|| माधुरी साठे

लहानपणापासून झोपाळा हा मला खूप प्रिय. ‘झू झू झोपाळा, नेऊ चला आभाळा..’ हे बोल बागेत झोपाळा खेळायला गेल्यावर आपसूक माझ्या मनात यायचे आणि ‘झुलतो झुला, जाई आभाळा, झुल्यासंगे झुलताना, खुलतो गं बाई गळा’ हे शांता शेळके यांनी त्यांच्या कवितेत म्हटलेले खरे व्हायचे. माझ्या मावशीच्या घरी लहानपणी आम्ही जायचो तेव्हा तिथला अंगणातील, प्राजक्ताच्या झाडाजवळ असलेला लाकडी झोपाळा मला फार आवडायचा. तेथे झोपाळ्यावर बसल्यावर, प्राजक्ताच्या दरवळणाऱ्या सुगंधाबरोबर, क्षणात आकाश कवेत यायचे आणि दुसऱ्या क्षणाला पुन्हा मातीचा स्पर्श पायांना होत असे.

लग्न झाल्यावर नेरळला आम्ही घर बांधले तेव्हा माझ्या यजमानांनाही आवड असल्यामुळे, आम्ही खास लाकडाचा झोपाळा सुताराकडून घरी बनवून घेऊन तो बाल्कनीत लावला. आणि हाच बाल्कनीतला झोपाळा आमच्या विरंगुळ्याचे ठिकाण झाला.

हा झोपाळा प्रत्येक ऋतूत मला एक वेगळाच आनंद देतो. उन्हाळ्यात झोपाळ्यावर बसल्यावर, आजूबाजूने आलेला वारा, पावसाळ्यात बेधुंद पाऊस बघत प्यायलेला चहा आणि भजीचा आस्वाद, हिवाळ्यात कोवळे ऊन अंगावर घेत ऊबदार वाटणे.. यांसारखी मजा शोधूनही सापडणार नाही.

एवढेच काय, माझ्या दिवसभरातील काही फुरसतीचा वेळही या झोपाळ्यावर सुंदर जातो. सकाळी चहा केल्यावर मी आणि माझे यजमान याच झोपाळ्यावर गप्पा मारीत चहाचा आस्वाद घेतो. त्यावेळी आलेल्या प्राजक्ताच्या मंद सुगंधाने मन मोहून जाते. यावेळी सूर्याचा मोठा लालभडक गोळा आकाशात वरती येताना दिसतो. ते दृश्य नयनरम्य असते. घरासमोरच्या झाडांवर, तारांवर वेगवेगळ्या रंगांच्या, नक्षीच्या पक्ष्यांना किलबिलाट करताना पाहून छान वाटते. याच झोपाळ्यावर कधीकधी नाश्त्याचा आस्वादही आम्ही घेतो. नंतर पेपर वाचणे, घरातील भाजी निवडणे, तांदूळ निवडणे या गोष्टीही येथेच होतात.

घरातील कामे आटपल्यावर जेव्हा दुपारी मी सवडीने या झोपाळ्यावर बसते, तेव्हा हलकेच आलेली वाऱ्याची झुळूक मन सुखावते. दाराच्या समोर लावलेला माझा लाडका आंबा वाऱ्याने डोलताना दिसतो. आंब्याच्या मोसमाच्या वेळी त्याला आलेला मोहर किंवा आंबे मला खुणावतात. रायआवळाही ऐटीत अंगावर रायआवळ्याचे घोस घेऊन स्वत:चे अस्तित्व दाखवीत असतो. यावेळी झोपाळ्याच्या साखळीला टेकून, मोबाइलवरील गाणी ऐकत एक छोटीशी शांत डुलकीही कधीतरी लागते.

संध्याकाळी वाऱ्याच्या जोरदार झोताने, आंब्याच्या शेजारी असलेल्या जाई, जुई, मोगऱ्याचा सुगंध आसमंतात पसरतो आणि झोपाळ्यावर बसलेल्या मला आनंद देतो. त्यावेळी कधीकधी मी झोपाळ्यावर बसून माझी आवडती जुनी गाणी हळूच गुणगुणते आणि हळूहळू किंवा मनात आल्यास मोठय़ाने झोके घेत, समोरच्या उंचचउंच सुरूकडे मान वरकरून बघते. मग सुरुच्या झाडावर सुगरण तिच्या पिल्लांसाठी खोपा विणताना दिसते. तिची उत्कृष्ट कारागिरी बघून कौतुक वाटते. तसेच सुरुच्या झाडावर गेलेल्या तोंडल्याच्या वेलाची तोंडली दिसतात. नारळाच्या झाडाआडून शांत अबोलीही डोकावताना दिसते आणि आकाशातील पक्ष्यांची माळ घरी परतताना बघितल्यावर दिवस संपत आल्याची हलकेच चाहूल लागते.

घरी पाहुणे आल्यावर झोपाळ्यावरच बसून गप्पा मारणे जास्त पसंत करतात. लहान मुले झोपाळा बघितल्यावर तर उडय़ाच मारायला सुरुवात करतात. या आमच्या बाल्कनीचे वैभव असलेल्या झोपाळ्याला माझ्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. माझ्या सुंदर सुखाची जागा आहे.