प्राजक्ता म्हात्रे

निसर्गाच्या सान्निध्यात असणारं असं आमचं छोटंसं उरण हे ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’प्रमाणेच माझ्या हृदयात घर करून आहे. इथल्या करंजा गावातील द्रोणागिरी पर्वताबद्दल एक आख्यायिका आहे. मारुतीने लक्ष्मणाला संजीवनी वनस्पतीसाठी पर्वत उचलून नेत असताना त्या पर्वताचा एक तुकडा उरणच्या करंजा गावी पडला. तो डोंगर द्रोणागिरी डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या डोंगराच्या एका भागात द्रोणागिरी देवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिर टेकडीवर असून करंजा जेट्टीचे, समुद्र किनाऱ्याचे, तिथल्या होडय़ांचे विहंगम दृश्य या टेकडीवरून होते. द्रोणागिरीच्या डोंगरावर एक इतिहासकालीन पडका किल्ला आहे. उरणमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. चिरनेरचा महागणपतीच्या देवळावर जंगल सत्याग्रहाच्या खुणादेखील आहेत. उरणच्या बाजारपेठेत उरणावती देवीचे मंदिर आहे. याच देवीला शितळादेवी असेही म्हणतात. याच देवळाच्या आजूबाजूला एका ओळीत शंकर, विठोबा, तिरुपती, दत्तगुरू या देवतांची पूर्वीपासून मंदिरे आहेत. या भागाला देवळांवरून देऊळवाडी संबोधण्यात येते. त्याच्याच पुढे नाक्यावर, मारुती, गणपती व लक्ष्मीनारायण यांची पूर्वापार मंदिरे आहेत. देऊळवाडीच्या मागच्या अंगाला मोठा विमला तलाव आहे वयोवृद्धापासून ते लहान बालकांसाठी हे विरंगुळ्याचे स्थान आहे. केगांव या गावी माणकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्यातच आमच्या उरण तालुक्यात पूर्वीचे रानवड गावी असलेले रिद्धी-सिद्धी विनायकाचे देवस्थान आहे.

Ayodhya Ram Mandir Tourism
विश्लेषण: अयोध्येचे राम मंदिर ठरले ‘गेम चेंजर’, भाविकांमध्ये ५०० पटींनी वाढ; का वाजतोय धार्मिक पर्यटनाचा देशभरात डंका?
History of Geography Long lasting regimes For the economic prosperity of the people Water management
भूगोलाचा इतिहास: राजवटींच्या दीर्घायुष्याचे रहस्य?
Hanuman Temple Name in Pune Hanuman Jayanti 2024
‘जिलब्या मारुती, डुल्या मारुती…’ पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरांना का पडली असतील अशी नावे? जाणून घ्या…
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण

हिंदू धर्मात बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नहर्ता मानला जाणारा देव म्हणजे गणपती. गणपतीची अनेक नावे आहेत. त्यातील विनायक म्हणजे विशिष्ट रूपाने नायक किंवा नेता. रिद्धी-सिद्धी विनायका वरून सदर गाव हे विनायक या नावाने ओळखले जाते. विनायक गावातील परिसर हिरवागार आहे. इथे आल्यावर नक्कीच कोकणची सफर घडल्यासारखे वाटते. प्रत्येक घराच्या समोर छोटीशी फुललेली बाग, बागेत अबोली, गावठी गुलाब, जास्वंद, चाफा अशा प्रकारची टवटवीत फुले व त्यांचा सुगंध, त्यात आंबा, फणस, नारळांसारख्या महावृक्षांची शीतल सावली, विविध पक्ष्यांचे गुंजन, तोऱ्यात चालणाऱ्या वाटा, खेळता वारा असे सुंदर श्री रिद्धी-सिद्धी विनायकाच्या आशीर्वादाच्या छायेत असणारे विनायक हे गाव.

रिद्धी-सिद्धी विनायक हे प्राचीन मंदिर ६५४ वर्षांपासूनचे आहे. हे मंदिर शके १२८७ म्हणजे इसवी सन १३६५मधील हम्बीराज कालीन आहे. हम्बीराज हा देवगिरी येथील यादव राजवटीतला सरदार होता व त्याच्या आधिपत्याखाली कोंकण भूमीचा भाग होता. त्यानेच हे मंदिर बांधलेले आहे असे रानवड व अलिबाग-नागाव येथे सापडलेल्या प्राचीन शिलालेखात उल्लेख केला आहे. सध्या हे शिलालेख मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स या म्युझियममध्ये आहेत.

मंदिरातील गणेशाची मूर्ती ही दगडी कोरीव असून, अतिशय सुंदर व विलोभनीय आहे. एकाच पाषाणावर गणपती व त्याच्या दोन बाजूंना रिद्धी-सिद्धी उभ्या आहेत, हे या मूर्तीचे वैशिष्टय़ आहे. कारण अन्य कोणत्याही देवळामध्ये एकाच पाषाणावर गणपतीसह रिद्धी-सिद्धी असलेली अशी मूर्ती आढळून येत नाही. ही मूर्ती काळ्या पाषाणात असून, पाषाण साडेतीन फूट उंचीचा आहे तर अडीच फूट रुंद व आठ इंच जाडी असलेला आहे. विनायकाची मूर्ती साडेतीन फूट उंच असून, रिद्धी-सिद्धी दोन फूट उंचीच्या आहेत. श्री विनायकाने आपले दोन्ही पाय मांडी घालण्यासाठी दुमडलेले आहेत. श्री गजाननाने पितांबर धारण केलेले आहे, तसेच माथ्यावर सुंदर नक्षी असलेले मुकुट आहे. श्री गणेशाच्या हातात परशू, अंकुश आहेत आणि मांडीवर ठेवलेल्या हातात मोदक, लाडू आहेत. रिद्धी-सिद्धीच्या हातात चवऱ्या आहेत. मूर्तीचा गोलाकार गाभारा दगडी आहे. मुस्लिमांनी सदर मूर्तीचा विध्वंस करू नये म्हणून मंदिराचा कळस मशिदींच्या आकारासारखा बांधला होता. त्यामुळे १२ व्या शतकात ही मूर्ती टिकून राहिली. या मंदिराच्या गाभाऱ्यातून कळसाचे दर्शन होते हेदेखील या देवळाचे अजून एक वैशिष्टय़ आहे. गेली कित्येक वर्षे रोज सकाळी सूर्यनारायण या प्रथम पूज्य, विघ्नहर्त्यांचे चरण स्पर्श करण्यासाठी मंदिरात किरणरूपी नमस्कार घालतात. नियमित सकाळी सव्वासातला सूर्यकिरण मूर्तीवर पडतात. देवळाच्या बाजूला एक हिरवेगार तळे आहे. देवळाचा परिसर टापटीप व स्वच्छ आहे. या परिसरात एक विहीर आहे, त्यातून पाण्याच्या टाकीची सोय केलेली आहे.

मूर्तीच्या पाठीमागे सव्वातीन फूट उंचीचा प्राकृत भाषेतला शिलालेख आहे. शिलालेखाच्या वर सूर्य, चंद्र व कलश यांच्या आकृती आहेत, तसेच खालच्या बाजूला गद्धेगल म्हणजे वस्तूचा व जमिनीचा अपहार करणाऱ्यास दहशत घालणारे चित्र आहे. हा शिलालेख अनेक शतकांपासून एक गूढ होते, या गूढ शिलालेखाचा उलगडा सन ९१४० मध्ये सेंट झेवियर कॉलेज, मुंबईच्या हिस्टॉरिकल ग्रुपने केला हे अलीकडच्या काळात जुन्या कागदपत्रांचा शोध घेताना सापडले. या शिलालेखाचा मराठी अनुवाद नांदेड येथील इतिहास संशोधक प्रभाकर देव यांनी केलेला आहे.

सदर देवस्थानाची मालकी गेल्या नऊ पिढय़ांपासून घरत कुटुंबीयांकडे आहे. या देवळात श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे येणे-जाणे होते. श्रीमंत पेशव्यांनी सन्मानाने घरत कुटुंबीयांना फजनदार हा किताब बहाल केला व आजूबाजूच्या शेतजमिनी इनाम म्हणून या देवस्थानाला देण्यात आल्या. सन १८६७ मध्ये ब्रिटिश सरकारने पांडुरंग दामाजी घरत (खोत) यांच्या नावे सनद दिली. पूर्वी या देवस्थानाची पूजाआर्चा उपाध्ये कुटुंबाकडे होती. सन १९९३ पासून या देवळाचे व्यवस्थापकीय विश्वस्त- फजनदार हे सदानंद रघुनाथ घरत आहेत. हे मंदिर घरत घराण्याच्या मालकीचे असले तरी ते सगळ्यांसाठी खुले आहे व हे विनायक गावातले मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे.

सदानंद घरत यांच्या पुढाकारातून कौलारू व मोडकळीस आलेल्या जुन्या देवळाचे १९१० साली नूतनीकरण करून प्रशस्त व सुबक सभागृह असलेले मंदिर उभारण्यात आले. मंदिराचे नूतनीकरण केले असले तरी मंदिराचा मूळ गाभारा व घुमट जाणीवपूर्वक तसाच ठेवला आहे. तसेच सभागृहात असलेल्या प्राचीन काचेच्या हंडय़ा अजून काळजीपूर्वक जतन करून ठेवल्या आहेत व देवळाच्या प्रत्येक उत्सवाला व संकष्टी चतुर्थीला हंडीमध्ये काकडा प्रज्वलित करून मंदिराचे सभागृह मंगलमय व प्रकाशमय केले जाते. सदानंद घरत यांच्या वडिलांच्या नावाने देवळात नंदादीपाची ज्योत अखंड तेवत आहे. सभागृहात दोन बाजूला दोन लाकडी जिने असून, लाकडी खांबाची किनार असलेला माळा आहे. सभागृहाच्या भिंतीवर वरच्या बाजूला चारही दिशंना हत्तींची रांग व त्यावर कलाकुसर असलेल्या नक्षीची पट्टी आहे- जी सभागृहाच्या शोभेत वाढ आणते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मूर्तिरूपी हत्ती भाविकांचे स्वागत करतात. देवळाच्या आजूबाजूचा परिसरही हिरवागार आहे. मंदिर जवळच एक तुळशीवृंदावन आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या मारुती मंदिरातील शक्तिशाली मारुतीचे दर्शन घेतल्याने मनातील भय निघून जाऊन मन शांत होते. मंदिराच्या आवारातील रंगरंगोटी व कुंडय़ांमधली हिरव्यागार झाडे व फुलांमुळे परिसर सुशोभित दिसतो. काही दानी भक्तांनी दान म्हणून दिलेले बाकडेही मंदिराबाहेरच्या आवारात विश्रांतीसाठी ठेवले आहेत. देवळाच्या परिसरात भाविक यात्रेकरूंसाठी निवासस्थान उभारले आहे. या मंदिराची साफसफाई व नीटनेटकेपणा तिथे प्रवेश करताक्षणीच डोळ्यांना सुखावतो. परिसरात प्रवेश करायचा मुख्य दरवाजाही सुंदर मोराच्या नक्षीने सुशोभित केलेला आहे. मंदिरालगत असलेले तळे पाहून मन उल्हसित होते. या तळ्यात पूर्वी गावकरी मनमुराद पोहण्याचा आनंद लुटत असत.

गावकरी कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी विनायकाचे दर्शन घेतात व कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रार्थना करतात. २००३ साली या मंदिराचा द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सव साजरा झाला. या द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सवाच्या निमित्ताने रिद्धी-सिद्धी विनायकाची प्रतिमा असलेले एक नाणे काढण्यात आले. या नाण्याच्या छपाईचे काम उरण येथील रहिवासी मिंट टाकसाळमधील प्रोफेशनल कलाकार वसंत गावंड यांनी केले आहे. मूळ मूर्ती ही अत्यंत दुर्मीळ व पुरातन असून ती हल्लीच्या भेसळयुक्त शेंदूर व तेलामुळे मूर्तीची हानी होऊ नये या उद्देशाने पुरातत्त्व खाते व इतिहास संशोधक यांच्या सूचनेनुसार वसंत गावंड यांनी रिद्धी-सिद्धी विनायकाची हुबेहूब छोटी प्रतिकृती तयार केली आहे व ती भक्तांच्या पूजनासाठी सभागृहात एका जागी विराजमान केली आहे.

prajaktaparag.uran@gmail.com