भाजपच्या साथीने अडीच वर्षे नाशिक महापालिकेचा कारभार हाकणाऱ्या मनसेने आता पुढच्या अडीच वर्षांसाठी आपल्या इंजिनाला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चाके लावण्याचे प्रयत्न चालवले आहेत. आज, शुक्रवारी होत असलेल्या महापौरपदासाठीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला सत्तेपासून रोखण्यासाठी मनसे आघाडीशी हातमिळवणी करण्याचे संकेत आहेत. मात्र महापौर कुणाचा, यावरून अद्याप या नवीन ‘आघाडी’त अनिश्चितता आहे. दुसरीकडे सेना-भाजप युतीने सत्ता काबीज करण्यासाठी मनसेसह इतरही पक्षांच्या सदस्यांना जाळ्यात ओढण्याचे निकराचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
महापौर, उपमहापौरपद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी स्थानिक पातळीवर विलक्षण घडामोडी घडल्या. सकाळी काँग्रेस व राष्ट्रवादीची बैठक झाल्यावर या पक्षाच्या नेत्यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. या वेळी जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येण्यावर चर्चा झाली. युतीला रोखण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु महापौरपदावर मनसे आणि राष्ट्रवादी या दोघांनी दावा सांगितला. या संदर्भातील निर्णय तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांवर सोपविण्यात आला. या सर्व घडामोडींविषयी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अतिशय सावध भूमिका घेत स्पष्टपणे बोलण्याचे टाळले.
कोणत्याही परिस्थितीत सत्ता काबीज करण्याच्या उद्देशाने कामाला लागलेल्या शिवसेनेने मनसे व इतर पक्षांतील नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याअंतर्गत मनसेचे दोन नगरसेवक अलीकडेच सेनेच्या तंबूत दाखल झाले.

जादूई आकडा कुणाचा?
१२२ सदस्यांच्या पालिकेत महापौरपद पटकविण्यासाठी ६२ हा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे.
७१ हे मनसे-काँग्रेस-राष्ट्रवादी-माकप यांचे एकत्रित संख्याबळ आहे.  
४५ सदस्य युतीचे आहेत. अपक्ष गटातील सहापैकी एक नगरसेवक आधीच भाजपमध्ये दाखल झाला आहे.