News Flash

मनसे २००हून अधिक जागा लढणार!

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून लठ्ठालठ्ठी सुरू असतानाच अत्यंत शांतपणे महाराष्ट्रातील जागांचा सर्वकष आढावा घेऊन विधानसभेच्या २००हून जास्त जागा लढण्याचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी

| August 29, 2014 02:46 am

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून लठ्ठालठ्ठी सुरू असतानाच अत्यंत शांतपणे महाराष्ट्रातील जागांचा सर्वकष आढावा घेऊन विधानसभेच्या २००हून जास्त जागा लढण्याचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुतील मोदी लाटेचा फटका मनसेलाही बसला असला तरी विधानसभा निवडणुकीत चित्र बदललेले असेल एवढेच नव्हे तर मनसेला आश्चर्यकारक यश मिळेल असा विश्वास मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्दय़ावर ही निवडणूक लढवली जाणार असून विदर्भात चाळीसहून अधिक जागा लढविण्याचे दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी जाहीर करून भाजपच्या ‘गडा’ला आव्हान देणार हे स्पष्ट केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला जनता जशी कंटाळली आहे त्याचप्रमाणे कमकुवत विरोधी पक्ष असलेल्या सेना-भाजपवरही लोकांचा विश्वास नसल्याचे सांगत विधानसभेच्या २००हून अधिक जागा मनसे लढवेल असे मनसेचे सरचिटणीस व आमदार नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केले. मुंबई, ठाणे, पुणे नाशिकसह शहरी पट्टय़ात मनसेची ताकद असून येथे ११० जागा आहेत. त्याचप्रमाणे मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा पक्षबांधणी व उमेदवार चाचपणीचे काम पूर्ण केले आहे. विदर्भासह मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही मनसे मोठय़ा संख्येने विधानसभेत उमेदवार उभे करेल असे नितीन सरदेसाई यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर मनसेच्या ब्लू प्रिंटचे प्रकाशन राज ठाकरे करतील त्यावेळी खऱ्या अर्थाने राज्याचा विकास आराखडा कसा असेल ते दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले. विकास आकारखडय़ाच्या नावाने सवंग लोकप्रियतेच्या नुसत्या घोषणा करण्याऐवजी नियोजन व कालबद्ध विकास कसा होऊ शकतो याचे दिशादिग्दर्शन मनसेच्या ब्ल्यू प्रिंटमधून होईल असा विश्वासही सरदेसाई यांनी व्यक्त केला. सेना-भाजपचा जागावाटपाचा तिढा सुटला तरी स्वतंत्र विदर्भाच्या आणि जैतापूर अणुउर्जा प्रकल्पासह अनेक मुद्दय़ांची उत्तरे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या सेना-भाजपच्या नेत्यांना द्यावी लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मोजक्या जागा लढविण्यात आल्या होत्या त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक असल्यामुळे मनसे सर्वशक्तिनीशी उतरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने १४३ जागा लढविल्या होत्या व मनसेला २५ लाख मते मिळाली होती. विधानसभेत मनसेचे १३ आमदार विजयी झाले होते. मनसेला कमकुवत समजणारे तोंडावर आपटल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वासही सरदेसाई यांनी व्यक्त केला.  

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला जनता जशी कंटाळली आहे त्याचप्रमाणे कमकुवत विरोधी पक्ष असलेल्या सेना-भाजपवरही लोकांचा विश्वास नाही. या पाश्र्वभूमीवर मनसे विधानसभेच्या २००हून अधिक जागा लढवेल.
– नितीन सरदेसाई, मनसेचे सरचिटणीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 2:46 am

Web Title: maharashtra navnirman sena to contest more then 200 seats in maharashtra assembly elections
Next Stories
1 चर्चेला तोंड फुटले, तरी कोंडी कायम
2 पंतप्रधान कार्यालयाकडून राजनाथ सिंहांची पाठराखण
3 काँग्रेसच्या मंत्री,आमदारांना पुन्हा उमेदवारी?
Just Now!
X