आपले घर अनेक अंगांनी समाजाशी, विचारांच्या प्रवाह-प्रभावांशी जोडलेले असते. घरातल्या माणसांनी जसे घर घडत जाते त्याचप्रमाणे घराच्या जडणघडणीविषयी इतरही अनेक व्यक्ती, संस्था विचार करत असतात. या अनोख्या उत्क्रांतीविषयी जाणून घेऊ या ‘घर घडवताना’सदरात..
मला माझे घर माझ्यासारखेच आवडते. घरात शिरल्यावर मला माझे, माझ्या कुटुंबियांचे, आमच्या राहणीमानाचे, आचार-विचारांचे आणि एक कुटुंब म्हणून आमच्या संस्कृतीचे दर्शन घडावे असे वाटते. आमच्या घरातली प्रत्येक खोली अगदी वेगळी आहे. मी घरातूनच काम करतो, साहजिकच घरातली अभ्यासिका खूपच औपचारिक, अगदी कार्यालयासारखीच आहे. माझी खोली संपूर्णपणे भारतीय पद्धतीची आहे.. भारतीय पद्धतीची बठक, जमिनीपासून जवळच; फारसे उंच नसलेले बिछाने, सतरंज्या, गालिचे जाजम, चौरंग अशी सजावट आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वेडामुळे त्याबाबतीत मात्र माझी खोली अगदी आधुनिक आहे. आई-बाबांच्या खोलीत बसायच्या दृष्टीने सोयीस्कर उंचीच्या खुच्र्या, पलंग अशा गोष्टी आहेत. आईच्या शिवण आणि विणकामाच्या साधनांसकट, बाबाला आवडणारी इलेक्ट्रॉनिक दुरुस्तीची साधनं त्यांच्या खोलीत आहेत.
ही झाली सगळी वरवरची दृश्य. आमच्या घराचे रूप मात्र गेल्या काही वर्षांत खूप पालटत गेले आहे. पुस्तके, गाण्यांच्या चित्रपटांच्या तबकडय़ा, छायाचित्रांचा संग्रह असे सगळे कायम असले तरी विषय, रुचीनुसार नवनव्या गोष्टी यात सामील होत गेल्या आहेत. या शिवाय, जसजसे आम्ही तिघेही घडत गेलो आहोत, तसतसे आमचे घरही बदलते राहिले आहे. आई पारंपरिक असली तरी मॉडय़ुलर कीचन तिने फारच लवकर, या कल्पनेच्या अगदी सुरुवातीच्या काळातच स्वीकारले होते. या कल्पनेची उपयुक्तता आणि छोटय़ा घरातही सारे सामान खुबीने ठेवायची तिची आंतरिक ओढ यामुळे आमच्या घरात माझ्या लहानपणीच मॉडय़ुलर कीचन आले. संस्कार, घरातली संस्कृती वगरेंविषयी माझे पालक जागरुक असल्याने, एकीकडे मॉडय़ुलर कीचनवर पसे खर्चणाऱ्या आमच्या घरात मी सातवी-आठवीत जाईस्तोवर दूरचित्रवाणी संच आला नव्हता आणि केबलचा शिरकाव मी कॉलेजात गेल्यावरच झाला.
पुढे माझे निसर्गाप्रतीचे आकर्षण वाढीला लागले आणि आमच्या घरात एकेक प्रयोग व्हायला लागले. कमी पाणी वापरणारं कपडे धुण्याचे यंत्र, या विषयांवरची पुस्तके आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सातत्याने पाणी, वीज वगरे कमीत कमी, आवश्यक तेवढेच वापरण्यावर कटाक्ष असे बदल झाले. पुढे संगणक, इंटरनेट यांच्या संस्कारातून सौरविद्युत संयंत्र, सौरचूल, सौर ऊर्जेवर पाणी गरम करण्याचं संयंत्र यांचा शिरकाव झाला.
गेल्या अनेक वर्षांत आमच्या घरात घडलेले अनेक बदल, अगदी आमच्या नकळत, बाहेरच्या प्रभावांशी, विचारांशी निगडित आहेत हे आत्ता मागे वळून पाहताना लक्षात येते. कुणाला तरी ही कल्पना सुचली, त्यासाठी कुणीतरी मेहनत केली आणि कपडे धुण्याचे यंत्र प्रचलित झाले. आज माझ्या पिढीतल्या कुणाला कपडे हाताने धुणे ही अनावश्यक मेहनतच वाटेल. असेच इतर अनेक गोष्टींचे आहे.. घरात पिठले-भाकरी किंवा कोंबडीवडय़ासोबत शिजणारे पास्ता-मॅकरोनी आणि सॅलड्स असो किंवा घराच्या सजावटीत खास इंटेरिअर डिझायनर्सची घेतलेली मदत असो..
सध्या माझ्या घरात घडलेला असाच एक गंमतशीर बदल म्हणजे घरात नव्याने वापरात आलेली अनेक जुनी, पिढीजात चालत आलेली भांडी आणि जागोजागीच्या कारागिरांनी घडवलेल्या अनेक शोभेच्या, नित्य वापराच्या वस्तू. राजस्थानची ब्लू-पॉटरीची भांडी, सांगली-परभणीच्या विणकरांनी घडवलेल्या घोंगडी, मध्य प्रदेशातल्या कारागिरांनी ओतकामातून घडवलेल्या पितळीच्या; पंचधातूच्या मूर्ती आणि कोकणातली लाकडी खेळणी. यातल्या अनेक गोष्टी आधुनिक जगात, मागणीअभावी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि असे होऊ नये याकरता काही संस्था, व्यक्ती प्रयत्नशील आहेत- ही माहिती वाचनात आली आणि आपल्याकडच्या या खजिन्याची महती नव्याने पटली.
‘घर घडवताना’ या आपल्या नव्या सदरातून आपण अशाच अनेक विचारांची, प्रवाहांची, प्रभावांची आणि  व्यक्तींच्या कार्याची आणि त्यांनी आपल्या घराच्या जडण-घडणीत दिलेल्या योगदानाची माहिती करून घेणार आहोत.