अगदी खेडेगावातील लहानशा घरापासून, मोठमोठय़ा महानगरातील मोठय़ा हवेल्यांमध्ये राहणाऱ्या प्रत्येकालाच वाटतं, आपली राहण्याची जागा ही छान नीटनेटकी, स्वच्छ, सजवलेली अशी असावी. चारचौघांत आपले घर उठून दिसावे. श्रीमंत लोक त्यासाठी खास तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करून भरपूर पैसे खर्च करून आपले घर, बंगला, हवेली सजवतात. त्यासाठी खास खरेदी करतात. ज्याची त्यासाठी फार पैसे खर्च करण्याची ऐपत नाही, तो आपल्या ऐपतीप्रमाणे, आवडी प्रमाणे आपलं घर सजवतो. हातात भरपूर पैसा असला की, सजावट हात सैल सोडून करता येणे तसे सोपे असते; पण ओढगस्तीच्या संसारात घर सजावट, ही मर्यादित पैशात करणे ओघानेच येते.

पूर्वी एक-दोन खोल्यांमध्ये राहणारी गृहिणी आपल्या घरातले पितळेचे डबे लखलखीत करून, छान फळीवर मांडून ठेवायची. त्यात पाणी भरून ठेवायची, हंडे-कळशांची उतरंडसुद्धा घराचं देखणेपण वाढवायला मदत करत असे. दोन खोल्यांमधला एक माणूस जा-ये करू शकेल असा लहान दरवाजासुद्धा असे. तो हाती विणलेल्या सुंदर रेखीव तोरणांनी सुशोभित केलेला असे. रंगीत काचेच्या बारीक नळय़ा आणि मणी ओवून केलेलं दरवाजाचं तोरण, प्रत्येक हालचाली दरम्यान, मंजूळ किणकिण नाद करायचा की घराचं वातावरण अगदी नादमधूर होऊन जात असे. बाहेरच्या खोलीला- ती एवढीशी खोली, पण तिचासुद्धा बैठकीची खोली म्हणून दर्जा वाढायचा.

अशा लहान घरात बहुतेक फर्निचर हे घडीचं म्हणजेच फोल्डिंगचं- तेसुद्धा जितकं आकर्षकरीत्या मांडता येईल तितकं मांडलं जात असे. प्रत्येक वस्तूला कव्हर करायची कोण हौस! म्हणजे खुच्र्याच्या पाठींना कव्हर, टेबलफॅनला कव्हर, रेडिओ घेतला तरी त्याला छानसं कव्हर शिवायचं, हौसेनं घेतलेलं शिवणाचं पाय मशीन, हात मशीन असली तर तिलाही लगेच कव्हर शिवून घालायचं.

छोटीशी का होईना एखादी लाकडी शोकेस असायची. त्यात हमखास एवढासा ताजमहाल असायचा. कोणीतरी कन्याकुमारीहून आणलेला मोठा शंख असायचा, िशपल्याने बनवलेले लहान लहान प्राणी असायचे, एखादा चिनी मातीचा इवलासा टी-सेट असायचा, छोटासा शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा असायचा, लहान आकाराची रंगीत गणपतीची मूर्ती असायची, स्पर्धेत मिळालेले कप असायचे, सोनचाफ्याची फुलं भरून ठेवलेली सीलबंद बाटली असायची.

आलेली पोस्टकार्ड, लग्नपत्रिका, लाइटची बिलं एका बाजूला साठवून ठेवलेली असायची. निकामी इलेक्ट्रिक बल्ब, त्याच्या वरच्या बाजूचा भाग कोरून आतल्या तारा वगैरे सर्व काढून टाकून, त्याला दोरीचं शिंकाळ तयार करून त्या पारदर्शक बल्बमध्ये रंगीत पाणी भरलं जायच्रं असे दोन-चार रंगीत गोळे घरात कुठे कुठे टांगलेले असायचे. एका घरात मी त्या बल्बमध्ये पाण्यात इवलासा रंगीत जिवंत मासा फिरताना पाहिला होता. त्यावरून आठवलं, पूर्वी असे लहान जिवंत मासे असलेले बल्ब विकणारे फेरीवाले कधीकधी रस्त्यावर दिसायचे.

पूर्वी भिंतीवर लावण्यासाठी उडणारे तीन-चार लाकडी बगळे मिळायचे, ते भिंतीवर असे लावायचे की ते दूर दूर कुठेतरी लांब, ज्या भिंतीची लांबी जेमतेम आठदहा फुटावर संपणार आहे अशा भिंतीवर एका मागोमाग एक असे उडत निघाले आहेत. त्या काळी लग्नाच्या रुखवतात कपडय़ांना लावायच्या पांढऱ्या बटनांचा ससा, त्याच्या डोळय़ाच्या जागी लाल चुटूक मणी असलेली काळय़ा कपडय़ावर तयार केलेली फ्रेम मिळायची. किंवा रंगीत पिसांनी भरलेला कोंबडा किंवा माशांचे पांढरे चकचकीत खवले चिकटवून बनवलेल्या चित्राची फ्रेम. अशा कलाकुसरीच्या फ्रेम, भिंतीवर भिंतीची शोभा वाढवण्याचे काम करायच्या.

वर म्हटल्याप्रमाणे, बहुतेक फर्निचर हे फोल्डिंगचं असायचं. त्यात फोल्डिंगची लोखंडी कॉट हमखास असायची, त्यावर गाद्या टाकून दिवसभर बसायला, झोपायला सोफा कम बेड होऊन जायची. अशा कॉटवर एखादी छानशी सोलापुरी चादर घट्टपणे खोचून, चापूनचोपून बसवलेली असायची. नंतर खास समारंभात फरशीवर अंथरायला आणि इतर वेळी कॉटवर पसरायला गालीच्यासारख्या, पण खिशाला परवडतील अशा देखण्या चादर-कम- गालीचे मिळू लागले. त्याच्या चारी बाजूंनी वेलबुट्टी आणि मध्यभागी सिंह, वाघ किंवा हत्तीचं कुटुंब छापलेलं असायचं. या चादरी कम गालीचे बहुतेक पिवळय़ा रंगाचे असायचे. ज्यांच्याकडे मुलगी बघायचा म्हणजे वधू परीक्षेचा कार्यक्रम असायचा अशा बिऱ्हाडात बैठक सजवायला अशा गालीच्यांची देवाणघेवाण होत असे.

थोडक्यात, गरिबांपासून गडगंज श्रीमंतांच्या घरापर्यंत सर्वानाच आपल्या घराला प्रेमाची ऊब असावीच, पण तो उबदारपणा छान सजवलेला असावा, ही भावना मात्र सारखीच असते.

gadrekaka@gmail.com