झारखंड विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याचा राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) प्रस्ताव झारखंड मुक्ती मोर्चाने बुधवारी फेटाळला. ‘राजद’शी आमची आघाडीच नसल्याने विधानसभा निवडणूक एकत्रित लढवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो)सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. सध्या काँग्रेस आणि ‘राजद’च्या पाठिंब्यावर ‘झामुमो’ सरकार राज्यात अस्तित्वात आहे.
झारखंडमधील ‘राजद’चे प्रवक्ते मनोजकुमार यांनी आपण ‘झामुमो’शी संपर्क साधल्याचे सांगितले. यात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे न करण्याची सूचना आम्ही पक्षनेतृत्वाला केली होती, असे ते म्हणाले.
राज्यात ‘झामुमो’ची काँग्रेसशी असलेली आघाडी संपुष्टात आली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहेत. झारखंड विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. येत्या २५ नोव्हेंबर रोजी राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारचा शेवटचा दिवस होता.