विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर अवघ्या तासाभरात वेगवेगळ्या संस्थांनी कोणत्या निकषांवर निकाल जाहीर केले ते जसे समजू शकत नाही तसेच मनसेला एवढय़ा कमी जागा कोणत्या आधारावर दाखवल्या तेही स्पष्ट होत नाही, असे सांगत मनसेला किमान २५ जागा मिळतील, असा विश्वास मनसेचे आमदार व सरचिटणीस प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
एक्झिट पोलचे अंदाज धक्कादायक वाटतात. एखाद्या मतदारसंघात पाच पाच वर्षे काम करूनही आम्ही ठामपणे विजयची खात्री देऊ शकत नाही तर हे एक्झिट पोलवाले मतदानानंतर तसाभरात २८८ मतदारसंघाचे ‘आकडे’ कसे सांगतात हा एक प्रश्नच असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्यावेळी कोणत्या ‘पोल’ने नरेंद्र मोदी यांची लाट आहे व त्यांना २८०पेक्षा जास्त जागा मिळतील, असे सांगितले होते असा सवाल त्यांनी केला. मनसेला अवघ्या ५ ते १२ जागा कशाच्या जोरावर दाखविल्या जातात याचे स्पष्टीकरण ‘पोलवाले’ का करत नाहीत, असे विचारत मनसेला किमान २५ जागा मिळतील, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.