घर सजवताना : वॉर्डरोब

हल्ली बऱ्याच ठिकाणी बेडरूममध्ये वॉर्डरोबसाठी म्हणून खास जागा इमारत बांधतानाच केली जाते

(संग्रहित छायाचित्र)

गौरी प्रधान

आपले वॉर्डरोब आणखी सुटसुटीत आणि नियोजनपूर्ण बनवण्यासाठी काही नामांकित कंपन्यांची उत्पादने आपल्याला मदत करू शकतात. यामध्ये पॅन्ट हँगर हे एक अतिशय उपयुक्त साधन आहे. ड्रॉवरप्रमाणे मागेपुढे होणारे हे पॅन्ट हँगर इस्त्री केलेल्या पॅन्ट न चुरगाळता ठेवण्यासाठी तसेच पटकन हवी ती पॅन्ट मिळण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे. याव्यतिरिक्त टाय होल्डर, बेल्ट रेक, स्कार्फ अडकवण्यासाठी विशिष्ट होल्डर, चपलांचे स्टँड आणि शिवाय घडय़ा घालून ठेवण्याच्या कपडय़ांसाठी हलक्या वजनाचे, तरीही मजबूत ड्रॉवरदेखील यात उपलब्ध आहेत.

कधी कधी मी सामायिक असतो, तर कधी अगदी वैयक्तिक. घरात अचानक पाहुणे येणार म्हटले की गपकन् घेतो सगळा पसारा पोटात सामावून.. आता ओळखा पाहू, मी कोण? असं काही विचारायची गरजच नाही, नाही का? सहजच लक्षात आलं असेल, ही सगळी वैशिष्टय़े ज्याच्याकडे ते म्हणजे कपाट असणार. पूर्वी लहान घरे आणि मोठी कुटुंबे त्यामुळे घरात फारशी कपाटे नसत; आणि असली तरी ती सामायिक- संपूर्ण कुटुंबाचे कपडे, महत्त्वाच्या वस्तू, इत्यादी सर्व काही एकाच कपाटात सामावले जाई. पण काळाचा महिमा मोठा. हळूहळू कुटुंबे लहान होत गेली आणि घरे मोठी. मग या कपाटांची जागा आधुनिक वॉर्डरोबने घेतली. आधुनिक घरातील फर्निचरमधील अविभाज्य घटकांपकी एक म्हणजे वॉर्डरोब. बेडरूममध्ये जितका बेड महत्त्वाचा तितकाच वॉर्डरोबदेखील महत्त्वाचा.

हल्ली बऱ्याच ठिकाणी बेडरूममध्ये वॉर्डरोबसाठी म्हणून खास जागा इमारत बांधतानाच केली जाते. त्यामुळे वॉर्डरोब ठेवावे कुठे, तसेच त्याची लांबी-रुंदी किती असावी हे प्रश्न फारसे पडत नाहीत. जिथे अशा खास जागेची व्यवस्था नसते, अशा ठिकाणी मात्र खोलीतील योग्य जागा आणि आपली गरज यांचा ताळमेळ बसवत वॉर्डरोब बनवावे लागते.

सुरुवातीच्या काळात वॉर्डरोब म्हणजे वरील बाजूस हँगरवर कपडे लटकवण्यासाठी जागा, मधल्या भागात ड्रॉवर किंवा लॉकर आणि त्याखाली घडी घातलेले कपडे ठेवण्याकरता शेल्फची व्यवस्था इतपतच मर्यादित होते. बरेचदा तर याच्या एका दरवाजावर आरशाचीदेखील व्यवस्था केली जात असे. शक्यतो, अशा वॉर्डरोबची उंची सात फुटांपेक्षा जास्त नसे; जेणेकरून कोणत्याही सर्वसामान्य उंचीच्या व्यक्तीला अगदी हँगरवरचे कपडेदेखील सहज काढता येतील. अशा वॉर्डरोबमध्ये सर्वसाधारणपणे सर्वासाठी सरसकट किंवा सरधोपट एकसारखीच रचना असे.

आज मात्र वॉर्डरोब बनवत असताना त्याची लांबी-रुंदी-उंची आणि अंतर्गत रचना या सर्वाचा व्यक्तिगत पातळीवर जाऊन विचार केला जातो. वॉर्डरोबची अंतर्गत रचना करत असताना जी व्यक्ती ते वापरणार आहे, तिच्या गरजांचा आणि मागण्यांचा विचार सर्वप्रथम करण्यात यावा. वॉर्डरोब वापरणारी व्यक्ती स्त्री आहे, पुरुष आहे, लहान मूल आहे की किशोरवयीन व्यक्ती याचा विचार वॉर्डरोब बनवताना केला गेला पाहिजे. शिवाय ती व्यक्ती कोणत्या पद्धतीचे कपडे वापरते यावरसुद्धा वॉर्डरोबची अंतर्गत रचना ठरते. उदा. वॉर्डरोब वापरणारी व्यक्ती जर स्त्री असेल आणि जर ती लांब कुर्ते घालत असेल तर ते लटकवण्यासाठी हँगरदेखील लांब असावा, नाही का? तीच गोष्ट वॉर्डरोबच्या रुंदीची. ब्लेझर किंवा कोट वापरणाऱ्या व्यक्तीचे वॉर्डरोब डिझाइन करताना किमान २४ व कमाल २६ इंच वॉर्डरोबची रुंदी असावी.

कपडे अडकवण्यासाठी हँगरची व्यवस्था झाल्यानंतर घडय़ा घालून ठेवण्याऱ्या कपडय़ांकडे वळू. पूर्वी याकरिता शेल्फ दिले जात, परंतु शेल्फवर घडय़ा घालून कपडे ठेवले की होतं काय, २४ इंचाच्या वॉर्डरोबमध्ये मागचे कपडे राहतात मागे आणि पुढचे पुढे शिवाय मागचे कपडे कपाटातून काढताना पुढच्या कपडय़ांची विस्कटाविस्कटदेखील होते. यावर उपाय म्हणून पाच ते सहा इंच उंचीचे आणि समोरील बाजूस काच असणारे ड्रॉवर बनवून घेतले तर कपडे व्यवस्थित राहतात. शिवाय मागेपर्यंतचे कपडे सहज बाहेर काढता येतात. याचा आणखी एक फायदा म्हणजे मागे ठेवलेले कपडे काढण्यासाठी फार वाकावे लागत नाही.

हल्ली बऱ्याच वेळा वॉर्डरोबमध्ये ठेवणीतल्या चपला-बूट ठेवण्याची व्यवस्थादेखील करावी लागते. परंतु कधीतरी ते मनाला पटणारेदेखील नसते. यावर उपाय म्हणून वॉर्डरोबचे दरवाजे थोडेसे वर घेऊन खालच्या बाजूस बाहेर उघडणारे ड्रॉवरदेखील आपण लावू शकतो.

याव्यतिरिक्त वॉर्डरोबमध्ये इतरही ड्रॉवरची रचना करताना सरसकट चार इंच किंवा पाच इंच अशी न करता काय वस्तू त्या ठेवायच्या आहेत त्याप्रमाणे करावी. दागिने, घडय़ाळे अशा वस्तूंसाठी थोडे उथळ आणि वेलवेटचे कापड वगरे लावून सज्ज केलेले ड्रॉवर बनवल्यास या वस्तू ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पेटय़ा सांभाळणे टळेल, शिवाय वस्तू सुरक्षित राहील. काही महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी संपूर्ण फाइल बसेल इतपत लांबी-रुंदीचा ड्रॉवर असावा. उंची मात्र किती फाइल एका वेळी ठेवणार आहोत यावर अवलंबून ठेवावी.

वॉर्डरोब बनवताना शेल्फ हँगर यांचा पारंपरिक पातळीवरून विचार करून झाला. आता पाहुयात आपले वॉर्डरोब सुटसुटीत आणि आणखी उपयुक्त बनवण्यासाठी बाजारात काय काय उपलब्ध आहे. आधुनिकता हे इंटेरिअर डिझायिनगचे अविभाज्य अंग आहे आणि फर्निचर बनवत असताना तर त्याचा प्रत्यय पावलोपावली येतो. आधीच लेखात नमूद केल्याप्रमाणे वॉर्डरोबची उंची ही पूर्वी सात फुटांपर्यंत असे, जेणेकरून वर अडकवलेले कपडे सहज काढता यावेत. परंतु आज मात्र वॉर्डरोब लिफ्टच्या साहाय्याने आपले कपडे अगदी आपण थेट नऊ फुटांवर काढून ठेवू शकतो. चकित होऊ नका, हा एक प्रकारचा हँगर रॉड आहे, ज्याला एका हँडलच्या मदतीने आपण सहजच वर-खाली करू शकतो. त्यामुळे अति उंचावरील कपडेदेखील सहज आपल्या हाताशी येऊ शकतात. अशाच प्रकारे आपले वॉर्डरोब आणखी सुटसुटीत आणि नियोजनपूर्ण बनवण्यासाठी काही नामांकित कंपन्यांची उत्पादने आपल्याला मदत करू शकतात. यामध्ये पॅन्ट हँगर हे एक अतिशय उपयुक्त साधन आहे. ड्रॉवरप्रमाणे मागेपुढे होणारे हे पॅन्ट हँगर इस्त्री केलेल्या पॅन्ट न चुरगाळता ठेवण्यासाठी तसेच पटकन हवी ती पॅन्ट मिळण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे. याव्यतिरिक्त टाय होल्डर, बेल्ट रेक, स्कार्फ अडकवण्यासाठी विशिष्ट होल्डर, चपलांचे स्टँड आणि शिवाय घडय़ा घालून ठेवण्याच्या कपडय़ांसाठी हलक्या वजनाचे, तरीही मजबूत ड्रॉवरदेखील यात उपलब्ध आहेत.

ही सर्व साधने वापरल्याने वॉर्डरोबची उपयुक्तता वाढते, त्याचसोबत जागेचा अपव्ययदेखील टळतो. या साधनांचा उपयोग करून कमीतकमी जागेत मावणारे तसेच कल्पकतेने जागेचा कानाकोपरा उपयोगात आणणारे, तरीही झटपट असे वॉर्डरोब आपण उभे करू शकतो, जे केवळ सुटसुटीतच नसेल तर आपल्या सर्व गरजा भागवणारेही असेल.

(इंटिरियर डिझायनर)

pradhaninteriorsllp@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Wardrobes tall cabinet clothes abn