मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत आरक्षण देणारे विधेयक आज (२० फेब्रुवारी) राज्य विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी मात्र मंजूर करण्यात आलेल्या या विधेयकावर शंका व्यक्त केली आहे. “१०० ते १५० जणांसाठी हे आरक्षण आहे. आम्हाला आमच्या हक्काचे ओबीसी समाजातील आरक्षण हवे आहे. आम्ही उद्या आमच्या आंदोलनाची घोषणा करणार आहोत. आमच्या आंदोलनाच्या उद्या दिशा ठरवण्यात येणार आहे, असे जरांगे यांनी सांगितले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.