स्वबळावर लढताना जागा वाढतील, असा दावा काँग्रेसचे नेते करीत असले तरी हक्काच्या जागा अडचणीत आल्या असतानाच हमखास यश मिळवून देणाऱ्या विदर्भ, मुंबई आणि मराठवाडय़ात पक्षासमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना उतरवून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न असला तरी जादूची कांडी कितपत चालेल याबाबत साशंकताच आहे.
काँग्रेससमोर दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी असा दोघांशी सामना करावा लागत आहे. अर्थात काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेशी लढत होत आहे. भले सत्ता नाही आली तरी चालेल, पण काँग्रेसला अद्दल घडवायचीच या उद्देशाने अजित पवार रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने पाडापाडीचे उद्योग सुरू केल्याच आरोप काँग्रेसचे नेते करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात पक्षाचा दारुण पराभव झाल्याने काँग्रेसचे नेते हादरले आहेत. अशा परिस्थितीत कसा सामना करायचा हा प्रश्न काँग्रेसला पडला आहे.
गेल्या वेळी विदर्भात ६२ पैकी २४ आमदार काँग्रेसचे निवडून आले होते. सर्वाधिक आमदारांचे बळ विदर्भातून मिळाले होते. यंदा विदर्भात फार मोठय़ा यशाची काँग्रेसला अपेक्षा नाही.
१० ते १२ उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मराठवाडय़ातील ४६ पैकी १८ जागा काँग्रेसला गेल्या वेळी मिळाल्या होत्या. नांदेड, लातूरने काँग्रेसला नेहमीच साथ दिली. यंदा लातूरमध्ये दोन किंवा तीन जागांबाबत पक्ष आशावादी आहे. नांदेड जिल्ह्यातही गेल्या वेळ एवढे यश मिळण्याचे आव्हान आहे. मुंबईत १७ आमदार निवडून आले होते. या वेळी मुंबईत काँग्रेसला तेवढे आशावादी वातावरण नाही. दुहेरी आकडा गाठण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढीत काँग्रेसला मुसंडी मारावी लागेल. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात मर्यादित यशाची अपेक्षा आहे. एकूणच काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी नाही.
पक्षाचे सारेच पहिल्या फळीतील नेते आपापल्या मतदारसंघांमध्ये अडकले आहेत. त्यातच नेतेमंडळींमध्ये एकवाक्यता दिसली नाही. प्रचाराची धुरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर असली तरी त्यांनाच दक्षिण कराडची निवडणूक सोपी नाही. राष्ट्रवादीपेत्रा जास्त जागा निवडून आणण्याचे काँग्रेसपुढे आणखी एक मोठे आव्हान आहे.
काँग्रेसला यश मिळेल – पृथ्वीराज चव्हाण
लोकसभा निवडणुकीत अपयश आले असले तरी विधानसभा निवडणुकीत नक्कीच पक्षाला चांगले यश मिळेल. पक्षाबद्दल जनतेमध्ये विश्वासाची भावना असून, सर्वच विभागांमध्ये चांगले यश मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून खोटी आश्वासने दिली जात असल्याची जनतेची भावना झाली आहे. त्याचा फटका भाजपला नक्कीच बसेल, असेही चव्हाण यांनी सांगितले.