वारकरी संप्रयादायातील ‘किर्तनकार’ आणि ६० हजार भगिनींचे ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे मनसेचे आमदार आणि आता घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम कदम यांची गेल्या पाच वर्षांतील प्रगती लक्षवेधी ठरली आहे. कदम यांच्या श्रीमंतीमध्ये गेल्या पाच वर्षांत तब्बल तिपटीने वाढ होऊन ती ३९ कोटींवर पोहोचली आहे.
लाखमोलाची ‘दहीहंडी’ उभारून रोतोरात राजकीय पटलावर अवतरलेल्या कदम यांनी २००९ मध्ये मनसेच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूकजिंकली. कधी महालक्ष्मी मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून तर कधी अधिकाऱ्यांना धमकावण्यावरून सतत या ना त्या वादामु़ळे बातमीत राहिलेल्या कदम यांनी आता मनसेचा झेंडा ठेवून भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. कदमांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेलया सांपत्तिी विवरणपत्रानुसार त्यांची मालमत्ता ३९ कोटींची आहे. पाच वर्षांपूर्वी ११ कोटींची जंगम आणि दोन कोटींची स्थावर मालमत्ता असलेल्या कदम यांनी पाच वर्षांत आपल्या श्रीमंतीचा आलेख ३९ कोटींच्या घरात नेली आहे. विविध पोलिस ठाण्यात तब्बल १० गुन्हे दाखल असलेलया कदम यांच्या नावावर १६ कोटी ५५ लाख तर पत्नीकडे १० कोटी ५५ लाख अशी २७ कोटींची जंगम मालमत्ता आहे. त्यामध्ये ६० लाखाच्या  अलिशान जग्वारसह स्कोडा, ऑडि, झेन अशा अर्धा डझन गाड्या आणि १ हजार १० किलोग्राम दागिन्यांचा सामावेश आहे. कदम यांच्याकडे १२ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये खार येथील १६०० चौरस फुटाच्या राहत्या घराचा समावेश आहे. कदम यांच्या शिरावर १६ कोटींचे कर्जही आहे.