आहे. असाच एक दगडी खांब मंदिरापुढे उभा केलेला दिसतो. त्यावर एक शिलालेख आहे. मात्र आता त्यावरील अक्षरे पूर्णपणे पुसट झाली असून वाचता येत नाहीत.  
गेली काही शतके ऊन, वारा, पाऊस यांच्याशी झुंज देत ही सौंदर्यपूर्ण वास्तू उभी आहे. त्याचा साहजिकच परिणाम झाल्याचे आढळते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच गाभाऱ्याजवळील एका तुळईला तडा गेलेला आहे. दोन्ही ठिकाणी पूर्वीच कधीतरी प्रत्येक ठिकाणी दोन दगडी खांबांचे आधार या तुळयांना देण्यात आलेले आहेत. मंदिराच्या दर्शनी भागातही काही ठिकाणी चिरे निखळल्याचे दिसून येते. तर काही शिल्पे आपले मूळचे सौंदर्य हरवून बसली आहेत. ही वास्तू पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असली तरी त्याचे विशेष लक्ष या वास्तूकडे असल्याचे दिसत नाही. मंदिराच्या सभोवताली दगडी फरशी बसविणे, तसेच ढासळलेली दगडी तटबंदी नव्याने बांधणे अशी कामे या खात्याकडून सुरू आहेत. मात्र आपले सौंदर्य हरवू लागलेल्या शिल्पांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी या खात्याने अद्यापपर्यंत तरी कोणते प्रयत्न केल्याचे आढळून येत नाहीत.