मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागा या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेत महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. १९८५ नंतर प्रथमच सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे हे मुख्य राजकीय पक्ष स्वबळावर लढत असल्याने मुंबईतील राजकीय समीकरणे कशी राहतील याचा अंदाज वर्तविणे राजकीय पंडितांनाही कठीण जात आहे. शहराचे अनेक प्रश्न, पायाभूत सुविधांचा अभाव, झोपडपट्टीवासीयांच्या lok09समस्या हे मुद्दे प्रचारात अभावानेच दिसतात. केवळ भावनेच्या लाटेवर स्वार होऊन मते जिंकण्यावर सर्व पक्षांचा भर दिसतो.
लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत मुंबईकर साधारणपणे एकाच राजकीय पक्ष किंवा आघाडीच्या बाजूने कौल देतात, असा अनुभव आहे. १९८०, ८५ आणि ९०च्या निवडणुकींत मुंबईकरांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला होता. १९९५ मध्ये मुंबईतील ३४ पैकी ३१ जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. १९९९च्या निवडणुकीत मुंबईकरांनी प्रथमच संमिश्र कौल दिला. युतीचे जास्त आमदार निवडून आले असले तरी काँग्रेससाठी तेव्हा मुंबईचा कौल निर्णायक ठरला होता. २००४ आणि २००९ मध्ये मुंबईत काँग्रेसचा वरचष्मा राहिला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत मुंबईकरांनी महायुतीच्या बाजून भरभरून कौल दिला होता.
लोकसभा, विधानसभा किंवा महापालिका निवडणुकीत मुंबई राज्यापासून वेगळे करण्याचा मुद्दा प्रचारात येतोच. या वेळीही मुंबइचा मुद्दा प्रचारात प्रकर्षांने आला आहे. काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आणि सोशल मिडियावरून मुंबईच्या संदर्भातील प्रचार युद्ध सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या हातात राज्याची सूत्रे देणार का, अशा चर्चेने वेग पकडला. मोदी-शहा यांचे नाव वापरून मराठी विरुद्ध गुजराती असा रंग देण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू झाला. यासाठी मराठी अस्मिता जागृत करण्याचे प्रयत्न झाले. मुंबईत मराठी टक्का किती आहे, हा वादाचा मुद्दा आहे. मुंबईत ३० टक्क्यांच्या आसपास मराठी मतदार आहेत, असे म्हटले जाते. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावामुळे मुंबईने भाजप-शिवसेनेला भरभरून पाठिंबा दिला. मुंबई, ठाणे पट्टय़ात गुजराती मतदार फार मोठय़ा संख्येने मतदानाला बाहेर पडत नाहीत, असा आतापर्यंतचा अनुभव होता. पण मतदानाच्या दिवशी मुंबईत गुजरातीबहुल भागात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. हे सारे केवळ मोदी यांच्यासाठी होते. याचीच पुनरावृत्ती व्हावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. मुंबईतील मराठी रहिवाशांच्या मनात गुजराती भाषकांबद्दल काहीशी अढी असते. नेमक्या याच मुद्दय़ाला शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आडवाटेने हात घातला आहे.
गुजराती, उत्तर भारतीय आणि मराठी अशी मतदारांची मोट बांधून विजयाचे गणित जुळविण्यावर भाजपचा जोर आहे. उत्तर भारतीयांच्या मतांसाठी भाजपने उत्तर प्रदेशातील नेत्यांची फौज मुंबईत उतरविली आहे. मुंबईतील आठ ते दहा मतदारसंघांमध्ये गुजराती भाषक मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा तापविला जात असला तरी मराठी मतांचे मुख्यत्वे शिवसेना आणि मनसेमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे. सत्तेचा सोपान गाठण्याकरिता मुंबईतून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. मोदी यांचा करिष्मा आणि काँग्रेस विरोधी वातावरणाचा फायदा उठविण्यावर पक्षाचा जोर आहे. यामुळेच पंतप्रधान मोदी यांच्या दोन जाहीर सभांचे आयोजन मुंबईत करण्यात आले.  
अल्पसंख्याक, झोपडपट्टीवासीय, दलित, विविध भाषकांची मते मिळवून काँग्रेसने विजयाचे गणित आतापर्यंत साधले. यंदा भाजप आणि शिवसेनेचे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १७ आमदार निवडून आले होते. यंदा पक्षासाठी आशादायी चित्र नाही. मेट्रो, मोनो रेल्वे यासह मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांच्या आधारे मते मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आतापर्यंत भाजपची साथ असल्याने मराठीबरोबरच अन्य भाषकांची मते मिळून शिवसेनेला विजय मिळविणे शक्य होई. भाजपची साथ नसल्याने गुजराती भाषिकांची मते शिवसेनेच्या परडय़ात पडण्याची शक्यता कमी आहे. यामुळेच १९९२च्या दंगलीच्या वेळी गुजराती व्यापाऱ्यांच्या बाजूने शिवसेना उभी राहिली याची आठवण उद्धव ठाकरे यांना करून द्यावी लागली. उत्तर भारतीय मतदारांमध्ये शिवसेनेबद्दल तेवढी आपुलकी नाही. परत मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी मनसेचे उमेदवार आहेतच. लोकसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी रामदास आठवले यांच्यामुळे शिवसेनेला भीमशक्तीची साथ मिळाली होती. या वेळी आठवले भाजपबरोबर आहेत. या पाश्र्वभूमीवर विजयाचे गणित जुळविण्याचे शिवसेनेच्या उमेदवारांपुढे मोठे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत मनसेने शिवसेनेला मुंबईत मागे टाकले होते. लोकसभा निवडणुकीत मनसेची पीछेहाट झाली. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उसळी मारण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असला तरी मराठी मतदार कोणत्या ठाकरेंना स्वीकारतात यावरही बरेचसे अवलंबून आहे. शिवसेना आणि मनसे या दोघांनीही भाजप आणि मोदी यांना लक्ष्य केले आहे. गत वेळी जिंकलेल्या तिन्ही जागा कायम राखून आणखी जागा जिंकण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असला तरी इतर चार पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद आहे.
राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत मुंबईत राम कदम यांच्यासह एखाद-दुसरा अपवाद वगळता मोठय़ा प्रमाणावर पक्षांतर झालेले नाही. गेली दहा वर्षे मुंबईवर काँग्रेसचा वरचष्मा राहिला. पण, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पाश्र्वभूमीवर या वेळच्या पंचरंगी लढतीत कोण बाजी मारेल याचा अंदाज करणे कठीण
झाले आहे.