एवढे दिवस प्रतीक्षा करायला लावणारा पाऊस एकदाचा बरसायला लागला. नेरळच्या घराच्या अंगणातील मातीच्या सुवासाने मन भरून, आनंदून गेलं आणि ‘आला पाऊस मातीच्या वासात गं’, या गाण्याची लकेर पटकन माझ्या ओठांवर आली. पळतच बाहेर बाल्कनीत येऊन मी तो धुवाधार पडणारा पाऊस डोळ्यांत साठवू लागले. मग पावसात जायची इच्छा अनावर झाली. अंगणात भिजून झाल्यावर मी बाल्कनीत येऊन झोपाळ्यावर झोके घ्यायला लागले. जोराचा वारा सुटला होता. अंगाला सुखद गारवा जाणवत होता. आकाशात जमलेल्या काळ्या ढगांची गर्दी बघून पाऊस लगेच पळून जाणार नाही याची खात्री झाली. ढग गर्जना करीत होते. मधूनच विजा चमकत होत्या. मला गाण्यांची आवड असल्यामुळे पावसाची छान छान गाणी सुचायला लागली. माझ्या कॉलेजच्या खास मत्रिणीलाही पाऊस आणि गाण्यांची आवड असल्यामुळे, ती आत्ता इथे असती तर आमची हसतखेळत गाण्यांची मफीलच जमली असती असे वाटले.
जोरात येणाऱ्या वाऱ्यामुळे अंगणात प्राजक्ताच्या झाडाच्या फुलांचा सडा पडला होता. जाई, जुई, मोगरा, अनंत, चाफ्याची झाडे मस्त डोलत होती. त्या डोलण्याच्या आनंदात त्यांच्या फुलांच्या सुवासाचा दरवळ सर्वत्र भरून राहिला होता. दारात उभा असलेला आंबा, त्याच्या शेजारचा रायआवळा, घरासमोरचे सुरूचे झाड, नारळाचे झाडही आपल्या फांद्या इकडून तिकडे हलवीत आनंद व्यक्त करीत होते. प्रत्येक झाडाला आणि त्याच्या पान नि पानाला पावसाने सचल अंघोळ घातल्यासारखी वाटत होती. पानांचा हिरवा रंग आणखीनच खुलून दिसत होता. काही पानांवर पावसाचे पाणी मोत्यांसारखे चमकत होते. घराच्या बाहेरच्या भिंतींना लावलेला रंगही उठून दिसत होता. अंगणात साचलेल्या पाण्यात टपटप पडणारे थेंब मोठे विलोभनीय दिसत होते. काही ठिकाणी पाण्याचे ओघळ वहायला लागले. आकाशात व झाडांवरील पक्षी इकडून तिकडे उडायला लागले. त्यानंतर काही पक्षी आडोशाला बसून पंख फडफडवून ते वाळवायला लागले. पावसाच्या तालावर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. घरासमोर असलेल्या बििल्डगमधील छोटी छोटी मुले, त्या बििल्डगजवळ साचलेल्या पाण्यात डुबूक डुबूक उडय़ा मारीत होती. काहीजण पाण्यात कागदी होडय़ा सोडीत होती. एक मुलगी रेनकोट घालून पाण्यात नाचत होती, ते बघून मला हसू आले.
अंगणातील सृष्टी न्याहाळून आता माझा मोर्चा घरात वळला. मस्त गरमागरम कांद्याची भजी केली. भजी व वाफाळणारा चहा घेऊन मी आणि माझे पती गच्चीवर गेलो. पावसाळ्यात भजी व चहाचा आस्वाद घेत निसर्गाचे सुंदर रूप पाहण्यासारखा अवर्णनीय आनंद नाही. गच्चीतून माथेरानचा हिरवागार डोंगर दिसत होता. डोंगरावर अनेक लहानमोठे स्फटिकासारखे धबधबे कोसळत होते. डोंगरावर इकडून तिकडे काळे ढग पळत होते. काही डोंगराला टेकलेले दिसत होते. धुवाधार पाऊस पडत होता. ते सर्वच विलक्षण होते. आमच्या घराच्या मागे दूरवर काही शेताच्या पण जागा आहेत. तेथे शेतात काही माणसे काम करीत होती. पावसामुळे त्यांच्याही चेहऱ्यावर अर्थातच आनंद दिसत होता.
मग आम्ही मस्त गप्पा मारल्या. या पावसाबरोबर मला माझ्या आयुष्यातल्या अनेक सुख-दु:खाच्या आठवणी आल्या. लहानपणी कधी कधी शाळेतून येताना छत्री न उघडता पावसातून भिजून आल्यावर आई काळजीपोटी पटकन टॉवेलने केस पुसायची त्याची आठवण प्रकर्षांने आली. कॉलेजमधील मत्रिणींबरोबर काढलेली पावसातील उनाड ट्रीप डोळ्यांसमोर रेंगाळली. पावसात, मातीत खेळलो होतो, त्याची आठवण झाली. लग्नाच्या आधी मी व माझे पती पावसाळ्यात बदलापूरला बारवी डॅमला फिरायला गेलो होतो. तेव्हा मी मातीत पाय घसरून पडले होते. माझ्या पतींनी मला त्याची आठवण करून दिली व यावेळी पावसात कुठे फिरायला जायचे, अशी हसून चेष्टा केली.
बराच वेळ गच्चीत पाऊस बघून, त्या पावसाची व त्यामुळे खुललेल्या निसर्गाची पुन्हा पुन्हा उमलण्याची सुंदर शिकवण घेऊन, मन प्रफुल्लित करून, नव्या उमेदीत आयुष्य जगण्यासाठी आम्ही घरातील जिना उतरून आत आलो.
जोरात येणाऱ्या वाऱ्यामुळे अंगणात प्राजक्ताच्या झाडाच्या फुलांचा सडा पडला होता. जाई, जुई, मोगरा, अनंत, चाफ्याची झाडे मस्त डोलत होती. त्या डोलण्याच्या आनंदात त्यांच्या फुलांच्या सुवासाचा दरवळ सर्वत्र भरून राहिला होता. दारात उभा असलेला आंबा, त्याच्या शेजारचा रायआवळा, घरासमोरचे सुरूचे झाड, नारळाचे झाडही आपल्या फांद्या इकडून तिकडे हलवीत आनंद व्यक्त करीत होते. प्रत्येक झाडाला आणि त्याच्या पान नि पानाला पावसाने सचल अंघोळ घातल्यासारखी वाटत होती. पानांचा हिरवा रंग आणखीनच खुलून दिसत होता.
माधुरी साठे – madhurisathe1@yahoo.com