भाजप आणि शिवसेनेतील घडामोडींकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे बारीक लक्ष असून महायुती तुटल्यास त्याचे परिणाम आघाडीवर होऊन दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याचा पर्याय स्वीकारू शकतात. भाजप-शिवसेनेप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादीतही जागावाटपाचे घोडे पुढे सरकू शकलेले नाही. राष्ट्रवादी १३२ जागांसाठी आग्रही असून, काँग्रेस १२४ ते १२६ पेक्षा जास्त जागा सोडण्यास तयार नाही. काँग्रेसबरोबर आघाडी करण्यापेक्षा वेगळे लढावे हा राष्ट्रवादीत मतप्रवाह आहे. आघाडीबाबत तोडगा काढण्याकरिता प्रफुल्ल पटेल आणि अहमद पटेल यांच्यात वाटाघाटी सुरू असल्या तरी चर्चा फार पुढे जाऊ शकलेली नाही.
भाजप आणि शिवसेनेत सध्या जागावाटपावरून बेबनाव निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांमधील घडामोडींकडे आमचे बारीक लक्ष असल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले. काँग्रेसचे नेतेही महायुतीमधील वादावादीनंतर अधिक सावध झाले आहेत. महायुती तुटल्यास राष्ट्रवादी आघाडीत राहणार नाही हे स्पष्ट आहे. त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.
राष्ट्रवादीने वाढीव संख्याबळाबरोबरच काँग्रेसच्या दृष्टीने निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागांवर दावा केला आहे. कोणत्या जागा सोडायच्या हा आमच्यापुढे कठीण प्रश्न असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीने दावा केल्याप्रमाणे सारे होण्याची शक्यता ठाकरे यांनी फेटाळून लावली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत येत्या दोन दिवसांमध्ये जागावाटपाची चर्चा होईल. सोनिया गांधी यांच्याच पातळीवर तोडगा निघावा, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. महायुतीमध्ये दोन दिवस चर्चेत गतिरोध निर्माण झाल्याने आघाडीचे नेते लगेचच घाई करणार नाहीत.
अपक्ष आमदारांचा राष्ट्रवादी प्रवेश
काँग्रेसने चार अपक्ष आमदारांना पक्षप्रवेश देऊन त्यांची उमेदवारीही जाहीर केल्याने राष्ट्रवादीने उद्या सात अपक्ष आमदारांना आपल्या कळपात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दिलीप सोपल, मकरंद पाटील, विलास लांडे, लक्ष्मण जगताप, रवी राणा, कृषिभूषण पाटील आदी आमदार उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात सामील होत आहेत.