पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार उद्या होणार आहे. त्याआधी पंतप्रधान कार्यालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन नावांची विचारणा केली होती. त्यापैकी शिवसेनेने अनिल देसाई यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज नवी दिल्लीत बैठक घेणार आहेत. या बैठकीत खातेवाटपासंदर्भात चर्चा होणार असून त्यानंतर शिवसेनेला मंत्रिपदाबाबत कळवण्यात येईल.
शिवसेनेचं काय करायचं हे पंतप्रधान ठरवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील सत्तेत आणि केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला किती वाटा द्यायचा याचा निर्णय मोदी घेणार आहेत. तर दुसरीकडे जनतेशी निगडीत खातं मिळालं तरच केंद्रात मंत्रीपद स्वीकारणार असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. राज्यातील तिढा सुटला तरचं अनिल देसाई हे केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे कळते.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात उद्या दुपारी १ वाजता मनोहर पर्रीकर, जे पी नड्डा, सुरेश प्रभूम, चौधरी विरेंद्र सिंग, हंसराज अहिर, जयंत सिन्हा, गिरीराज सिंग, राम कृपाल, विजय सपला, सवरमाल जाट, साध्वी निरंजन ज्योती, वाय एस चौधरी यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.