मध्यंतरी एका उच्चभ्रू भागातील घरी जाण्याचा योग आला. घरात पाऊल टाकल्यापासून देश-विदेशातील सुंदर वस्तूंचे दर्शन घडत होते. संपूर्ण घरभर महागडय़ा वस्तू व पेंटिंग्ज मांडून ठेवली होती. काही ठिकाणी तर इतकी गिचमिड झाली होती की हे घर आहे की सुंदर वस्तूंचे प्रदर्शन असा प्रश्न पडावा.
असं हे घर पाहिल्यावर माझ्या मनात पहिला विचार आला तो तुमचा. गेले काही दिवस या सदराच्या माध्यमातून इंटिरियरसंबंधित निरनिराळ्या गोष्टींची आपण चर्चा करत आहोत, पण मुळात इंटिरियर डिझायनिंगचा जो पाया आहे त्याबद्दल आपण बोललोच नाही. इंटिरियर डिझायनिंग म्हणजे नेमके काय? कोणी म्हणे गृह सजावट तर कोणी म्हणे डेकोरेशन, पण त्याही पुढे जाऊन इंटिरियर डिझाइन या शब्दाची व्याप्ती आहे. थोडं सोपा करून सांगते, डिझायनिंग म्हणजे संरचना. ज्यामध्ये फक्त सौंदर्यच महत्त्वाचे नाही तर त्याच सोबत नियोजनही तितकेच महत्त्वाचे. एखादी वास्तू जर फक्त सुंदर सुंदर वस्तूंनी भरली तर ती सुंदर वस्तूंचे भांडार वाटेल, पण त्याच वस्तूंची जर नियोजनपूर्वक मांडणी केली तर ती संरचना होईल. म्हणूनच इंटिरियर डिझायनिंगमध्ये नियोजनाला फारच महत्त्व आहे.
थोडक्यात सांगायचे तर आज आपण स्पेस प्लॅनिंगविषयी थोडं जाणून घेऊ या. एखाद्या घराचे इंटिरियर करायला घेताना आधी ते घर समजून घेणे गरजेचे. घराचा आकार, क्षेत्रफळ व त्यात राहणारी माणसे. घरात लहान मुले किती? कोणी वृद्ध अथवा अपंग व्यक्ती आहेत का? हे आणि अशासारखे अनेक मुद्दे लक्षात घेऊन घरातील जागेचे नियोजन करावे लागते. त्याच बरोबर मोठय़ा मेहनतीने घेतलेल्या आपल्या घराचा काना कोपरा व्यवस्थित वापरला गेला पाहिजे या कडेही लक्ष द्यावे लागते.
बाथरूम असो वा स्वयंपाकाची खोली अथवा बेड रूम असो वा बैठकीची खोली, प्रत्येक ठिकाणी जर जागेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले तर केवळ जागेचे सौंदर्यच खुलत नाही तर ती वावरायलादेखील सुटसुटीत होते. आपण बैठकीच्या खोलीपासून सुरुवात करू. बैठकीची खोली किंवा लिव्हिंग रूम म्हणजे प्रत्येक घराचा आरसा. घरातील प्रत्येक व्यक्ती ही लिव्हिंग रूमशी जोडलेली असते. बाहेरून थकूनभागून घरी आल्यावरदेखील लिव्हिंग रूमच स्वागताला उभी असते. तर अशा या लिव्हिंग रूममध्ये ठेवण्यात येणारे फर्निचर अशाच पद्धतीचे असायला हवे की, घरातील प्रत्येकाला तिथे वावरणे सोपे होईल.
लिव्हिंग रूममध्ये ठेवायचे फर्निचर ठरविण्यापूर्वी लिव्हिंग रूमचा आकार आणि क्षेत्रफळ यांचा विचार करणे आवश्यक आहे. जर लिव्हिंग रूम लहान असेल तर सुटसुटीत स्लिम अशा फर्निचरला प्राधान्य द्यावे, तर मोठय़ा जागांसासाठी जरा जास्त आरामदायी फर्निचर घ्यावे. बरेचदा डायनिंग टेबलदेखील लिव्हिंग रूम मध्येच ठेवले जाते, अशा वेळी उपलब्ध जागा आणि आपली गरज यांचा ताळमेळ साधून किती माणसांसाठीचे डायनिंग टेबल घ्यायचे याचा निर्णय घ्यावा. डायनिंग टेबल ठेवताना त्या भोवतीच्या खुच्र्या वापरात असतानाही आजू बाजूने सहज फिरता येण्या इतपत जागा मोकळी ठेवणे आवश्यक असते हेही लक्षात घ्यावे.
यानंतर आपण जातो बेड रूममध्ये. बेड रूममध्ये प्राधान्य हे बेड आणि वॉर्डरोबला असले पाहिजे. पुन्हा एकदा इथेही क्षेत्रफळ महत्त्वाचे. बेड रूम केवढी आहे आणि बेड ठेवल्यानंतरही आजूबाजूने फिरण्याइतपत जागा शल्लक राहते की नाही हे तपासून त्याप्रमाणे बेड निवडावा. दोन माणसांना आरामशीर झोपण्यासाठी साडेपाच फूट बाय सव्वासहा फुटांचा बेड पुरतो, पण जागा कमी असल्यास सव्वापाच किंवा पाच फुटांचा बेडदेखील आपण घेऊ शकतो. परंतु बेडच्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित मोकळी जागा सोडणेदेखील तितकेच महत्त्वाचे. जर अगदीच जागेची टंचाई असेल तर सोफा कम बेडदेखील एक चांगला पर्याय ठरू शकेल. बेडनंतर बेडरूममध्ये जास्त महत्त्वाचा आणि जागा व्यापणारा घटक म्हणजे वॉर्डरोब. वॉर्डरोब करताना महत्त्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे त्याचे शटर्स. साधारणत: अठरा ते वीस इंच रुंदीचे शटर्स बनतात, आपले काम इतकेच की वॉर्डरोबच्या समोर किमान त्याचे शटर्स उघडतील आणि त्यासमोर आपल्याला नीट उभे राहता येईल इतकी जागा मोकळी आहे ना हे पाहणे.
बेडरूमच्या इतकीच महत्त्वाची जागा आहे बाथरूम. प्रश्न पडला असेल ना यात कसले स्पेस प्लॅनिंग? पण आहे, पुढे बाथरूमविषयी बोलताना ते विस्ताराने येईलच, पण सध्या थोडक्यात बोलू या. हल्ली बऱ्याच बाथरूममध्येच युरोपिअन शौचालय बसवलेले असते. त्यामुळे अंघोळीची जागा, शौचालयाची जागा आणि वॉश बेसिनची जागा यांचे व्यवस्थित भाग केलेले असल्यास बाथरूम वापरताना जास्त सोयीचे आणि आरामदायी होऊ शकेल. त्यातही आत शिरल्या शिरल्या समोर वॉश बेसिन असावे कारण सर्वात जास्त व कोणत्याही वेळी वापर हा वॉश बेसिनचा होतो. त्या खालोखाल शौचालयाचा वापर होतो म्हणून त्याची जागा ही शक्यतो शॉवर आणि वॉश बेसिनच्या मधली ठेवावी व सगळ्यात शेवटी शॉवर कारण दिवसातून एक किंवा दोन वेळाच त्याचा वापर होणार असतो.
सध्या इंटिरियर डिझायनिंगमध्ये मिनिमलिस्टिक ही संकल्पना खूपच धुमाकूळ घालतेय. यामध्ये कमीत कमी फर्निचर व कमीत कमी वस्तू वापरून घर डिझायन केले जाते. ही एक संपूर्ण वेगळी कल्पना असल्याने त्या विषयी थोडं विस्ताराने बोलू या नंतर. सध्या मात्र तुमच्या घराचे स्पेस प्लॅनिंग करायचे असल्यास एक सोप्पी कल्पना देते तुम्हाला.
बऱ्याचदा होता काय इंटिरियर डिझाइनर कागदावर प्लॅनिंग करून दाखवतात पण प्रत्यक्षात वावरणे किती सोपे होईल याचा कागद पाहून अंदाज आपल्याला येतच नाही. अशा वेळी जे डिझायन आपण कागदावर केलंय त्याच प्रमाणे घरात साध्या म्हणजे हलक्यातल्या ४ एम एम प्लाय वूडमध्ये किंवा मोठय़ा आकाराच्या कार्ड बोर्ड वर अॅक्चुअल आकारात फर्निचरचे आकार कापून घ्यावेत व घरात ज्या त्या ठिकाणी जमिनीवर ठेवावेत. यामुळे प्रत्यक्ष फर्निचर किंवा घरात ठेवण्याच्या इतर वस्तू ठेवल्यानंतर त्यांच्या मधून किती जागा उरते, त्या जागेत आपल्याला आरामशीर वाटतेय का याचा पटकन अंदाज येऊ शकतो.
शेवटी आपलं घर किती वस्तूंनी भरलंय या पेक्षा ते आपल्याला राहायला किती आरामदायी आहे हेच तर महत्त्वाचं आहे ना!
(इंटिरियर डिझायनर)
गौरी प्रधान ginteriors01@gmail.com