जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी मतदारसंघातून सामंत उद्या शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून राष्ट्रवादीची नवीन उमेदवार निवडीसाठी धावपळ सुरू झाली आहे.
भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी या मतदारसंघातून कालच अर्ज दाखल केला असून पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅडव्होकेट बाबासाहेब परुळेकर यांनीही आज अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे माने दुहेरी अडचणीत आले आहेत.
सामंत सेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या, पण त्यांनी इन्कार केला होता. शुक्रवारी दुपारी ते मातोश्रीवर गेल्याचे येथे समजताच चर्चेला पुन्हा उधाण आले आणि थोडय़ाच वेळात सामंतांच्या येथील कार्यालयावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे फलक आणि झेंडे काढून टाकण्यात आले. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जय महाराष्ट्रच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे सर्वत्र ही बातमी झपाटय़ाने पसरली. दरम्यान, शनिवारी सकाळी मोठे शक्तिप्रदर्शन करीत सामंत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या मतदारसंघातून भाजपतर्फे माजी आमदार माने यांनी मागील दोन निवडणुका सामंतांशी अयशस्वी लढत दिली होती. या वेळी तरी ते ही मालिका खंडित करतात का? याबद्दल उत्सुकता होती. त्यांनी त्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. पण आजच्या नाटय़मय घडामोडींमुळे सामंत विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच माने यांचे पक्षांतर्गत विरोधक अ‍ॅडव्होकेट परुळेकरांनी उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.
शिवसेनेच्या स्थानिक नेते-कार्यकर्त्यांशी सामंतांचे अतिशय सलोख्याचे संबंध असून त्यांच्यापैकी काही जणांनी मागील निवडणुकांमध्ये त्यांना छुपी मदत केल्यामुळे विजय सुकर झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट आणि मुस्लीम समाज बदललेल्या राजकीय परिस्थितीतही त्यांच्या पाठीशी राहील, असा अंदाज आहे.