विदर्भातील अनेक समर्थकांना पक्षाची उमेदवारी मिळवून देऊन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मात केल्याने मुख्यमंत्री समर्थकांमध्ये सध्या अस्वस्थता पसरली आहे. सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी यातूनच काँग्रेसचा त्याग करून भाजपची वाट धरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ऐन निवडणुकीत भगवी वाट धरणारे देवतळे राज्यातले दुसरे मंत्री ठरले आहेत.
यावेळी विदर्भातील उमेदवार ठरवताना काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात बरीच धुसफूस झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विदर्भातील जास्तीत जास्त समर्थकांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. मात्र, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर मात केल्याचे अंतिम यादीवरून स्पष्ट झाले आहे. अशोक चव्हाण विदर्भातील १२ समर्थकांना पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहेत. तुमसर, ब्रम्हपुरी, चिमूर, वरोरा, गडचिरोली, चंद्रपूर, आमगाव, साकोली या मतदारसंघातील उमेदवार अशोक चव्हाणांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांना वरोरातून उमेदवारी द्यावी, असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह होता. त्यांच्याच सूचनेवरून ते लोकसभेची निवडणूक लढले होते. मोदी लाटेमुळे त्यांचा पराभव झाला. त्यामुळे यावेळी उमेदवारी मिळेल, या आशेवर देवतळे होते. अखेरच्या क्षणी त्यांचा पत्ता कापण्यात आला.
देवतळेंचे चुलत बंधू विजय देवतळे अशोक चव्हाणांचे समर्थक आहेत. त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. दोन चव्हाणांच्या रस्साखेचीत थेट घरातच भांडण लागल्याने संतप्त झालेल्या देवतळेंनी आज चक्क भाजपची वाट धरली. गेल्या २० वर्षांंपासून आमदार असलेले देवतळे मितभाषी म्हणून ओळखले जातात. मुळचे वध्र्याचे असलेले महेश मेंढे यांना चंद्रपुरातून उमेदवारी देण्यात आली. यासाठी अशोक चव्हाणांनी वजन खर्च केले. चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मदत केली, असे मुख्यमंत्री समर्थकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार विजय वडेट्टीवार यांनी चव्हाण हे केवळ मराठवाडय़ाचे नाही, तर राज्याचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना पक्षाने उमेदवारी दिली तर बिघडले काय, असा सवाल लोकसत्ताशी बोलताना उपस्थित केला. देवतळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या काही बोलू इच्छित नाही, असे सांगितले.