घरांच्या भिंतीतील मायेचा ओलावा!

आचऱ्याच्या शाळेत जातायेताना घगयांच्या घराजवळून जावे लागे.

आत्माराम नाटेकर
आचऱ्याच्या शाळेत जातायेताना घगयांच्या घराजवळून जावे लागे. त्यांच्या पुढल्या दारच्या पडवीतल्या इवल्याशा पण देखण्या मूर्ती लक्ष वेधून घेत. हे रंग भरलेले गणपती पाहून चतुर्थी जवळ आल्याची चाहूल लागे आणि मग शाळेला दांडी मारून आम्ही घराच्या साफसफाईला लागायचो. आमच्या घराचे तोंड पूर्वेकडे होते. दारात पायरीचे भलेमोठे कलम होते. दक्षिणेच्या बाजूला मळा होता आणि खालच्या बाजूला मानकूलचे कलम. दोन्ही भल्यामोठय़ा कलमांच्या कवेत आमचे घर होते. घराच्या चारही बाजूनी जंगल वाढायचे.

घराभोवताली वाढलेले हे रान तासून काढताना फावडे बोथट होई. यात चांबारी, लाजरी, अळू, तेरडे आणि दिंडाही असे. काढलेले रान पुढल्या दारच्या गायरीत टाकावे लागे. आमचं घर नळ्यांचं होतं. दरवर्षी चतुर्थीला घराची सफाई ठरलेलीच. भल्यामोठय़ा वाडवणीने घराची झाडलोट करणे म्हणजे जिकिरीचे काम. घर झाडताना नळ्याखालचे कुसुरंडे अंगावर पडत. केव्हा केव्हा तर त्यांची कुसेही डोळ्यात जात आणि अंगाची काहिली होई. अनेकदा तर मी थयथयाट करायचो. मग आका माझ्या डोळ्यावर पाणी मारून डोळे साफ करी. कुसुरंडय़ांच्या तीन पिढय़ांचा उद्धार करूनच मी शांत होत असे. पुढच्या वर्षीपासून घर झाडणार नाही, अशी आकाला धमकी द्यायचो आणि वर्षभरातच मी घेतलेली शपथ विसरून पुन्हा घरसफाईला लागे. नळ्यांचे घर असल्याने पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती होई आणि साऱ्या भिंतींवर लांबलचक वरंगळ उठायचे. हे भलेमोठे वरंगळ रेव्याने सारवून घालवावे लागत.

मोठय़ा काकांनी आपणास वेळ मिळेल तशा घराच्या भिंती लिंपल्या होत्या. लिंपल्या कुठल्या एकावर एक मातीचे थर चढवले होते. त्यामुळे रेव्याचा तीनवेळा हात फिरवूनही भिंतींचे खाचखळगे बुजत नसत. काकांनी फावल्या वेळात या भिंती उभ्या केल्या होत्या. त्यामुळे प्लास्टर (सपाटीकरण) हा विषयच आम्हाला ठाऊक नव्हता. पुढल्या दारच्या पडवीतल्या भिंतीत अनेक बोवले होते. हे बोवले आणि चुलीकडचे फडताळ रंगवताना हातांना वेगळाच रंग चढायचा. चारचार वेळा रेवा काढूनही भिंत लालच होत नसे. धूर आणि लाल माती यांच्या मिश्रणाचा एक सुंदर रंग तयार होई.

खरी कसोटी असायची ती गणपतीची भिंत रंगवताना. कारण घराच्या सर्वच भिंती खडबडीत असल्याने चित्र काढताना फराटे यायचे. कमळाच्या पाकळ्या रंगवताना एकदोन पाकळ्या भिंतीतल्या खड्डय़ात उतरत आणि ते दहा पाकळ्यांचे कमळ अष्टदल होई. सर्वच भिंतींना असलेला खडबडीतपणा आका कल्पकतेने झाकायची. आपल्या नाजूक हातांनी आका भिंतीवर सुंदर स्वस्तिक काढी, तर काही भिंतींवर ओम. काही भिंतींवर आपल्या दोन्ही हातांचे सुबक पंजे उठवायची. भिंतींना बोलके करण्याची आकाची हातोटी वाखाणण्यासारखी होती. बोवला आणि फडताळाभोवताली सुंदर नक्षी काढून ते जिवंतकरायची.

आता आमचे घर स्लॅबचे आणि भिंती सिमेंटच्या झाल्या. बोवले आणि फडताळ भिंतीतच गडप झाले. कुसुरंडे पाहण्यासाठी आता समोरच्या बागेत जावे लागते. भिंतीतील पूर्वीची ओल आणि खाचखळगे आता राहिले नाहीत. मात्र आजही ५० वर्षांपूर्वीच्या गणपतीच्या दिवसांचे स्मरण झाले की आमचे नळ्याचे घर आणि त्या घराच्या खडबडीत भिंतीवर मायेच्या ओलाव्याचे शिंपण करणारी आका डोळ्यासमोर येते आणि माझे डोळे पाणावतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Painting walls houses idols ganeshotsav ssh