या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शून्य कचरा संकल्पनेमधून पाल्र्यात एका वेगळ्या विश्वाची निर्मिती चालू आहे, ज्यात प्लास्टिकचा भस्मासुर नसेल, रासायनिक नाही तर सेंद्रिय खतांवर वाढणारा ताजा भाजीपाला असेल, घंटागाडय़ा, दरुगध रोगराईने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यावरील कचराकुंडय़ा नसतील.

काही महिन्यांपूर्वी देवनार डम्प यार्डला लागलेल्या आगींमुळे अर्धी मुंबई वेठीस धरली गेली होती. कचऱ्यात निर्माण झालेल्या मिथेन व अन्य विषारी वायूंमुळे आग, प्रदूषण यांनी थैमान घातले होते. नुकतेच वाचनात असेही आले होते की, डम्प यार्डची दरुगधी होणाऱ्या सासरच्या घरी येत असल्याने एका मुलीने होणारे लग्न मोडले. आजकाल प्लास्टिकचा भस्मासुर अशा प्रकारे मानव जातीच्या डोक्यावर हात ठेवू पाहत आहे. पर्यावरणाचा हा ऱ्हास वेळीच रोखण्यासाठी सुसंस्कृत पार्लेकर आता पुढे सरसावले आहेत ते स्वच्छ पार्ले अभियानाच्या माध्यमातून! याची सुरुवात झाली ती या गुढीपाडव्यापासून.

पण याची पूर्वतयारी खूप आधीपासून चालू होती. उत्कर्ष मंडळामध्ये सर्व पार्लेकरांसाठी एक शास्त्रशुद्ध प्रेझेन्टेशन ठेवण्यात आले होते. आमदार पराग अळवणी यांच्या पाठिंब्याच्या जोरावर  समीर वागळे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी शून्य कचरा, सेंद्रिय (गांडूळ) खत, गच्चीवरची शेती या संकल्पनांवर हे प्रेझेन्टेशन दिले. शून्य कचरा ही संकल्पना कविकल्पना नसून वास्तव आहे, हे पुराव्यासहित दाखवून दिले ते अंधेरीच्या विजय  नगर सोसायटी व कोलडोंगरीच्या देवांगिनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी.

आपल्या घरांमध्ये होणऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे रिसायकलिंग करणे, हा या अभियानाचा सुरुवातीचा उद्देश असला तरी सोसायटीतून डम्प यार्डला जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण शून्यावर आणणे हा या अभियानाचा अंतिम हेतू आहे.

आमदार पराग आळवणी यांच्या आमदार फंडातून या अभियानात सामील झालेल्या काही गृहनिर्माण संस्थांना कचऱ्याकुंडय़ांचे वाटप करण्यात आले. त्यासाठी विवेक ताम्हणकर यांनी कचराकुंडय़ा वाटपाची जबाबदारी उचलली. तीन वेगवेगळ्या रंगांच्या कुंडय़ांमधून स्वच्छ प्लास्टिक, स्वच्छ कागद व ई-वेस्ट कचरा संकलित करण्याचे ठरविण्यात आले. या अभियानाला सर्वप्रथम प्रतिसाद दिला ते शांतीवन, जानकी कुंज, सुकुमार, प्राचीसारख्या सोसायटी, साठय़े महाविद्यालय व जनता सहकारी- पुणे यांसारख्या बँकांनी. या उपक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी स्त्री-मुक्ती संघटनेची मदत घेण्यात येत आहे. या संघटनेमार्फत गोळा झालेला कचरा शास्त्रशुद्ध पद्धतीने रिसायकल किंवा नष्ट केला जात आहे. कचरा संकलनातून सोसायटी व स्त्रीमुक्ती संघटना या दोघांना आर्थिक लाभ होत आहे तो वेगळाच.

सध्या निर्माण होणारा ओला कचरा, महापालिकेच्या डम्प यार्डमध्ये पाठविण्याचा किंवा सोसायटीच्या आवारातच गांडूळ खतनिर्मितीद्वारे वापरून टाकायचा पर्याय सोसायटीला देण्यात आला आहे. ९ एप्रिल ते ३१ मे या अल्पावधीतच तब्बल २ टन कचरा रिसायकल करण्यात स्वच्छ पार्ले अभियानला यश आले आहे. ५९७ किलो कागद, ३२३ किलो प्लास्टिक, २१७ किलो ई-वेस्ट व ८९४ किलो मिक्स सुका कचरा २४ सोसायटींमधून गोळा झाला.

दर मंगळवारी व बुधवारी गोळा झालेल्या कचऱ्याचे संकलन करण्यात येते. अत्यंत पद्धतशीरपणे एक दिवस आधी स्त्रीमुक्ती संघटनेच्या रश्मी जोशी, संजीवनी ताई या संकलन वेळापत्रकाची माहिती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना देतात. ओला कचरा सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित करण्यासाठी सतीश कोलवणकर गांडूळखत निर्माण करण्याचे तंत्र शिकवितात, तर एरोबिक व एनरोबिक कल्चर असलेली पावडर वापरून खत करण्याचे मार्गदर्शन करतात अनिरुद्ध देशपांडे. थोडक्यात काय, तर उत्तम टीमवर्कमुळे शून्य कचरा मोहीम अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने यशाकडे झेपावत आहे

या मोहिमेत ज्येष्ठांपेक्षा लहानग्यांचा सहभाग जास्त उत्साहवर्धक आहे, कारण या झिरो गार्बेजमुळे त्यांना सायन्स प्रोजेक्टसाठी एक व्यासपीठ मिळाले आहे. सेंद्रिय खतामुळे घराच्या कुंडय़ांमधील, परसातील फुलझाडे- फळझाडे बहरू लागल्यामुळे ज्येष्ठदेखील खूश असतात. शून्य कचरा व सेंद्रिय खत ही पहिली स्टेज आहे. यानंतर पुढची पायरी म्हणजे गच्चीवर करण्यात येणारी शेती व पाल्र्यातच ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारे संयंत्र लावणे, कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून कचराकुंडीमध्ये टाकणे ही सवय मोडणे हेदेखील या अभियानाचे उद्दिष्ट आहे. कारण बंद पिशव्यांमुळेच एनरोबिक कंडिशन निर्माण होऊन मिथेनसारखा स्फोटक वायू बंदिस्त जागेत निर्माण होतो.  लेडमुळे पाण्याचे प्रदूषण होते, त्यामुळे पेन्सिल सेल्ससारखे ई-वेस्ट डम्पिंग यार्डमध्ये जाणार नाहीत याचीदेखील विशेष काळजी घेतली जाते.

कोणतेही चांगले काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी पूर्वप्रसिद्धी गरजेची असते. ‘स्वच्छ पार्ले अभियान’साठी तमाम पार्लेकरांनी वर्षभरापूर्वीच कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीवर स्वच्छतेची गुढी उभारून आपले इरादे स्पष्ट केले होते. शून्य कचरा मोहिमेत सामील झालेल्या सोसायटीबद्दल येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना देखील कळावे म्हणून सोसायटीच्या प्रवेशद्वारावर आमचादेखील स्वच्छ पाल्र्यासाठी छोटासा हातभार असे दर्शविणारा बोर्ड लावण्यात आला आहे.

कोणत्याही गोष्टीबद्दल अभिप्राय मिळाला तर ती गोष्ट अजून चांगली होऊ  शकते. काही ठिकाणी आतापर्यंत आपण किती कचरा गोळा केला आहे त्याचे विवरण सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लावलेले असते. यामुळे त्या दिशेने काम करणाऱ्या टीमचा उत्साह अजून वाढतो. तसेच प्लास्टिक, कागद, कपडा यांसारख्या पदार्थाचे विघटन होण्यास किती वेळ लागतो याचा तक्ता घरात डोळ्यांसमोर ठेवल्याने गृहिणी व घरातील इतर लोकांचा प्लास्टिक पिशव्या वापरण्याचा कल हळूहळू कमी होऊ  लागला आहे. जमा केलेले सुके प्लास्टिक किंवा कागद पावसात भिजू नयेत म्हणून पदाधिकारी आपल्या पोटच्या मुलांसारखेच कचऱ्याकुंडय़ांना पावसापासून वाचवत आहेत. शिवानंद सोसायटी येथे त्यासाठी खास ताडपत्री घालण्यात आली आहे.

थोडक्यात काय, तर शून्य कचरा संकल्पनेमधून पाल्र्यात एका वेगळ्या विश्वाची निर्मिती चालू आहे ज्यात प्लास्टिकचा भस्मासुर नसेल, रासायनिक नाही तर सेंद्रिय खतांवर वाढणारा ताजा भाजीपाला (गच्चीवरील शेती.. हो अगदी सिंगापूर स्टाइल!) असेल, घंटागाडय़ा, दरुगध व रोगराईने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यावरील कचराकुंडय़ा नसतील, असतील तर फक्त पर्यावरणपूरक हरित संकल्पनेमध्ये रमून गेलेल्या आनंदी व स्वयंपूर्ण वसाहती. जर या चळवळीला अजून बळकट व सर्वव्यापी बनवायचे असेल तर नागरिकांची अशी अपेक्षा आहे की, महापालिकेने मालमत्ता करात सवलत, पाणीपट्टीमध्ये सवलत असे गाजर गृहनिर्माण संस्थांना व आस्थापनांना दाखवावे. हे गाजर दाखवा अथवा न दाखवा, स्वच्छ पाल्र्याची पुंगी ही वाजणारच आहे व त्यावर सर्व पर्यावरणप्रेमींची मने डोलणारच आहेत. शून्य कचरा संकल्पना आपल्या विभागात सुरू करण्यासाठी समस्त पार्लेकर टीम आपल्याला सर्वतोपरीने सहकार्य देण्यास तयार आहे.

शून्य कचरा अभियानाचे फायदे..

  • प्लास्टिक, कागद, कपडा यांसारख्या पदार्थाचे विघटन होण्यास किती वेळ लागतो याचा तक्ता घरात डोळ्यांसमोर ठेवल्याने गृहिणी व घरातील इतर लोकांचा प्लास्टिक पिशव्या वापरण्याचा कल हळूहळू कमी होऊ  लागला आहे.
  • जमा केलेले सुके प्लास्टिक किंवा कागद पावसात भिजू नयेत म्हणून पदाधिकारी आपल्या पोटच्या मुलांसारखेच कचऱ्याकुंडय़ांना पावसापासून वाचवत आहेत.
  • या मोहिमेत ज्येष्ठांपेक्षा लहानग्यांचा सहभाग जास्त उत्साहवर्धक आहे, कारण या झिरो गार्बेजमुळे त्यांना सायन्स प्रोजेक्टसाठी एक व्यासपीठ मिळाले आहे.

prashant.dandekar@rediffmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zero garbage campaign
First published on: 25-06-2016 at 01:46 IST