* जर सदनिका खरेदी करताना खरेदीदार म्हणून करारनाम्यामध्ये नाव नसेल तर गृहनिर्माणसंस्थेच्या कार्यकारी मंडळाचा सदस्य किंवा गृहनिर्माणसंस्थेचा पदाधिकारी, उदा. सेक्रेटरी, चेअरमन होता येते का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* नाही. पूर्वी रु. १००/- ची फी भरून मूळ सदस्याने मान्यता दिल्यास त्या व्यक्तीला गृहनिर्माणसंस्थेच्या कार्यकारी मंडळात काम करता येत असे. आता नवीन उपविधीमधील तरतुदीनुसार जर करारनाम्यामध्ये नाव असेल तरच असोसिएट मेंबर होता येते. आणि अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला असोसिएट मेंबरशिप मिळाली तरच त्याला गृहनिर्माणसंस्थेच्या कार्यकारी मंडळामध्ये काम करता येईल.

* एखाद्या सदस्याने आपल्या मुलाला पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दिली तर त्याला गृहनिर्माणसंस्थेचे सदस्यत्व मिळेल का?

* नाही. पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी धारण करणाऱ्या व्यक्तीला गृहनिर्माणसंस्थेचे सदस्य मिळत नाही. पॉवर ऑफ अटर्नी होल्डर म्हणजेच कुलमुखत्यारी फक्त सदस्याच्या वतीने अन्य कामे करू शकतो, परंतु त्याला पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीद्वारे सदस्यत्व मिळवता येत नाही.

* याबद्दल उपविधीच्या कोणत्या कलमांतर्गत मार्गदर्शन केलेले आहे. – प्रकाश मोरे

* याबाबतचे मार्गदर्शन उपविधीमधील कलम १६, १७, १८, १९ तसेच कलम २५, २६ मध्ये केलेले आहे.

* २ – ९ – २०१७ च्या ‘वास्तुरंग’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या सदरामध्ये एका उत्तरात आपली मालमत्ता लिव्ह लायसन्स तत्त्वावर देताना गृहनिर्माणसंस्थेची परवानगी लागते, असे म्हटले आहे. तसेच त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी लागते असेही म्हटले आहे. कृपया त्याविषयी असणाऱ्या तरतुदीचा तपशील द्यावा. – अजित सावंत

* आपण नव्याने मंजूर झालेल्या उपविधीमधील कलम ४३ अ व ब मधील तरतुदी पाहिल्यास या गोष्टींना पुष्टीच मिळेल. वर उल्लेख केलेल्या तरतुदी दि. ७ नोव्हेंबर २०१५ रोजी मान्यता मिळालेल्या नवीन उपविधीच्या मराठी आवृत्तीत आहेत.

* माझ्या साडूंचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांचा राहता फ्लॅट हा त्यांच्या पत्नीच्या नावे करायचा आहे. परंतु वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे. १) सदर फ्लॅटला नॉमिनेशनच करण्यात आलेले नाही. तसेच त्यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी केलेल्या लग्नाचे रजिस्ट्रेशनदेखील केलेले नाही. तरी याबाबतीत आपण योग्य ते मार्गदर्शन करावे. – प्रकाश बगाडे

* सर्वप्रथम आपल्या साडूंच्या पत्नीला त्यांचे लग्न झाले होते याचा पुरावा निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी राजपनात (गॅझेटमध्ये) आपल्या साडूंच्या पत्नीने ‘चेंज ऑफ नेम’ करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे लग्नापूर्वीचे नाव आताच्या नावामध्ये बदलून घ्यावे आणि त्यामध्ये ‘लग्न झाल्यामुळे’ असे कारण द्यावे. त्यानंतर आपणाला दंड भरून लग्न नोंदणी करता येते का हे पाहावे. तसे झाल्यास उत्तमच. परंतु न झाल्यास एक प्रतिज्ञापत्र बनवावे व त्यात या साऱ्या गोष्टींचा उल्लेख करावा व ते नोटरी करावे. त्यानंतर गृहनिर्माणसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांनी जर आपणाला सहकार्य केले तर नॉमिनेशन न केलेल्या वारसांना त्यांचे नाव शेअर सर्टिफिकेटवर चढवण्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतील याबाबतच्या तरतुदी नवीन बायलॉजमध्ये दिल्या आहेत. त्या तरतुदीनुसार आपण सर्व गोष्टींची पूर्तता केल्यास सदर सदनिका आपणाला त्यांच्या नावे करता येईल.

मात्र, यासाठी गृहनिर्माणसंस्थेचे पदाधिकारी व आपल्या साडूंच्या पत्नी यांच्यामध्ये सहकार्य असणे अपेक्षित आहे. ते जर शक्य नसेल तर मात्र आपल्या साडवांच्या पत्नीला वारस दाखला आणण्याशिवाय पर्याय उरणार नाही. मात्र, आपण तो शेवटचा पर्याय समजून अन्य प्रयत्न अगोदर करून पाहावेत.

* आम्ही अंधेरी येथे रहात असून तो आमच्या स्वकष्टार्जित प्लॅट आहे. सदर फ्लॅटला मुलांचे नॉमिनेशन केलेले आहे. जर दोन्ही मुलांत वाद नसतील तर आमच्या पश्चात त्यांना सदर फ्लॅट विकता येईल का? – सिया जोशी, अंधेरी, मुंबई.

* आपल्या मुलांत जर वाद नसतील आणि त्या दोघांनी त्या दोघांव्यतिरिक्त आपल्या मृत आई- वडिलांना अन्य वारस नसतील असे जाहीर करून सदर फ्लॅट  त्यांना त्यांच्या नावे करून घेऊन मग विकता येईल. मात्र यासाठी गृहनिर्माणसंस्था आणि आपली मुले यामध्ये सहकार्य असणे आवश्यक आहे.

* जमीन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, जेणेकरून फसवणूक होणार नाही? असा व्यवहार मी प्रथमच करत आहे म्हणून मार्गदर्शन करावे.  – प्रज्ञा काकडे

* आपण कुठली जमीन घेत आहात, किती जमीन घेत आहात हे माहीत असते तर उत्तर देणे सोपे झाले असते. आपण एन.ए. जमीन घेत असाल तर आपण शेतकरी असण्याची जरुरी नाही. त्या जमिनीला तुकडेबंदी कायदा, कुळकायदा लागू होत नाही. शेतजमीन घेत असाल तर आपण शेतकरी असणे आवश्यक आहे. कोणतीही जमीन घेताना त्या जमिनीचा मालकीहक्क विकणाऱ्यांकडे कसा आला हे तपासणे आवश्यक आहे. त्याला कोणी कुळे नाहीत ना, ती जमीन तुकडेबंदी कायद्यात अडकणारी नाही ना, विकणारा हा त्या जमिनीचा मालक आहे ना? त्याला ती जमीन विकण्याचा अधिकार आहे ना? सदर जमीन कोणत्याही आरक्षणाखाली येत नाही ना?, इ. गोष्टी पाहणे महत्त्वाचे आहे.

अ‍ॅड. श्रीनिवास घैसास ghaisas_asso@yahoo.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert architectural guidance
First published on: 11-11-2017 at 01:01 IST