घराला रंगकाम म्हटले की कोणता रंग द्यायचा? नेहमीचेच की काही नव्याने बदल करावा असे तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न समोर उभे राहतात. अशा वेळी काही नेमक्या गोष्टी लक्षात घेतल्यास रंग निवडीचे काम तितकेसे जाचक वाटणार नाही.
एखाद्या घरात प्रवेश करताच क्षणी आकर्षून घेते ती त्या घराची रंगसंगती. बऱ्याचदा सणाच्या निमित्ताने आपण घराची साफसफाई करीत असतो. नको असलेल्या गोष्टी टाकून देतो अन् काही नव्याने आणतो. पण इतके करून देखील घराला एकप्रकारचा तोचतोचपणा जाणवत असतो. अशा वेळी घरामध्ये छोटेसे जरी रंगकाम केले तरी घर छान नव्याने उजळू लागते. नुसतं रंगकाम, नाव जरी उच्चारलं तरी कित्येकांची नाकं मुरडली जातात. कारण रंगकाम हे कधीच छोटे असत नाही, असा ठाम विश्वास असतो. त्यामुळेच खोलीसाठी योग्य रंगसंगतीची निवड करणे महत्त्वाचे ठरते. कित्येक वेळेला खोलीला एकच रंग देऊन आपण मोकळे होत असतो. पण एकाच खोलीत दोन रंगसंगतीमधून ही परिणामकारकता साधता येते. शिवाय दरवेळी सगळाच रंग न बदलता एखादाच रंग बदलून देखील तोचतोचपणा टाळता येऊ शकतो.
म्हणूनच इथे काही खास टिप्स देत आहोत-
६०-३०-१० चा अवलंब करा- ६०-३०-१० म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कोणत्याही खोलीसाठी रंगकाम करताना ती ६०-३०-१० या स्वरूपाने विचार करून रंगवावी. म्हणजेच ६० टक्के मुख्य रंग, ३० टक्के दुय्यम रंग, १० टक्के विशेष रंग.
६० टक्के मुख्य रंगांतून नेमकी कल्पना स्पष्ट होते. त्याला पूरक अशा ३० टक्के दुय्यम रंगसंगतीतून नजरेला अपेक्षित असणारा एक आकर्षकपणा प्राप्त होतो आणि उरलेल्या विशेष १० टक्क्य़ांमधून एकप्रकारची खोलीमध्ये चमक जाणवते.
उत्तम रंग निवडीसाठी रंगचक्राची मदत घ्या.
घराला नेमका कोणता रंग द्यावा, हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपल्यासमोर नेहमी गोंधळाची स्थिती असते. एकाच रंगाचा वापर करावा की विविध रंगांचा, अमुक एक रंगसंगती चांगली दिसेल का, असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. अशा वेळी रंगचक्राचा आधार घ्यावा. यात दाखविलेल्या रंगसंगतीमुळे, जसे-लाल, हिरवा, निळा, पिवळा किंवा जांभळा-नािरगी. यामुळे यातली एखादी रंगसंगती त्या त्या खोलीला कशा प्रकारे शोभून दिसेल याचे एक चित्र आपल्या नजरेसमोर उभे राहते.
निसर्गातून बोध घ्या
रंगचक्राची मदत घेऊन देखील योग्य रंगसंगती सापडत नसेल तर सरळ निसर्गाची मदत घ्या. निसर्ग आपल्यासमोर इतक्या विविध रंगांची दालने खुली करून देत असतो, फक्त ती पाहण्याची नजर आपल्याकडे हवी असते. अशा निवडीतून केलेली रंगसंगती ही कृत्रिम न वाटता अधिक नसíगक वाटेल. अंतर्गत सजावटीसाठी खरी प्रेरणा ही निसर्गातूनच मिळत असते.
ऋतुबदलातील रंगसंगती साधण्याचा प्रयत्न करा
वर आपण १० टक्के विशेष रंगांचा विचार ध्यानात घेतला आहे, तो अशासाठी की, जर काही वर्षांनी आपण हा नुसता दहा टक्के रंगांचा भाग जरी बदलला तरी घराला एक सहजपणे नावीन्य प्राप्त होते. अशा वेळी पूर्ण रंग बदलला नाही तरी नावीन्याचा अपेक्षित परिणाम साधता येतो. जसे- लालसर किंवा गर्द पिवळया रंगामुळे खोलीला एक निवांतपणा जाणवतो. पण त्याच वेळी शरद ऋतूचा देखील फिल त्या खोलीला प्राप्त होईल किंवा गुलाबी, जांभळा, केशरी यासारख्या उठावदार रंगांमुळे वसंताचा प्रसन्नपणा त्या खोलीत जाणवेल.
विरुद्ध रंगसंगतीला कमी लेखू नका
विरुद्ध रंगसंगतीचा वापर केल्यामुळे खोलीला एकप्रकारची भव्यता प्राप्त होते. परंतु एखाद्या लहान जागेसाठी या संकल्पनेचा वापर केल्यास तितकी परिणामकारकता दिसून येत नाही. पांढरा-निळा, राखाडी बरोबर गुलाबी किंवा पांढरा किंवा मातकट रंगांबरोबर राखाडी किंवा पांढरा अशा प्रकारच्या रंगसंगतीचा बऱ्याचदा वापर करून झालेला असतो. पांढऱ्या किंवा ऑफ व्हाइट रंगाच्या पाश्र्वभूमीवर कोणतेही रंग नेहमीच उठून दिसतात. त्या ऐवजी निळ्या रंगांच्या पाश्र्वभूमीवर लाल, पिवळ्या रंगांचा वापर केल्यास खोली उठून दिसेल. याव्यतिरिक्त काळ्या-पांढऱ्या रंगांची जादू नेहमीच मनाला भुरळ घालत असते. आणि अशा रंगसंगतीच्या खोलीत मनाला नेहमीच एक प्रकारचा निवांतपणा जाणवत असतो.
ब्दांकन : सुचित्रा प्रभुणे
फेव्हिकॉल डिझाईन आयडियाज