कुहूँ-कुहूँ कोकिळेचा स्वर कानी आला आणि मला चाळीतल्या अंगणातील चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला. माझ्या बालपणीच्या म्हणजे साधारण ५०-५५ वर्षांपूर्वीच्या कल्याणमधील शिवाजी चौकातील चाळीची आठवण झाली.
आमच्या चाळीत सलग १४ खोल्या म्हणजे एक पुढची एक मागची स्वयंपाक खोली, मागे अंगण आणि पुढे १० बाय १० चा ओटा- तोही १४ खोल्यांचा सलग आणि त्याच्या पुढे मोठे अंगण. त्या अंगणात धावपळ करून खेळायला खूपच मज्जा यायची. हल्लीच्या मुलांचे ते अंगण कुठे बरं हरवलंय! इथे तर प्रत्येकाचे आपले अंगण त्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे त्यांची फळे यांची खूपच मजा होती.
अंगणाची देखभाल मोठय़ांपासून लहानांपर्यंत सर्वजण करीत. पावसाळ्याचे चार महिने संपले की, प्रथम अंगण खणून माती सारखी केली जात असे. नंतर अंगणाच्या कडेला तिरप्या विटा लावल्या जात. मग पाणी शिंपडून चोपण्याने (हे चोपणे लाकडाचे असे. बॅटसारखे, पण खालून पसरट) चोपून सारखे करून घेतले जायचे. नंतर आम्ही मुले आठवडी बैलबाजारातून शेण गोळा करून आणायचो. हल्लीची मुले त्या शेणाला हातही लावणार नाहीत. मग आजी किंवा आई बादलीत ते शेण पातळ करून शिंपून घेत. ते वाळले की त्यावर लाल मातीने सारवण करीत आणि मग सुरेखशी अंगणभर रांगोळी काढली जात असे.
उन्हाळ्यात अंगणात खाटेवर पापड, करडय़ा, चिंच, लाल माती लावलेले वाल अशी वर्षांची बेगमी वाळवून ठेवत. त्यातली चिंच मात्र बरेच वेळा आम्ही मुले पळवत असू. त्या वाळवणाची राखण करायची ती मुलांनी. चाळीत गुजराती बिऱ्हाडे होती. त्यांनी बरणीत भरून ठेवलेला मोरावळा, लोणचे, मुरंबा उन्हात ठेवलेला असे. हल्ली तर या वस्तू हॉलमध्ये व बाजारात रेडिमेड मिळतात, पण तेव्हाची मजा आज नाही.
हेच अंगण उन्हाळ्यात खाटेवर अंथरूण टाकून आभाळीच्या चांदण्या मोजत व आजीची गोष्ट ऐकत झोपी जात असे. चाळीच्या फाटकाजवळ रातराणीची वेल होती, त्याचा सुगंध रात्री दरवळत असे आणि सारा आसमंत सुगंधाने भरून राहत असे.
चाळीत कुणाकडे लग्नकार्य असले की त्याची जेवणाची पंगत ओटय़ावर बसे आणि मांडत अंगणात असे. त्यांचे लग्नाचे पाहुणे ते सर्वाचे पाहुणे असत. मग मात्र एकमेकांशी असलेले भांडण व अबोला त्या लग्नकार्यात विरघळला जाई. चाळीत तुझे-माझे काहीच नव्हते. दुपारी मोठय़ांची नीजानीज झाल्यावर मुलांचे लपंडाव, सागरगोटे, कांचापाणी आणि अंगणात टिकोऱ्या, विटी-दांडू, गोटय़ा असे खेळ रंगत. खेळताना मुलांची आपापसात भांडणं होत. मग रडारड, मोठय़ांचा ओरडा आणि नंतर खेळ बंद!
पुढच्या अंगणात बागडल्यावर मागचे अंगण आहेच. या अंगणात तुळशी वृंदावनपासून अनेक प्रकारच्या लहान-मोठय़ा झाडांनी बहरलेली बाग. मागच्या बाजूला मोठय़ा जागेत बकऱ्यांचा आठवडी बाजार असे. चाळीची आणि बाजाराची हद्द यात एक भिंत होती. प्रत्येकाच्या दारापुढे एक त्रिकोनी कोनाडा होता. तिथे रोज संध्याकाळी आई सांज दिवा लावत असे. विहीरीजवळ तिच्याजवळ वड-पिंपळ होता. नंतर रोपट वास असलेली व छोटी-छोटी रंगीबेरंगी फुले असलेली रानटी झाडे होती. मोठे उंबराचे झाड होते, त्याची कच्ची-पक्की लालसर फळे खाली पडत. एक पेरूचे झाड होते. त्याबरोबर कर्दळी, पांढरा चाफा, तगर, अबोली, गुलछडी होती. आम्ही त्यांचे गजरे करीत असू किंवा देवांना हार केले जात. यात हजारी मोगरा, कांचन वृक्ष, मधु-मालतीचा वेल आणि त्याला येणारी भरघोस फुले. आमच्या शेजारी प्राजक्त होता. सकाळी उठल्यावर त्या फुलांचा सडा पाहून मन फुलून यायचे आणि या झाडांवरील घरटय़ात असणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाटाने मन प्रसन्न व्हायचे.
आमच्या दारात  राजेळी केळीचे झाड होते. शेजारी सीताफळाचे झाड होते. प्रत्येक बिऱ्हाडकरू संध्याकाळी झाडांना पाणी घाले व पुढे अंगणात सडा घातला जाई. येणाऱ्या मातीच्या मृद्गंधाने छान वाटे. आजही पहिला पाऊस पडल्यावर येणारा मृद्गंध मला मोहवून जातो. आणि हो, मागच्या दारी कृष्ण-कमळ, गोकर्णाचे वेल भिंतीवर चढवलेले होते. आई किंवा आजीबरोबर आम्ही मुलेही झाडांना पाणी घालणे, त्यांची काळजी घेणे हे आपोआप शिकलो.
माझे अंगण आणि झााडांविषयी लिहिताना लक्षात आले की, चाळीत अशी कितीतरी झाडे होती, ती आता सहजपणे दिसत नाही. हल्लीच्या मुलांना अंगणाचा आनंद मिळू शकत नाही. ती टूबीएचकेच्या संस्कृतीत बंदिस्त झाली आहेत. आजची पिढी स्वच्छंदीपणे बागडण्यास विसरली आहेत. म्हणून म्हणावेसे वाटते..
‘माझे अंगण- आनंदाचे कोंदण
माझे अंगण- सुरेख साठवण’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My house yard treasure of happiness
First published on: 22-02-2014 at 01:01 IST