सकाळी उठल्यावर गृहिणीचं पहिलं काम असायचं ते चुलीतल्या आदल्या दिवशीची राख बाहेर काढण्याचं व नवी आग साकटण्याचं. बाहेर काढलेली राख नळय़ामध्ये घेऊन राखेसाठी असलेल्या ‘कोंडल्यात’ टाकली जायची
चूल हा घरातला एक महत्त्वाचा घटक होता, आहे आणि पुढेसुद्धा राहील. आता चुलीच्या स्वरूपामध्ये कालमानाप्रमाणे बदल झाले असले, आधुनिकीकरणामुळे विविधता आली असली तरी एकेकाळी घरोघरी मातीच्या चुली असायच्या. चूल तयार करण्याला आमच्या कोकणात ‘चूल घालणे’ म्हटलं जायचं. घरातला अनुभवी पुरुष किंवा स्त्री चूल घालायचं काम करायची. चुलीसाठी कुठलीही माती चालायची नाही. त्यासाठी विशिष्ट प्रकारची माती लागायची. चूल घालण्यापूर्वी माती तयार करावी लागायची. त्यासाठी माती भिजवून, तुडवून, मळून दोन-तीन दिवस तिचा गारा घालून ठेवावा लागायचा. चूल दुहेरी असायची. चुलीसमोर बसलं असता डाव्या बाजूची चूल ही मुख्य चूल तिला वैलसुद्धा असायचं. उजव्या बाजूच्या भागाला ‘शेळी चूल’ म्हणजे ‘शिळी चूल’ म्हटलं जायचं. मुख्य चुलीची पोकळी वैलापर्यंत असायची.
त्यामुळे चुलीत जास्त जाळ झाला तर वैलातूनही ज्वाळा येताना दिसायच्या. चुलीवर एखादा पदार्थ करून झाला की तो उचलून वैलावर ठेवला जायचा; किंवा तो पदार्थ होत आला की वैलावर ठेवून दुसरं भांडं चुलीवर ठेवलं जायचं. शिळय़ा चुलीला बहुधा वैल नसायचं. तो पृष्ठभाग मोकळा असायचा. त्याला ‘पाटाण’ असं म्हणायचे. त्यावर पावसाळय़ात निकामी होऊ नये म्हणून काडेपेटी, तर हिवाळय़ात खोबरेल साकेरू (घट्ट होऊ) नये म्हणून त्याची बाटली पाटणावर ठेवली जायची.
घाईच्या वेळी आता आपण जसा तीन-तीन, चार-चार बर्नर असलेल्या गॅस शेगडय़ांचा वापर करतो तसा त्या काळी चूल, वैल आणि शिळय़ा चुलीचा वापर केला जायचा. चुलीप्रमाणेच वैलावरही खूप घाईघाईत जेवण केलं असं सांगताना त्या वेळची गृहिणी ‘चुलीवैला वायलावर आणि वायला वैला चुलीवर करून जेवान केलंय?’ असं सांगायची. चुलीतली आग कधी पूर्ण विझवली जात नसे. शेणीची आग न विझता बराच वेळ धुमसत राहत असे. फुंक मारून फुलवली की पेट घेत असे. एका दृष्टीने प्रत्येक घरी अग्निहोत्रच असायचं असं म्हणायला हरकत नाही. आग विझलीच तर शेजाऱ्यांकडून शेणीवर दोन-तीन निखारे घेऊन किंवा जळतं कोलीत घेऊन आग आणली जात असे. आग आणताना दोन माणसांच्या मधून कधीही आणली जात नसे. अशा वेळी दोन्ही माणसांना  एका बाजूला व्हायला सांगितलं जात असे. दोघांच्या मधून आग नेली तर त्यांचं भांडण होतं अशी समजूत होती. आजकाल असा विस्तव आणणं कालबाह्य झालेलं असलं तरी ‘दोघांच्यामधून विस्तव जात नाही’ ही म्हण अजूनही वापरली जाते.
चुलीतली आग चेतवण्यासाठी बांबूची फुंकणी वापरली जायची. काही घरांमध्ये लोखंडी फुंकणीसुद्धा असायची. चुलीतला जाळ कमी-जास्त करण्यासाठी लाकडं मोगेपुढे करणं आवश्यक असायचं. जास्त जाळ हवा असेल तर लाकडं पुढे रेटली जायची, तर कमी जाळ हवा असेल तर लाकडं मागे ओढली जायची. लाकडं जास्त झाली तर जाळ कमी करण्यासाठी काही लाकडं बाहेर काढून ती विझवण्यासाठी शिळय़ा चुलीत सारली जायची. सकाळी उठल्यावर गृहिणीचं पहिलं काम असायचं ते चुलीतल्या आदल्या दिवशीची राख बाहेर काढण्याचं व नवी आग साकटण्याचं. बाहेर काढलेली राख नळय़ामध्ये घेऊन राखेसाठी असलेल्या ‘कोंडल्यात’ टाकली जायची. जेवण करताना काही वेळा पदार्थ सांडायचे, उलंडायचे, तळणी-फोडणीच्या वेळी तेल उडायचं व चूल खराब व्हायची. म्हणून तिला आठवडय़ातून दोन-तीन वेळा मातीचा गिलावा काढावा लागायचा. त्यामुळे चूल स्वच्छ होऊन तिचं आयुष्यही वाढायचं.कुंभारी चूल
लहानशी, कुठेही नेता-आणता येईल अशी ही चूल साधारणपणे दीड-दोन इंच जाडीची असायची. कुंभार ही चूल बनवून इतर भांडय़ांप्रमाणेच आव्यामध्ये (भट्टी) भाजायचा. त्यामुळे पातळ असूनही ती मजबूत असायची. पोहे कांडताना ही चूल व्हायनाजवळ (जमिनीत पुरलेले उखळ) ठेवली जायची जेणे करून पोह्यांसाठी भाजलेलं भात गरम असतानाच व्हायनात टाकता येईल. घरात, वाडय़ात किंवा अन्य कुठेही (ब्राह्मणभोजन) असेल तर याच चुलीवर भट आपलं जेवण करायचा. ही चूल म्हणजे नित्य वापराची वस्तू नसल्यामुळे ती घरोघरी असायचीच असं
नाही. आवश्यकता असेल त्या वेळी ती उसनी आणली जायची. काळी पडल्यावर हिला गिलावा काढला जायचा. ही चूल कुंभार बनवत असल्यामुळे हिला ‘कुंभारी चूल’ असं म्हटलं जायचं.
न्हाणीतली चूल
प्रत्येक घराच्या पाठल्यादारी न्हाणी (आंघोळीची जागा) असायची. तिथे मातीची मोठी चूल असायची. हीसुद्धा घरातल्या चुलीप्रमाणेच माती तयार करून घालावी लागायची. त्या चुलीवर पाणी तापवण्यासाठी एक मातीचं मोठं मडकं तिरपं करून ठेवलेलं असायचं. सधन लोकांच्या घरी तांब्याचं मडकं ठेवलेलं असायचं. चुलीतला जाळ लागून मडकं, मग ते मातीचं असो वा तांब्याचं, पिचू नये म्हणून मडक्याच्या आगीशी संपर्क येणाऱ्या भागाला अधूनमधून मातीचा लेप लावला जायचा. त्यामुळे मडक्याचं आयुष्य वाढायचं. न्हाणीतली चूल मोठी असल्याने तसेच तिथे ऐसपैस जागा असल्यामुळे मोठी, वेडी-वाकडी, ओबडधोबड लाकडं या चुलीत वापरली जायची.