पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हवाई दौऱ्यामुळे इतर हेलिकॅप्टर्सच्या उड्डाणाला उशिरा परवानगी मिळत असल्याने राज्यातील अनेक नेत्यांच्या जाहीरसभांना उशीर होत असून या नेत्यांनी त्याचे सारे खापर मोदींवर फोडणे सुरू केले आहे.
देशाच्या पंतप्रधानाला विशेष सुरक्षा कवच प्रदान केलेले असते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची सभा ज्या ठिकाणी आहे तेथील हवाई, तसेच इतर हालचालींवर र्निबध घातले जातात. खबरदारीचा उपाय म्हणून मोदींचे आगमन झाल्यानंतर त्यांची सभा संपून ते परत जाईपर्यंत त्या भागातील हवाई वाहतूक बंद असते किंवा इतरत्र तरी वळवली जाते. एक आठवडय़ापूर्वी मोदींनी विदर्भात खामगाव व नागपूर येथे जाहीरसभा घेतल्या. याच दिवशी पश्चिम विदर्भात काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मोदींची खामगावची सभा होईपर्यंत राणेंचे हेलिकॅप्टर या भागातून उडू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रचार सभांना कमालीचा उशीर झाला.
काल शुक्रवारी मोदींच्या दोन सभा विदर्भात होत्या. या सभांचा फटका  अशोक चव्हाण, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना बसला.या सर्व नेत्यांनी नंतर सभेत बोलताना या विलंबाचा दोष मोदींवर ढकलला.