तितिक्षा, खुशबू तावडे

‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तितिक्षा तावडे व आपल्या दिलखेचक रूपाची मोहिनी चाहत्यांवर पाडणारी अभिनेत्री खुशबू तावडे या दोघी गुणी अभिनेत्री सख्या बहिणी आहेत. त्यांच्या डोंबिवलीच्या घरी ‘बर्फी’ नावाची एक गोड कुत्री आहे.

तितिक्षा आणि खुशबूकडे असलेली बर्फी स्ट्रे डॉग या जातीची आहे. बर्फी आमचं तिसरं भावंड आहे, असं त्या दोघी सांगतात. तितिक्षा सांगते,

‘‘बर्फी आमच्या घरची सदस्य कशी झाली याची कहाणी माझ्या चांगल्याच लक्षात आहे. त्याचं झालं असं की, वाडय़ात आमचं एक घर आहे. दोन वर्षांपूर्वी ९ जुलैला मी, माझी बहीण खुशबू आणि आमची आणखी एक मत्रीण अशा आम्ही तिघी जणी गाडीने जात होतो. पावसाळ्याचे दिवस होते आणि आम्ही एके ठिकाणी उसाचा रस प्यायला थांबलो. तिकडे चिखलात खूप सारी गोंडस छोटी-छोटी कुत्र्यांची पिल्लं खेळत होती. आम्हा तिघींचं  त्या पिल्लांबद्दल बोलणं चालू होतं. तेव्हा तिकडचे एक गृहस्थ आम्हाला म्हणाले की, ‘ही पिल्लं अशीच खेळत खेळत रस्त्यावर जातात आणि मग गाडीखाली येऊन अपघातात सापडतात.’ हे ऐकून आम्हाला खूप वाईट वाटलं. तितक्यात एक छान पांढऱ्या शुभ्र रंगाचं पिल्लू आमच्याकडे आलं आणि त्याला सोडायचा मोह आम्हाला आवरला नाही. मी लगेचच माझ्या आई-वडिलांकडून त्याला घरी आणण्याची परवानगी मागितली. खरं तर त्यांना घरी प्राणी पाळणं मान्य नव्हतं. कारण त्या प्राण्यांची स्वत:च्या जिवापेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते, असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यांनी त्याक्षणी कोणतेही आढेवेढे न घेता परवानगी दिली आणि आम्ही बर्फीला आमच्या घरी घेऊन आलो.

त्या दोघी बर्फीला डोंबिवलीला आई-बाबांच्या घरी न ठेवता गोरेगावच्या घरी घेऊन आल्या. शूटिंगच्या निमित्ताने त्या गोरेगावला राहत असत. बर्फीचा पहिला दिवस गोरेगावच्या घरी गेला. तिच्यासाठी ही जागा नवीन होती म्हणून ती पहिल्या दिवशी रात्रभर अस्वस्थ होती. तिने तितिक्षा, खुशबूला रात्री झोपूच दिलं नाही. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी तिची काळजी घेण्यासाठी वेळापत्रक बनवलं. खुशबू सांगते, ‘‘माझं सकाळी शूट असल्यामुळे माझी मत्रीण दिवसा तिची काळजी घ्यायची आणि मग संध्याकाळी ६ वाजता ती बर्फीला माझ्या सेटवर आणून सोडायची. मग तिथे बर्फीला सांभाळायचं काम माझं. शूट संपल्यावर घरी घेऊन आल्यावर तिला रात्रीचं जेवण भरवायचे.

प्राण्यांच्या मलमूत्र विसर्जन प्रक्रियेबद्दल आम्हाला सुरुवातीला काहीच माहीत नसल्यामुळे त्यांना ट्रेन करेपर्यंत आमची खूपच तारांबळ उडाली. जिथे मॅगझीन किंवा पेपर्स दिसतील तिथेच ती सू करायची. तिचा वावर तसा अख्ख्या घरभर असल्यामुळे झोपेत तिने घरातील बेड खराब केला. आम्हाला त्याक्षणी काहीच सुचत नव्हतं. तिला दुसऱ्या खोलीत ठेवलं की ती रडायची. तेव्हा आमच्या लक्षात आलं की बर्फीला माणसासारखंच वागवायला हवं. आपल्याला हिला एक माणूस म्हणूनच वागवलं पाहिजे. कारण प्राण्यांनाही भावना असतात. बर्फीला लहान बाळासारखंच सांभाळायला हवं हे आम्ही मनाशी पक्कं केलं.

तिचं नाव काय ठेवायचं यावरही आम्ही खूप चर्चा केली. आम्हाला तिचं नाव जरा फिल्मी ठेवायचं होतं. मग आम्ही मस्तानी वगैरे अशी ऐतिहासिक नावंसुद्धा सुचवली. घरी नव्या बाळाचं आगमन होणार असेल तर आपण गमतीने विचारतो, ‘पेढा की बर्फी?’ त्यावरूनच आम्हाला सुचलं की हिचं नाव बर्फी ठेवू या.

बर्फी आता डोंबिवलीच्या घरी आईबाबांसोबत असते. खुशबू लग्न होऊन सासरी गेली. त्यामुळे बर्फीला सांभाळायची जबाबदारी तितिक्षावर आली आहे. त्यामुळे ती सध्या डोंबिवलीच्या घरात मोकाट आहे. आता ती दोन वर्षांची झाली आहे. तितिक्षा आणि खुशबू जेव्हा घरी जातात तेव्हा त्या बर्फीशी खूप खेळतात. डोंबिवलीत त्यांचं घर तिसऱ्या मजल्यावर आहे. खुशबू सांगते, ‘‘आम्ही बिल्डिंगखाली आलो की लगेच बर्फीला कळतं. आधी आम्ही घरी अचानक जाऊन सरप्राईज द्यायचो, पण आता बर्फीला बरोबर आमच्या येण्याची चाहूल लागते. त्यामुळे आम्ही पोहचायच्या आधीच ती दरवाजासमोर येरझाऱ्या घालत असते. तुमचे आणि या प्राण्यांचे सूर जुळले की प्रेमाचा झरा अविरत वाहू लागतो. हे आम्ही बर्फीच्या बाबतीत अनुभवतो. बर्फीला आमचं बोलणं कळतं. आपण म्हटलं की चल अंघोळी करू या की ती खुर्ची किंवा टेबलखाली लपून बसते. तिला बाहेर जायचं असेल तर तर ती शू-रॅकमधून आमचे चप्पल काढून आमच्या समोर ठेवते. किंवा तिचा पट्टा आणते आणि आमच्यासमोर ठेवते. म्हणजे आम्ही उठायचं आणि तिच्यासोबत बाहेर जायचं. मी जेव्हा घरी जाते तेव्हा ती माझ्याच ब्लॅंकेटमध्ये माझ्या शेजारीच झोपते.

बर्फी आणि आमच्या कुटुंबात जिव्हाळा निर्माण झाला आहे. ती आमच्या घरचीच सदस्य झाली आहे. आमचं तिसरं भावंडंच म्हणा ना!

शब्दांकन : मितेश जोशी

mitesh.ratish.joshi@gmail.com