|| डॉ. मिलिंद पराडकर

हेमाद्रीच्या ‘चतुर्वर्गचिंतामणि’ या ग्रंथामध्ये यादवांची संपूर्ण वंशावळ दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सुबाहूचा पुत्र दृढप्रहार हा या घराण्याचा मूळ पुरुष द्वारकेकडून दक्षिणेत आला व राज्य स्थापून श्रीनगर (सिन्नर, जि. नाशिक) ही त्याने आपली राजधानी म्हणून निवडली. तर जिनप्रभसुरिकृत ‘नासिक्यकल्पा’मध्ये नमूद केलेल्या यादवांच्या काही कोरीव लेखांमध्ये दृढप्रहार हा द्वारकेकडून येऊन चंद्रादित्यपूर – चांदवड, जि. नाशिक, येथे स्थायिक झाला, असे वर्णन आढळते, अन् या दृढप्रहाराचा मुलगा पहिला सेऊणचंद्र याने ही राजधानी सिन्नर येथे हलविली असेही हे कोरीव लेख म्हणतात. एक गोष्ट मात्र खरी की, यादव घराण्याच्या पहिल्या राजधान्या या नाशिक परिसरात होत्या.

मध्ययुगातला एक अतिशय दुर्गम अन् बुलंद दुर्ग याच दृष्टीने देवगिरीकडे पाहावे लागते. दुर्ग म्हणून या स्थळाची निवड त्याचे वास्तुशास्त्र अन् बांधकाम या सर्वच बाबतींत हा दुर्ग बेजोड आहे. इ.स.च्या नवव्या शतकात सेऊणचंद्रानं स्थापन केलेल्या चिमुकल्या राज्याचे ज्या साम्राज्यात रूपांतर झाले, त्या यादव साम्राज्याची ही राजधानी. मुसलमानांच्या दक्षिणेवरच्या आक्रमणापूर्वीची ही शेवटची स्वायत्त, स्वतंत्र अशी राजधानी. हेमाद्रीने देवगिरी वसवण्याचे श्रेय पाचव्या भिल्लमास दिले आहे.  मात्र, त्याच्या कोरीव लेखात तडवलगे- जि. विजापूर, कर्नाटक हे त्याचे वास्तव्याचे स्थान असे म्हटले आहे यावरून असे म्हणता येते की, प्रारंभीच्या काळात त्याचे वास्तव्य तडवलगे इथे असावे अन् नंतर त्याने देवगिरीच्या भौगोलिक वैशिष्टय़ांवर फिदा होऊन, राजधानी या दृष्टीने देवगिरीची निवड केली असावी. भिल्लमाचा वारस जैतुगीने हे काम पूर्ण करून आपली राजधानी इथे हलवली. मात्र, दुर्ग म्हणून याचे अस्तित्व बहुधा राष्ट्रकूट, चालुक्य यांच्या काळापासून असावे असे मानण्याला, या दुर्गाच्या बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडल्या कडय़ातली लेणी आधार देतात. दुर्गाच्या मार्गाच्या जाळ्याला पूरक असणारी ही लेणी सहाव्या आणि सातव्या शतकातील आहेत.

सहा-सातशे फुटांच्या एका निमुळत्या टेकडीला तट, बुरूज, खंदक, भुयारे, अशा नाना आभूषणांनी सजवून हा दुर्ग स्थपतींनी रचला आहे. देवगिरी भोवतालच्या डोंगरांपासून काहीसा दूर अन् एकटा आहे. सर्वात बाहेर पायथ्याभोवताली खंदक. त्यानंतर अतिशय भक्कम अशी तटबंदी. बालेकिल्ला अन् ही तटबंदी यांच्या दरम्यान तटबंदींच्या अजून दोन रांगा. बालेकिल्ल्याचा सुमारे पावणेदोनशे फूट कडा छिन्नी चालवून गुळगुळीत केलेला. ज्यामुळे बालेकिल्ल्यावर आक्रमण करणे तत्कालीन युद्धशास्त्र व युद्धसाहित्याच्या दृष्टीने अतिशय दुष्कर होते.

या ठिकाणी एक विचार नमूद करावासा वाटतो की, ज्या काळी असा कडा तासणारे, अतक्र्य अशा भुयारांची रचना करणारे स्थपती अस्तित्वात होते, अशा काळात म्हणजेच चालुक्य वा राष्ट्रकूटांच्या राजवटीतच या टेकडीचे दुर्गात रूपांतर झाले असावे. लेण्यांच्या जोडीने या अशा अश्मशिल्पांचे अस्तित्व यावर शिक्कामोर्तबच करते. याशिवाय अजिंठा अन् वेरूळच्या लेणीसमूहाचे साहचर्यसुद्धा या तर्कास दुजोराच देते.

विश्वकर्मा वास्तुशास्त्रात कूर्मदुर्गाचे वर्णन आहे, विश्वकर्मा म्हणतो :

प्ररलोभनाय शत्रूणां स्तंभनाय च युक्तित:॥ ३१॥

वनमध्ये गिरेस्सानौ कल्पितं कूर्मदुर्गकम्।

इष्टिकाभिर्दारुखण्डैश्चणवस्त्रपटादिभि:॥ ३२॥

प्रच्छन्नमार्गसंयुक्तं कल्पनं यंत्रगíभतम्।

पंचषस्सालकैर्युक्तं पंकाद्यौश्च समन्वितम्’॥ ३३॥

यात, छन्नमार्गानी म्हणजे गुप्त मार्गानी व फसव्या यंत्रांनी युक्त असा, पाच तटांच्या रांगांनी व सभोवतालच्या दलदलीने वेढलेला, वनाच्या मधोमध असलेला टेकडीवर वसलेला तो कूर्मदुर्ग समजावा असे विश्वकर्मा म्हणतो. हे वर्णन देवगिरीच्या दुर्गास बरेचसे लागू पडते.

सह्यद्रीच्या अतिशय कठीण अशा कातळातून कोरून काढलेली गुंतागुंतीची अन् फसवी भुयाररचना हे देवगिरीच्या मध्ययुगीन दुर्गाचे एक अद्वितीय असे वैशिष्टय़ मानावे लागेल. या पद्धतीची संपूर्णपणे संरक्षणप्रणालीवर बेतलेली रचना, महाराष्ट्रातील इतर कोणत्याही दुर्गावर असलेली निदान आज तरी ज्ञात नाही.

एका वैशिष्टय़ाची या ठिकाणी नोंद घ्यावीशी वाटते, अन् ते म्हणजे एका ठिकाणी दोन भुयारे जोडण्यासाठी एक प्रचंड लोखंडी तवा बसवला आहे. संरक्षणाची योजना अशी, की यावर लाकडे पेटवून त्यांचा होणारा धूर या भुयारांच्या साऱ्या माíगकांमध्ये पसरवून द्यायचा अन् यांस वारा पुरवण्यासाठी मार्गात एका झरोक्याचीही सोय करण्यात आली आहे. जेणेकरून त्यातून येणारा वारा पेटणाऱ्या लाकडांस हवा पुरवत राहील अन् त्याचा धूरसुद्धा भुयारांच्या जाळ्यात पसरवून देईल, ज्यामुळे आक्रमकांची दिशाभूल व्हावी. त्यांच्या आक्रमणाच्या गतीस प्रतिरोध व्हावा. ख्यातनाम दुर्गसंशोधक सिडनी टॉय यांच्या मते हे चूक आहे. ते म्हणतात की, या लोखंडी तव्याची जी जागा आहे, ती पूर्वी कितीतरी खालच्या बाजूस होती व तेथील हवेची कमतरता भरून काढण्यासाठी या खिडकीची जाणीवपूर्वक रचना करण्यात आली. आज हा लोखंडी तवा ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण हल्लीच्या काळात वर आणले गेले आहे.

अ‍ॅम्ब्रेशियाच्या वेढय़ात, सनपूर्व १९०च्या सुमारास रोमन सन्याने शहरापर्यंत खणलेल्या भुयाराचा उपयोग त्यांच्यावरच उलटून टाकण्यासाठी अशाच प्रकारची युक्ती लढवून केला, असे तत्कालीन इतिहासकार पॉलिबिअसने नोंदवून ठेवले आहे.

आजचे देवगिरी शहर बहुधा यादव काळात वसलेले असावे. उत्तम दुर्गाच्या कुशीत महत्त्वाची शहरे वसतात. या मध्ययुगीन सिद्धांताचे अजून एक उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळते. इतर उदाहरणं द्यायचीच झाली तर बीदर, विजापूर, गोवळकोंडा, सोलापूर, दिल्ली अशीसुद्धा देता येतील. देवगिरी हे त्यातले एक सर्वोत्तम उदाहरण ठरावे. कारण इथे दुर्गाचा विचार सुरू आहे. अन् देवगिरी हा सर्वोत्तम गिरिदुर्ग आहे. मात्र नियमास अपवाद असावा त्यानुसार यापाशीही एक दोष आहे. प्रवेश करण्यास अन् बाहेर जाण्यासही यास केवळ एकच प्रवेशद्वार आहे, अन् याच त्रुटीने यादव साम्राज्याचा घात केला याला इतिहास साक्ष आहे!

यादव साम्राज्य लयाला गेले आणि दक्षिणेत पडलेला मुसलमानांचा पाय कायम रुतलेलाच राहिला. खिलजीने देवगिरीचे वारस असलेल्या शंकरदेव व हरपालदेवाची कत्तल केल्यानंतर देवगिरीलाच आपले बस्तान मांडले व याच दुर्गातून दक्षिणेचा कारभार चालवला. खिलजीच्या राजवटीच्या पोटातूनच चौदाव्या शतकाच्या मध्यावर बहमनी राजवटीनं जन्म घेतला. सुरुवातीची सत्तरेक र्वष गुलबग्र्याच्या दुर्गात काढल्यानंतर पंधराव्या शतकाच्या पहिल्या चतुर्थकात त्यांनी बीदरच्या तत्कालीन दुर्गात आपली राजधानी हलवली. बीदर शहराच्या उत्तरेच्या दिशेला उंचावत गेलेल्या ३०० फुटांच्या एका टेकडीवर हा बलदंड मध्ययुगीन दुर्ग रचलेला आहे. चौदाव्या शतकातील एक भरभराटलेले शहर म्हणून बीदरचे उल्लेख आढळतात. इतर तत्कालीन व्यापारी शहरांप्रमाणे या शहरालासुद्धा त्या काळात तटबंदी असावी, असं मानण्याला काहीच प्रत्यवाय नसावा. ही रचना नि:संशयपणे बहामनीच्या अगोदरच्या हिंदू राज्यकर्त्यांची. इथे असेही म्हणता येईल की, ज्या काळात लेणी कोरण्याची वा अश्मशिल्पे साकारण्याची कला अस्तित्वात होती, त्याच कालावधीत बीदरच्या दुर्गाचा जन्म झाला. हा कालखंड साधारणत: नवव्या शतकापर्यंत मागे नेता येतो. हेच बीदरच्या मांडू दरवाजातील भुयारांच्या रचनेबाबतही म्हणता येईल. मात्र आज जे बांधकाम वा दुर्गरचना दिसते ती नि:संशय बहामनी राजवटीच्या काळातली. बहामनी राज्यकर्त्यांनी आपली राजधानी गुलबग्र्याहून बीदरला १४२० ते १४३०च्या दशकात हलवली, त्या सुमारास हे बांधकाम झाले असावे.

दिल्ली दरवाजापासून ते तीन दरवाजापर्यंत खडकातून कातून काढलेला तिहेरी खंदक. ज्या ठिकाणी कमकुवत जागा, त्या ठिकाणी ५० फूट रुंदीचा तर इतर ठिकाणी १७ ते २० फूट रुंदीचा अतिशय मजबूत असा तट. काही ठिकाणी या तटाची उंची ४५ फुटांपर्यंत. तटामध्ये काही ठरावीक अंतरांवर असलेले अतिशय दणकट असे ३७ बुरूज. प्रत्येक बुरुजावर मोठाल्या तोफांसाठी जागा. दुर्गातही तोफांसाठी रचलेले दमदमे. दिल्ली दरवाजा, कल्याणी दरवाजा, कर्नाटक दरवाजा, तीन दरवाजा, मांडू दरवाजा अन् कलमडगी दरवाजा असे सहा अतिशय भक्कम दरवाजे या दुर्गाच्या तटबंदीमध्ये रचलेले आहेत. याशिवाय बालेकिल्ल्यात जाण्यासाठी असलेला दरवाजा वेगळा. यांपकी तीन दरवाजा हे काहीसे वेगळे बांधकाम. बीदर शहरातून दुर्गात येणारी ही एकमेव वाट. त्यामुळे याचे वेगळे सक्षमीकरण करणे हे ओघानेच आले. पहिल्या द्वाराच्या बाहेर तिहेरी, दगडी खंदक आहे अन् दारांच्या दोन जोडय़ा आहेत. या द्वारजोडीच्या मधल्या मोकळ्या चौकात पहारेकऱ्यांच्या देवडय़ा आहेत. दुसऱ्या दरवाजाच्या माथ्यावर नगारखाना आहे. माथेपट्टीवर उठावदार व्याघ्रप्रतिमा आहेत. हेसुद्धा या दुर्गाचे विशेष म्हणावे लागेल. अशा प्रकारच्या व्याघ्रप्रतिमा सहसा कुठेही आढळत नाहीत.

निरनिराळ्या राजवंशांनी आपापल्या आवडीची प्रतीकचिन्हे आपापल्या राजवटीत वापरात आणली. राष्ट्रकूट राजांच्या कोरीव लेखांवर विष्णूचे वाहन गरुड आढळतो, तर त्यांच्या काही लेखांच्या मुद्रांवर योगी स्वरूपात असलेला शिव आढळतो. त्यांच्या ताम्रपटात शिव व विष्णू या दोघांचीही प्रार्थना केलेली आढळते. यादव राजांनी आपल्या ताम्रपटांवर व शिलालेखांवर विविध प्रकारची चिन्हे कोरलेली आहेत. या चिन्हांमध्ये कमळ, शंख, लिंग, पुजारी, सवत्स धेनू, सूर्य, चंद्र, वृषभ, हात जोडलेला गरुड, कलश, मिटून घेतलेले छत्र, कमंडलू अन् पळी ही चिन्हे बऱ्याच ठिकाणी आढळतात. गरुड हे कोल्हापूरच्या शिलाहारांचे आवडते चिन्ह आहे. परंतु राजा विजयादित्याचा शक संवत १०६५ चा कोल्हापूर शिलालेख व शक संवत १०७३ चा बामणी शिलालेख यांच्या शिळांवर अग्रभागी पद्मासन घालून सन्मुख बसलेली जिनाची आकृती, त्याच्या मागे सात फणांचा नाग, डाव्या बाजूस सवत्स धेनू, उजव्या बाजूस वक्राकार तलवार आणि या सर्वाच्या वर डावीकडे सूर्य व उजवीकडे चंद्र कोरलेले आहेत.  मात्र या चिन्हांत व्याघ्राचा अंतर्भाव कुठेही नाही. असेच आणिक एक वेगळे उठावचिन्ह पन्हाळ्याच्या तीन दरवाजामधील तिसऱ्या दरवाज्याच्या माथेपट्टीवर कोरलेले आहे. यात मध्यभागी दगडात कोरलेला गणपती आहे अन् त्याच्या दोन्ही बाजूंस हत्तींवर झेप घेऊन त्यांस पायांतळी तुडवणारे दोन मोठाले सिंह आहेत. असेच एक चिन्ह राजगडाच्या आळूदरवाजाच्या  आतल्या बाजूच्या तटिभतीवर कोरलेले आहे. मात्र तेथे हत्तीऐवजी हरीण दाखविलेले आहे. नेहमी दुर्गद्वारांवर दिसणाऱ्या शार्दूल किंवा गंडभेरूंडाच्या शक्तिचिन्हांपेक्षा हे चिन्ह निश्चितच वेगळ्या पद्धतीचे आहे. याच द्वाराच्या दुर्गातल्या बाजूच्या माथेपट्टीवर दोन्ही बाजूंस पिसारा फुलवलेले मोर कोरलेले दिसतात. या पद्धतीचे मोराचे चिन्ह गोवळकोंडय़ाच्या महाद्वाराव्यतिरिक्त केवळ पन्हाळ्याच्या तीन दरवाजात कोरलेले आढळते. इतरत्र कुठेही नाही.

बीदरची शहरी वसाहतदेखील देवगिरीप्रमाणेच या दुर्गाच्या संरक्षणाच्या सावलीत वसलेली आहे. शहागंज दरवाजा, फत्ते दरवाजा, मंगळपेठ दरवाजा, दुल्हन दरवाजा अन् तालघाट दरवाजा, अशा ३ मल तटबंदीच्या घेऱ्यात असलेल्या पाच भक्कम दरवाजांनी या शहरात शिरायचे मार्ग नियंत्रित केले आहेत. १५ ते ६० फूट रुंदीच्या या तटबंदीमध्ये, योग्य अंतर राखत ३७ भलेभक्कम बुरूज आहेत. मुंडा बुरूज ते दुल्हन दरवाजा या दक्षिणेकडल्या भागात ३०-३५ फूट खोलीचा अन् ५० फूट रुंदीचा खंदकसुद्धा शहराच्या संरक्षणासाठी निर्मिलेला आहे. फत्ते दरवाजा हे या शहरात प्रवेश करण्याचे मुख्य द्वार. औरंगजेबाने १६५६ साली हा दुर्ग कल्याणीच्या दुर्गासमवेत जिंकला, तेव्हा या द्वारास हे नाव दिले. अतिशय दणकट बांधणीच्या या द्वारात शिरण्यासाठी, खंदकावर ओढून घेता येणाऱ्या पुलाची सोय केलेली होती.

‘चौबारा’ हा ७० फूट उंचीचा, बुंद्धयाकडे ३५ फूट व्यास असलेला अन् वर निमुळता होत जाणारा टेहळणी-मनोरा हे बीदरच्या दुर्गाचे आणिक एक वैशिष्टय़ आहे. दोन रस्ते एकमेकांना छेदतात, त्याच ठिकाणावर हे बांधकाम आहे, म्हणून बहुधा याचे नाव चौबारा पडले असावे. या दुर्गात पाण्याची कुंडे आहेत, बालेकिल्ल्यात व खालच्या दुर्गातही पाण्याची कमतरता कुठेही जाणवू दिलेली नाही. एका बलाढय़ शासनाची राजधानी म्हणून या दुर्गाची निवड यथार्थ अशीच म्हणावी लागेल!

इ.स. १५२७मध्ये बहामनी पातशाहीचे तुकडे उडाले अन् दख्खनच्या पांच शाह्य जन्माला आल्या. या पाचांपकी  विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंडय़ाची कुतुबशाही या तिघांनी बऱ्यापकी तग धरला. या तिघांपकी शिवछत्रपतींमुळे आदिलशाही आपल्या सगळ्यांच्याच बऱ्यापकी परिचयाची झाली. स्वराज्याच्या उभारणीच्या काळात शिवछत्रपतींना या शाहीशी अनेक वेळा पंजेफाड करावी लागली. या आदिलशहांच्या राजधानीचा दुर्ग विजापूर.

या दुर्गाच्या बालेकिल्ल्याच्या महाद्वाराच्या डावीकडल्या बाजूला असलेला शिलालेखच सांगतो की, हे स्थळ चालुक्यांच्या अमलाखाली असताना ‘विजयपूर’ या नावाने विख्यात होते. हा शिलालेख भूलोकमल्ल सोमेश्वर दुसरा याच्या काळातील, म्हणजे इ. स. १०७४ या वर्षीचा आहे. यातून आपल्याला कळते की, हे स्थळ – विजयपूर – तद्र्देवाडी १००० या जिल्ह्यत होते, अन् राजाचा दंडनायक नक्कीमय्य याच्या अधिपत्याखाली होते. विजयपूरमधील श्रीस्वयंभू सिद्धेश्वराच्या देवालयाच्या निर्मितीसाठी विज्जनहळ्ळी येथील जमिनीच्या दानाचा उल्लेख या शिलालेखात केलेला आहे.

या दुर्गाच्या प्राचीनत्वाचे आणिक एक गमक आहे : विजापूरच्या बालेकिल्ल्याच्या द्वारातील पहारेकऱ्यांच्या देवडय़ांचे खांब हे या स्थानी प्राचीन काळी असलेल्या देवळांचे आहेत. तसे स्पष्ट उल्लेख तेथील द्वारात असलेल्या कानडी शिलालेखांमध्ये आहेत. विजापूरचा हा दुर्ग बिचकनहळ्ळी या प्राचीन गावाच्या जागी उभारलेला आहे. उत्तरकाळात आदिलशाही राज्यकर्त्यांनी दोनदा या दुर्गाचे नाव बदलायचा प्रयत्न केला. इ. स. १६०३ मध्ये दुसऱ्या इब्राहिम आदिलशहाने याचे नाव ‘बद्यापूर’ असे ठेवले अन् महंमद आदिलशहाने याचे नाव ‘मुहंमदपूर’ असे ठेवले.

तत्पूर्वी बहामनींच्या अधिपत्याखाली असलेला हा दुर्ग इ. स. १४९० साली युसुफ आदिलखान नावाच्या बहामनी सरदाराने बहामनींचे स्वामित्व झुगारून, स्वत:ची राजधानी म्हणून मुक्रर केला. त्याअगोदर विजापूर हे बहामनींचे जिल्हा मुख्यालय होते. मात्र त्यानंतर आदिलशाही राजवटीची राजधानी म्हणून जवळजवळ दोनशे वर्ष या दुर्गाने आपला दिमाख मिरवला. या दुर्गाच्या इतिहासातला हा सर्वात वैभवशाली कालखंड ठरला. आज या दुर्गात अन् या दुर्गातील शहरात असलेल्या साऱ्याच भव्य अन् वैभवशाली इमारती व बांधकामे ही सारी याच कालखंडात निर्माण झालेली आहेत.

साडेसहा मलांचा घेरा असलेला हा दुर्ग सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात निर्मिला गेला. या दुर्गाच्या तटबंदीचा खर्च काहीशा वेगळ्या प्रकारे केला गेला. या संपूर्ण घेऱ्याचे भाग पाडले गेले व या प्रत्येक भागाचा खर्च शहरातील नामांकित व्यक्तींकडून करून घेतला गेला.

तीस ते पस्तीस फूट जाडीची अन् तेवढय़ाच उंचीची ही तटबंदी आतून व बाहेरून अनघड दगडांची आहे व मधल्या जागेत मुरूम माती ठासून ठेचून भरलेली आहे. या घेऱ्यात एकशेसहा बुरूज आहेत.  तर सिडनी टॉय यांच्या मते शहाण्णव.  शिल्पशास्त्रावरील ‘जयपृच्छा’ या विख्यात ग्रंथामध्ये बाहूंच्या अथवा बुरुजांच्या संख्येच्या प्रमाणात दुर्गाची नावे दिलेली आहेत. दर चार बुरुजांच्या वाढत्या क्रमानुसार ही नावे बदलत जातात. त्यात एकशे सहा बुरुजांच्या दुर्गास मुकुटदुर्ग असे संबोधित केलेले आहे. मुकुट हे राजाचे शिरोभूषण. विजापूरचा दुर्ग हा राजधानीचा दुर्ग- जणू ते राजाचे शिरोभूषण म्हणायचे. मग तत्कालीन शिल्पशास्त्रांनी ते शिल्पशास्त्राच्या प्रचलित संकेतांनुसार बांधले असणे अगदी शक्य आहे. या संपूर्ण तटावरून फिरण्यासाठी भला प्रशस्त मार्ग आहे. हे अर्धवर्तुळाकार आकाराचे प्रचंड बुरूज बहुतांशी समान अंतरावर आहेत. तटबंदीच्या माथ्यावर कमानदार पाकळ्यांच्या आकाराचा परकोट आहे. त्यात जंग्यांची रचना आहे. आतल्या बाजूला एकच छिद्र, मात्र बाहेरच्या दिशांना, त्यांना दोन वेगवेगळ्या कोनांमध्ये माऱ्याच्या दिशा साधून दिलेल्या आहेत. ही या पद्धतीची रचना बहुतेक साऱ्याच मध्ययुगीन दुर्गावर आढळते. बऱ्याचदा दोनाच्या ऐवजी तीन किंवा चार माऱ्याचे कोन एकाच जंगीतून दिलेले आढळतात. कराडजवळच्या वसंतगडावरदेखील अशा प्रकारच्या जंग्या आहेत. या भक्कम तटाबाहेर आता काहीसा बुजलेला, दगडातून कातून काढलेला खंदक आहे. काही बुरूज, तटबंदीपासून बाहेर नेत थेट खंदकात बांधलेले आहेत, ज्यामुळे दोन्ही बाजूंची तटबंदी लांब अंतरापर्यंत बुरुजांच्या माऱ्यात राहते. बांधकामाबाबतीतले हे काहीसे वेगळेपण विजापूरच्या तटबांधणीत आढळून येते.

या दुर्गास उत्तरेच्या दिशेस बहामनी दरवाजा, दक्षिणेस फत्ते दरवाजा, पूर्वेच्या बाजूस अलिपूर दरवाजा अन् पश्चिमेस शहापूर अन् मक्का दरवाजा असे पाच अतिशय मजबूत दरवाजे बांधलेले आहेत. याशिवाय अíकला दरवाजा नावाचे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. या दुर्गातून अडीअडचणीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी चोरवाटांचीही रचना करण्यात आलेली आहे. दरवाजाच्या मजबुतीसाठी महाद्वारांच्या दोन्ही बाजूंस दोन बुरूज. खंदकावर ओढून घेता येणारा पूल अन् आतल्या बाजूस दोन्ही अंगांस पहारेकऱ्यांच्या देवडय़ा अशीच फत्ते दरवाजावगळता साऱ्या दरवाजांची रचना आहे. फत्ते दरवाजात शिरताच प्रवेश होतो एका भल्या मोठय़ा, वरून मोकळ्या असलेल्या बुरुजात, अन् मग डावीकडे वळत, दुसऱ्या महाद्वारातून मार्ग आतमध्ये शिरतो. हेही विजापूरचे एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल.

विजापूरच्या मध्यभागी असलेल्या बालेकिल्ल्यात शिरायच्या दरवाजाची बांधणीही अशीच वैशिष्टय़पूर्ण आहे. या दरवाजावर आदिलशाहीच्या काळात जरी काही संस्कार झालेले असले, तरी या बांधकामाचा मूळ ढाचा िहदू पद्धतीच्या बांधकामाचा आहे. त्या ठिकाणी असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवडय़ांचे स्तंभ हे अगदी वैशिष्टय़पूर्ण असे िहदू स्थापत्य आहे.

बालेकिल्ला हे खाशांच्या वस्तीचे ठिकाण. त्यामुळे या दुर्गातील बहुतेक देखण्या वास्तू याच भागात आहेत. अदालत महाल, चिनी महाल, आनंद महाल, आसर महाल, गगन महाल, सातमजली गोल घुमट, जामा मशीद यांसारख्या वास्तू आदिलशाहीचे ऐहिक अन् शिल्पवैभव मोठय़ा दिमाखाने मिरवतात. मात्र मक्का दरवाजासमीप असलेल्या ताज बावडीच्या पायऱ्यांच्या एका कोपऱ्यात पायऱ्यांचाच एक भाग असलेली हिंदू देवतांची भग्न शिल्पे या मुसलमान सुलतानांच्या धार्मिक असहिष्णुतेचा शतकानुशतकांचा मन बधिर करणारा इतिहास याच वेळी आपल्यापुढे मांडत असतात!

discover.horizon@gmail.com