मित्रहो, पावसाळ्याने दमदार हजेरी लावली आहे. उन्हाळय़ाच्या वैशाख वणव्यानंतर पावसाच्या या शिडकाव्याने हवेत सर्वत्र हवाहवासा वाटणारा गारवा पसरला आहे. त्याचा आस्वाद घेत असतानाच तो त्याच्या रौद्ररूपाचे दर्शनही घडवीत असतो आणि नेमके तेच मुंबईतील लोक व कोकणवासी अनुभवत आहेत. गेले काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून मुंबापुरीची तुंबापुरी झाली आहे. सखल भागांत पाणी साठणे ही नेहमीचीच बाब आहे. वॉटर लॉगिंग, ट्रॉफिक जाम इ. बाबींचीही मुंबईकरांना चांगलीच ओळख आहे; परंतु मुंबईची लाइफ लाइन असणाऱ्या तिन्ही लोकलचे ट्रॅक जेव्हा पाण्याखाली जातात व ट्रेन्स बंद पडतात तेव्हा मुंबईकर धास्तावतो. नुकतीच सुरू केलेली उदंचन केंद्रे, ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हेसुद्धा पूर्ण क्षमतेने कार्य न केल्यामुळे होणारे लोकांचे हाल अमर्याद आहेत. अशा पूरग्रस्त परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन केंद्र (Disaster Management Center) यांचे कार्य खूप मोलाचे असते. वादळाने घरे, झाडे, वीजवाहक तारा पडून झालेले नुकसान इत्यादी बाबींचे Monitoring त्या केंद्राकडून केले जाते. पावसामुळे भिंतीत व घराच्या परिसरात ओल Dampness) येऊन शॉक लागण्याच्या घटनासुद्धा खूप घडतात, त्याबद्दलच येथे चर्चा करणार आहोत.
वीज आणि पाणी यांचा फार जवळचा संबंध आहे. कारण पाणी हे उत्तम वीजवाहक आहे. शेकडो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी संततधार पाऊस व विजेचा प्रचंड कडकडाट झाला होता असे ऐकिवात आहे. आजही सामान्य माणूस विजेविषयी नेहमीच भीती बाळगून असतो. ही वीज कशी निर्माण होते व सामान्यत: त्यापासून कुठले धोके संभवतात आणि त्यापासून संरक्षण कसे करावे, याची माहिती लोकांना असणे अत्यंत जरुरी आहे, म्हणूनच हा लेखप्रपंच.
पाऊसधारा सुरू असताना ज्या वेळी विजेचा कडकडाट होतो, त्या वेळी आकाशातील ढगांवरील विद्युतभार जास्त होतो आणि निरनिराळय़ा ठिकाणी वीज पडण्याचे प्रकार घडतात. अशा वेळी कित्येक घरांमध्ये असलेल्या विद्युत पुरवठय़ातील यंत्रणेमध्ये चढ-उतार ((Fluctuations) होऊन नुकसान झाल्याचे आढळते आहे. टीव्हीवरील चित्रांमध्ये बदल होऊन धोका संभवतो, त्या वेळी तत्परतेने टीव्ही बंद करून, शक्यतो त्याचे प्लग, सप्लाय सॉकेटपासून वेगळे करावे. तसेच घरातील मेन स्विच बंद केल्यास Voltage Fluctuations मुळे होणारे नुकसान व आगीपासून संरक्षण मिळते. वीज चमकत असताना वीज संरक्षण पट्टीला (Lightning Conductor) हात लावू नये. कुठल्याही लोखंडी वस्तूला किंवा वाहक धातूच्या वस्तूला स्पर्श करू नये. बिल्डिंगच्या बाहेर पायऱ्यांवर शक्यतो उभे राहू नये व उभे राहावे लागल्यास भिंतीला स्पर्श करू नये. पायऱ्यावरून चढणे-उतरणे टाळावे. घरामध्ये येरझारा घालू नये. शक्यतो एका ठिकाणी थांबावे.
मंडळी, बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजे २६ जुलै २००५ रोजी मुंबईत ढगफुटी होऊन बहुतांश मुंबई पाण्याखाली होती. त्यावेळच्या आठवणी ताज्या आहेत. त्या वेळी बेस्ट, टाटा पॉवर व रिलायन्स एनर्जी या सर्व वीज कंपन्यांची बहुतांश सबस्टेशन्स व रोहित्रे पाण्याखाली होती, त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये कमीत कमी सहा ते अठरा तास वीजपुरवठा कमालीचा विस्कळीत झाला होता. जसजसा पाण्याचा निचरा होऊ लागला, तसतसे त्या सबस्टेशन्समधील मुख्य पॅनेल व रोहित्रांची उभारणी करताना त्या ठिकाणचे  Maximum Flood Level  लक्षात घेऊन त्या पातळीच्या वरच ही संयंत्रे उभारावी असे निर्देश असतानाही त्याचे योग्य रीतीने अनुपालन न झाल्यामुळेच बहुतांश सबस्टेशन्स पाण्याखाली गेली व मुंबईवर अंधाराचे साम्राज्य पसरले.
सप्लाय कोडमध्ये पावसाळय़ापूर्वीच्या देखभालीचा खास उल्लेख आहे, ज्याला तांत्रिक परिभाषेत Pre-monsoon Maintenance (प्रिमान्सून मेंटेनेन्स) असे म्हणतात. त्यामध्ये वीज कंपनीचे कर्मचारी/ अभियंता यांनी रोहित्रे, सर्किट ब्रेकरमधील Oil Level  व contacts  आणि विजेच्या खांबांवरील इन्सुलेटर्स, ओव्हरहेड वायर्समधील ताण, झोळ (जमिनीपासूनचे अंतर), अंडरग्राऊंड केबल चेंबर्स व जॉइंट्स इत्यादी गोष्टींचा आढावा घेऊन आवश्यक ती कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी संपवायची असतात. प्रशिक्षित कर्मचारी/ अभियंत्यांच्या अभावी सदर कामे न झाल्यामुळे असे प्रसंग वारंवार उद्भवतात व त्याचा त्रास जनतेस विनाकारण भोगावा लागतो. मुंबईत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुसत्या बेस्ट इलेक्ट्रिक कंपनीच्या परिक्षेत्रात जवळजवळ १६००० वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागले असे वाचल्याचे आठवते. याचे कारण म्हणजे केबल जॉइंट्समध्ये बिघाड आणि केबल चेंबर्सची अयोग्य देखभाल. पावसाळय़ापूर्वी ही कामे न झाल्यामुळे सप्लाय कोडचा भंग झाला, त्यामुळे विद्युत कायदा- २००३ प्रमाणे संबंधित कर्मचारी व अभियंते शिक्षेस पात्र आहेत. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून त्यापैकी १०००० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केल्याचे समजते. ही गोष्ट निश्चितच चांगली आहे.
मुंबईमधील विद्युतपुरवठा हा Underground Distribution असल्यामुळे त्या मानाने पावसाळी देखभालही कमी असते, परंतु मुंबईव्यतिरिक्त महाराष्ट्रात महावितरण कंपनीच्या परिक्षेत्रात सर्वत्र उपरितार मार्गाचे नेटवर्क असल्यामुळे थोडे वादळ व पाऊस झाला की सप्लाय खंडितच होतो. म्हणून त्यांनी पावसाळी देखभालीस जास्त महत्त्व दिले पाहिजे.
विद्युत निरीक्षक व मुख्य विद्युत निरीक्षक यांनी विद्युत कायदा २००३ मधील जे अधिकार त्यांना दिले आहेत, त्याचा वापर करून सर्व वीज कंपन्यांच्या पावसाळी देखभालीवर ((pre-monsoon maintenance)) योग्य ती नजर ठेवून कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केल्यास वरील दुर्घटना टळू शकतील.
मित्रांनो, लेखाचा समारोप करताना माझे इतकेच कळकळीचे सांगणे आहे-
‘‘पावसाळय़ात आहे परीक्षा
सांभाळा विद्युत सुरक्षा’’
विद्युत सल्लागार आणि सदस्य, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, plkul@rediffmail.com

सर्वसाधारण ग्राहकाने पावसाळ्यात आपल्या घरात व परिसरात खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी.
वादळ आणि पावसात वायर खांबावरून तुटून खाली पडण्याचे बरेच प्रसंग घडतात. अशा वेळी कुठल्याही तुटलेल्या तारांना लाइव्ह आहे असे समजून त्यापासून दूर राहावे. वीज कंपनीला ताबडतोब फोन करून संबंधित तपशील द्यावा. बाहेर असताना वीज खांब किंवा त्यांच्या डीपी बॉक्सजवळ पाणी साठलेले असल्यास दुरून जावे. नुकतेच असे दोन तीन प्राणांतिक अपघात वीज कंपनीच्या निष्काळजीपणाने झाल्याचे कळले. त्याच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होईलच, पण आपण अशा छुप्या धोक्यापासून सुरक्षित राहणे आवश्यक असते.
सामान्यत: वीज खांबाला स्पर्श करू नये, परंतु पावसाळय़ात तर त्यांच्या जवळही जाऊ नये. ओव्हरहेड वायर्समधून एखादी वायर जरी तुटली की ती एक तर खाली पडते किंवा खांबाजवळ लटकत राहते. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे खांबांजवळ सेफ्टी डिव्हायसेस बसवलेली नसतात व अर्थिगही बरोबर नसल्यामुळे फ्यूज जात नाही व एखादा जीव घेईपर्यंत त्या खांबात वीजप्रवाह सुरू राहतो.
बाइक किंवा सायकल वीज खांबांना लावून ठेवू नये. झाडांच्या फांद्या तोडायच्या असतील व त्याला लागूनच वीज तारा गेल्या असल्यास वीज कंपनीला सांगूनच त्यांनी सिग्नल दिल्यानंतरच फांद्या तोडणे.
घर व परिसरात कुठेही तात्पुरती वायरिंग केलेली असेल तर त्यातील जॉइंटस वा अन्यत्र वायरचे इन्सुलेशन निघालेले असेल तर त्यावरून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याने तो वीजप्रवाह संपूर्ण परिसरात पसरतो व शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका असतो.
वादळी पावसात विजा चमकत असताना पॉवर लाइनजवळ पतंग किंवा मॉडेल प्लेन इत्यादी उडवू नयेत. पतंग वीज खेचून अपघात घडवू शकतात.
आपल्या घरातील उपकरणे ओल आलेल्या भिंतीपासून, पाण्यापासून तसेच ओल्या गवतापासून दूर ठेवावेत.
जी विद्युत उपकरणे वापरात नसतील त्यांचे प्लग सॉकेटमधून काढून ठेवणे, म्हणजे शॉर्ट सर्किट, पाण्यापासून होण्याचा धोका टळेल व विद्युत सुरक्षा मिळेल.

Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….