बंगल्याच्या मागे आणि पुढे अंगण आणि बाजूला मोठ्ठं आवार. मागच्या अंगणात तुळशी वृंदावन आणि अंगणाच्या बाजूला गोठा. त्यात गाय असायची. आमची दिवाळी वसुबारसपासूनच सुरू व्हायची. दिवाळीत गच्चीत असलेल्या झरोक्यात आम्ही पणत्या लावायचो. एकूण तेहतीस झरोके होते आणि आम्ही तेवढय़ा पणत्या लावायचो. ते दृश्य फारच विलोभनीय असे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमच्या वडिलांनी साधारण एकोणिसशे सदतीसच्या सुमारास सुंदर बंगला बांधला. बंगला तसा गावाबाहेर व समोर भव्य शीखमंदिर. आमचा बंगला दगडी बांधणीचा. बंगल्याच्या आतील भिंती मजबूत तीन-चार विटा जाडी असलेल्या, त्यामुळे भिंतीतच  कपाटं केलेली होती. बंगल्याला एकूण आठ खोल्या होत्या. प्रशस्त स्वयंपाकघर. त्यात एका वेळी बारा-पंधरा माणसांची पंगत सहज बसू शकत असे. स्वयंपाकघराला लागूनच साठवणीची खोली. त्यात वर्षभराचं धान्य, मसाले भरलेले असे. त्या वेळी जमिनीवर  लाद्या बसवण्याची पद्धत नव्हती. परंतु सिमेंट किंवा कोबा केलेला असे. आमच्या बंगल्यातही सिमेंटची गुळगुळीत लादी होती. आणि वडिलांनी दिवाणखान्यात मधे हिरवे व कडेला (बॉर्डर) चहूबाजूंनी लाल रंगाचे सिमेंट लावून जमीन केली होती. त्यामुळे सतरंजी अंथरल्यासारखे वाटत असे. आज जवळजवळ ऐंशी वर्षांनंतरही आमच्या घरातील कुठल्याही जमिनीला काहीही झालेले नाही. तसंच बंगलाही मजबूत स्थितीत आहे.

बंगल्याला आतून दगडी जिना, जिन्याखाली बळद होते. वरच्या मजल्यावर दोन मोठय़ा खोल्या व दोन मोठाल्या गच्च्या होत्या. उन्हाळ्यात गच्चीवर गप्पा मारणे हा आमचा आवडता कार्यक्रम. सुटीत नातेवाईक जमले की गच्चीत झोपायलाही मजा येत असे. मग आकाशातील तारे पाहात आम्ही झोपत असू. सप्तर्षी, ध्रुवतारा हे आम्हाला अगदी लहानपणी घरीच कळले.

बंगल्याच्या मागे आणि पुढे अंगण आणि बाजूला मोठ्ठं आवार. मागच्या  अंगणात तुळशी वृंदावन आणि अंगणाच्या बाजूला गोठा. त्यात गाय असायची. आमची दिवाळी ‘वसुबारस’पासूनच सुरू व्हायची. त्या दिवशी आई गाय व गोऱ्हा (असेल तर) यांची पूजा करायची. दिवाळीत गच्चीत  असलेल्या झरोक्यात आम्ही पणत्या लावायचो. एकूण तेहतीस झरोके होते आणि आम्ही तेवढय़ा पणत्या लावायचो. ते दृश्य फारच विलोभनीय असे.

हिवाळ्यात आवारातील झाडांचा पालापाचोळा गोळा करून त्यात भुईमुगाच्या शेंगा किंवा हुरडा घालून भाजून खायचो. उन्हाळ्यात वातावरणात गारवा राहावा तसंच नेहमी हवा शुद्ध राहावी म्हणून वडिलांनी  दहा-बारा कडुलिंबाची झाडं लावली होती. मला कडुलिंबाचे मोठे वृक्ष आठवतात. त्या झाडावर आम्ही दोरखंडाचे झोके बांधून (वडिलांच्या मागे लागून) त्यावर मनसोक्त झोके घेत असू. त्या वृक्षांखेरीज आवारात बेलाचं झाड, पारिजातक, जाई-जुईचे वेल, मोगरा, जास्वंदी अशी अनेक झाडे होती. आजी पूजा करायला बसली की आम्ही आवारातील फुले, बेल, तुळस, दूर्वा आणून देत असू.

वडिलांना फुलझाडांची फार हौस होती. बंगल्यासमोर मुख्य प्रवेशद्वारातून आत येताना दुतर्फा पावसाळ्याच्या सुरुवातीला आम्ही तेरडा, झिनिया, झेंडू यांची झाडे आलटूनपालटून लावत असू. झाडे मोठी होऊन फुलारली म्हणजे त्यावर कितीतरी वेगवेगळ्या तऱ्हेची फुलपाखरे येत. त्या फुलपाखरांचे निरीक्षण करण्याची मजा काही औरच असे. फुलझाडांबरोबर सीताफळ, डाळिंब, बोरं, पेरू, अंजीर, कागदी लिंबू यांची झाडंही आमच्या आवारात होती. भूक लागली तरी कितीतरी वेळा आम्ही खेळता खेळता मध्येच पेरू किंवा अंजीर फस्त करायचो.

बंगल्याच्या मागच्या बाजूला विहीर होती. त्या वेळी गावात नळ नव्हते. नदी होती आणि घरोघरी विहिरी होत्या. दगडी कट्टय़ाने बांधलेली, रहाट बसवलेली विहीर.. आम्ही दुपारी पाणी संथ म्हणून मुद्दाम विहिरीवर जाऊन त्यातील कासव बघत असू. कासव पोहताना मस्त दिसत असे.

असा आमच्या वडिलांनी स्वत:च्या देखरेखीखाली हौसेने बांधलेला बंगला इतक्या वर्षांनंतरही अजूनही जसा बांधताना होता तसाच आहे.

nshelatkar@yahoo.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strong stone bungalow
First published on: 20-10-2017 at 04:12 IST