‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना घेऊन केंद्रात बहुमताने सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूकही विकासाच्या मुद्दय़ावर नेण्याचे प्रयत्न केले. काही प्रमाणात जरी तो मुद्दा जनतेपर्यंत पोचला असला तरी शिवसेनेचा भावनिक प्रचार आणि स्थानिक प्रश्न व उमेदवार यावरच मतांचे गणित अवलंबून राहणार आहे. निवडणुकीत प्रभावी ठरेल, असा कोणताही महत्वाचा मुद्दा नसल्याने भावनिकतेवरच प्रचार रंगला.
भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नसल्याने मोदी यांच्या नावावरच मते मागण्याची व्यूहरचना भाजपने केली. मोदी यांच्या नेतृत्वाबाबत जनतेमध्ये विश्वास व त्यांचे आकर्षण असले तरी ते राज्यात येऊन सरकार चालविणार नाहीत किंवा स्थानिक प्रश्न सोडविणार नाही, याचे भान हुशार मतदारांना आहे. त्यामुळे देशाच्या विकासाच्या मुद्दय़ावर मोदींबरोबर असलेला मतदार विधानसभेसाठी मात्र स्थानिक प्रश्न व उमेदवार पाहून विधानसभेसाठी मतदान होईल, असे दिसते. मोदी यांच्या प्रभावाचा वापर करुन ते सांगतील तो मुख्यमंत्री, अशी भाजपची भूमिका आहे. त्याला संमिश्र प्रतिसाद असून स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी काहींना उमेदवाराचा चेहरा आणि राज्याच्या नेतृत्वाचा चेहराही महत्वाचा वाटतो. आपला उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, त्यापेक्षा तो कोण व कसा आहे, किती काम करीत आहे व त्याच्यावर काही आरोप-प्रत्यारोप आहेत का, हा विचारही काही ठिकाणी मतदार करीत आहेत.
शिवसेनेचा प्रचार मात्र विकासापेक्षा भावनिक मुद्दय़ांवरच अधिक राहिला. सत्ता आल्यावर काय करणार, याची व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केली तरी त्यावर फारशी चर्चा होण्यापेक्षा भाजपशी युती का तुटली, यावरच शिवसेनेचा प्रचाराचा रोख राहिला. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरुनही शिवसेना-भाजपमध्ये हमरीतुमरी झाली. शेवटी भाजपने मवाळ धोरण स्वीकारत हा निवडणुकीचा मुद्दाच नसल्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपण केलेली कामगिरी मतदारांपुढे मांडली. मात्र विकासाच्या मुद्दय़ांपेक्षा आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक मुद्देच अधिक प्रभावी ठरल्याचे चित्र आहे.
शिवसेनेचे बालेकिल्ले हेच मोदींचे लक्ष्य
मुंबईसह ठाणे जिल्हा व कोकणात शिवसेना प्रभावी आहे. शिवसेनेचा हा बालेकिल्ला भेदण्यासाठी भाजपची व्यूहरचना होती. मुंबईत मोदींनी तब्बल तीन सभा केवळ दहा-बारा दिवसांत घेतल्या. त्याचबरोबर सोमवारच्या शेवटच्या दिवशीही मोदी ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रचार सभा घेत होते. राज्यात बहुतांश ठिकाणी भाजप विरोधात शिवसेना हीच लढाई आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला धडक देणे, हेच भाजपच्या प्रचार मोहीमेचे उद्दिष्ट राहिले.