घर सजावट करताना लागणाऱ्या वस्तू कशा असाव्यात, कोणत्या असाव्यात याविषयी मार्गदर्शन करणारं सदर..
आजच्या महिला पूर्ण वेळ गृहिणी असोत वा नोकरी करून घराला हातभार लावत असोत, स्वयंपाकघराशी असलेला त्यांचा संबंध तसाच आहे. म्हणूनच कुटुंबासाठी काम करून झटणाऱ्या या अन्नपूर्णेला घाईच्या वेळेतही सोयीस्कर असावं, सगळ्या वस्तू आणि स्वयंपाकाचे जिन्नस एकत्र हाताला चटकन मिळावेत म्हणून स्वयंपाकाचा ओटा हाही बारीकसारीक गोष्टींचा विचार करून केलेलाच असायला हवा. पण केवळ उपयोगिता हाच निकष नाही, तर हा ओटा म्हणजे एक स्टेट्स सिम्बॉलही वाटावा असा असायला हवा. त्याकरता या ओटय़ाचा लूक हा महत्त्वाचा. ओटय़ाचं हे देखणं रूप मुख्यत: अवलंबून असतं ते त्याच्यासाठी कोणता दगड वापरला आहे यावर..
तुम्हाला जर नवीन ओटा स्वयंपाकघरात घालून घ्यायचा असेल, तर त्याचं काम सुरू असताना तुम्ही अगदी इंटिरिअर डिझायनर नसलात, तरीही कोणत्या गोष्टी बघायच्यात याची जुजबी आणि प्राथमिक माहिती असणं हे केव्हाही उत्तमच! प्रथमत: ओटा घालताना त्याच्या आकाराचा आराखडा जमिनीवरच्या सध्याच्या फ्लोअिरगवर खडी किंवा मार्करच्या साहाय्याने काढून घेतला जातो. त्याच्या आकाराइतक्या फ्लोअिरगच्या लाद्या काढून घेतल्या जातात. त्याखाली असलेला रेती-सिमेंटचा जुना थर काढून टाकून तो भाग स्वच्छ केला जातो. मग जिथे ओटय़ाखालच्या गाळ्यांच्या भिंती येणार आहेत, तिथे पुन्हा खडू किंवा मार्करने या भिंतींची जाडी आखून घेतली जाते. या भिंती सर्वसाधारणपणे कडाप्पा दगडाच्या असतात. पूर्वी संपूर्ण ओटाच कडाप्पा दगडात बांधला जायचा. पण आज हवा असलेला ट्रेंडी रिच लूक द्यायचा असेल, तर ओटय़ाच्या दर्शनी भागात ग्रॅनाइट किंवा संगमरवराचा वापर केला जातो. पण आत्ताच सांगितल्याप्रमाणे ओटय़ाच्या गाळ्यांच्या ज्या भिंती आहेत, त्या मात्र कडाप्पा दगडातच उभारतात. तसंच आडव्या शेल्फसाठीही कडाप्पाचाच वापर केला जातो. मग त्यावर संपूर्ण ओटय़ाच्या लांबी-रुंदीच्या आकाराचा एक कडाप्पा दगड या उभ्या केलेल्या भिंतींवर आडवा ठेवला जातो. स्पिरिट लेव्हलने तो आडवा असल्याची खात्री करून घेतली जाते. मग त्यावर रेती घातली जाते. या रेतीचा थर ओटय़ाच्या सिंकच्या बाजूला कमी जाडीचा, तर दुसऱ्या टोकाला जास्त जाडीचा ठेवून ओटा धुताना पाणी वाहून जाण्याकरता आवश्यक असलेला उतार दिला जातो. मग त्यावर रेती-सिमेंटचं जास्त सिमेंट असलेलं मॉर्टर म्हणजे मिश्रण घालून त्यावर संगमरवर अथवा ग्रॅनाइटचा दगड बसवला जातो (छायाचित्र १ पाहा). आडवा दगड आणि उभ्या िभती यांचा सांधा झाकण्यासाठी समोरून संगमरवर किंवा ग्रॅनाइटची पट्टी बसवली जाते. हिला फेशिया पट्टी म्हणतात. तसंच या फेशिया पट्टीवरून ओटा धुताना पाणी उतू जाऊन आपल्या अंगावर सांडू नये याकरता छोटय़ा उंबरठय़ासारखी दीड इंच जाडीची आणि पाऊण ते एक इंच उंचीची पट्टी अर्धगोलाकृती पट्टय़ात बसवली जाते. याला मोल्डिंग पट्टी म्हणतात. अशा तऱ्हेने तुमचा ओटा तयार होतो. जिथे दर्शनी भाग नाही अशा ठिकाणी आधी सांगितल्याप्रमाणे कडाप्पाचा वापर करतात. कारण कडाप्पा दगडाचा भाव प्रति चौरस फुटाला ३५ ते ४५ रुपयांच्या घरात आहे, तर ग्रॅनाइट किंवा संगमरवराचा भाव हा तुलनेने खूपच जास्त असतो. त्यामुळे तो फक्त दर्शनी भागातच वापरला जातो. पांढरा संगमरवरी दगड त्याच्या दर्जानुसार १६० ते २२० प्रति चौरस फूट दराने मिळतो. हा संगमरवर विकत घेताना जर त्यात पिवळसर छटा किंवा रेघा असतील, तर तो कमी दर्जाचा समजावा. त्याचा भाव कमी असला पाहिजे. संपूर्ण दुधासारखा शुभ्र पांढरा असलेला संगमरवर हा चांगल्या दर्जाचा असतो, मात्र त्याचा भाव जास्त असतो. हिरवा संगमरवरही येतो. तोही दिसायला छान दिसतो. त्याचा भाव मात्र ६० ते ७० रुपये चौरस फूट इतका असतो. त्यामुळे संगमरवराचा वापर करायचा आहे मात्र बजेट कमी असेल, तर हिरव्या संगमरवराचा वापर करायला हरकत नाही. ग्रॅनाइटमध्येही वेगवेगळे प्रकार येतात. त्यातले मुख्य प्रकार म्हणजे टेलिफोन ब्लॅक ग्रॅनाइट (१३० ते १४० रु. प्रति चौरस फूट) (छायाचित्र २ पाहा) आणि गॅलॅक्सी ब्लॅक ग्रॅनाइट (१६० ते १८० रुपये चौरस फूट) (छायाचित्र ३ पाहा).
यातला पहिला म्हणजे टेलिफोन प्रकारचा ग्रॅनाइट हा संपूर्णपणे काळाभोर असतो, तर गॅलॅक्सी प्रकारात काळ्या पाश्र्वभूमीवर चंदेरी किंवा पांढरे ठिपके असतात. त्यामुळे तो ग्रॅनाइट एखाद्या आकाशगंगेसारखा दिसतो. काही वेळा लाल रंगाचा ग्रॅनाइट किंवा इटा गोल्ड नावाचा पिवळ्या रंगाचा ग्रॅनाइटही वापरला जातो.
शेवटी लूक आणी बजेट यांची सांगड घालून तुम्हाला तुमच्या ओटय़ासाठी दगड निवडायचा असतो. त्यामुळे कमीत कमी खर्चातही तुम्ही तुमच्या स्वयंपाकाच्या ओटय़ाला आकर्षक लूक देऊ शकता.
सिव्हिल इंजिनीअर – anaokarm@yahoo.co.in
सुंदर माझं घर : स्वयंपाकघरातील ओटा
शेवटी लूक आणी बजेट यांची सांगड घालून तुम्हाला तुमच्या ओटय़ासाठी दगड निवडायचा असतो.
Written by मनोज अणावकर
Updated:
First published on: 02-01-2016 at 01:19 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decorating tips to make home beautiful