पियूष मिश्रा म्हणतात, नाटकाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अढळ आहे. नाटक थेट अनुभव देतं. त्या माध्यमातल्या उत्स्फूर्ततेची तुलना अन्य कशाशीच होऊ शकत नाही. चित्रपटात एखादी गोष्ट तुम्ही चित्रित करून ती पन्नास वर्षांनंतरही पाहू शकता. अगदी जशीच्या तशी. नाटक मात्र वर्तमानकाळात, त्याच क्षणात तुमच्यासमोर घडत असतं. एक प्रयोग आधीसारखा नाही. नवा प्रयोग, नवं घडणं. सदोदित नवा अनुभव. ही जादू वेगळीच आहे. इस्रायलमध्ये प्रत्येक मुलाला शाळेपासूनच सक्तीनं सैनिकी शिक्षण दिलं जातं, त्याचप्रमाणे आपल्याकडेही शालेय स्तरावर किमान दोन वर्ष तरी नाट्यशिक्षण अनिवार्य करावं. माझ्या प्राधान्यक्रमांत नाटक नेहमी अग्रस्थानी आहे. दिल्लीत मी वीस वर्ष नाटक केलं आहे. अजूनही करतो आहे.