भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून चढाओढ सुरू असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अचानक आपल्याला मुख्यमंत्रीपदाची इच्छा नाही, असे मत व्यक्त करण्यामागे अमित शहा यांची ‘मातोश्री’ वारी कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजप आणि शिवसेनेत सध्या कटुता निर्माण झाली आहे. जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरून कोंडी झाली आहे. अमित शहा यांच्या मुंबई भेटीपूर्वी शिवसेनेने ‘शहाणा हो’ हे पोस्टर सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारीत केले होते. शहा यांनी ‘मातोश्री’ला भेट द्यावी म्हणून सारे प्रयत्न करण्यात आले. संजय राऊत शहा यांना जाऊन भेटले आणि उद्धव यांनी दूरध्वनी केला होता. त्यानुसार शहा हे ‘मातोश्री’वर दाखल झाले. भाजपचा अध्यक्ष ‘मातोश्री’वर आल्याने शिवसेनेचे नेते खुशीत आहेत.  शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीनंतर उद्धव ठाकरे यांची भूमिका का बदलली याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाची इच्छा नाही, असे विधान केले. रविवारी पत्रकार परिषदेतही हाच सूर कायम ठेवला. शहा यांनी ‘मातोश्री’ भेटीत अशी कोणी जादू केली की, उद्धव यांना भूमिका बदलावी लागली, अशी चर्चा रंगली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद भाजपकडे राहिले पाहिजे, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा हे दोघेही आग्रही आहेत. अमित शहा यांची ‘मातोश्री’ भेट आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून भूमिका बदलणे याचा काही योगायोग आहे की काय, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. हा योगायोग नसल्यास उद्धव यांनी आताच या विषयावर का विधान केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.