अहमदनगर जिल्हय़ात भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या, त्यामुळे शिवसेनेची पीछेहाट झाली. दोन्ही काँग्रेसला जिल्हय़ात फारसा धक्का लागला नाही. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवूनही जिल्हय़ाचा हा मूळ प्रवाह तसा कायम आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा मतदारसंघात बारापैकी अकरा मतदारसंघांत युतीने आघाडी घेतली होती. त्यातील जवळजवळ निम्म्या म्हणजे पाच मतदारसंघांत आता भाजप व शिवसेनेला पराभवच स्वीकारावा लागला.
नेवासे मतदारसंघात राष्ट्रवादीचे मातब्बर उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांना तुलनेने फाटक्या कार्यकर्त्यांकडून पराभव पत्करावा लागला. काँग्रेसमधून ऐन वेळी भाजपत गेलेले बाळासाहेब मुरकुटे या तुलनेने अत्यंत साध्या कार्यकर्त्यांने त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचेच दुसरे मातब्बर आमदार चंद्रशेखर घुले यांनाही शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून पराभवाचा धक्का सहन करावा लागला, मात्र येथे दोन प्रस्थापितांमध्येच लढत होती. राष्ट्रवादीतूनच भाजपमध्ये गेलेल्या मोनिका राजळे यांनी येथे मोठय़ा फरकाने घुले यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे माजी मंत्री व भाजपचे माजी उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष होते. राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांनी त्यांचा पराभव केला, मात्र ही लढतही दोन तुल्यबळ प्रतिस्पध्र्यामध्येच होती.wm04काँग्रेसने त्यांच्या तिन्ही जागा कायम राखल्या. अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांनी मोठय़ा फरकाने विजय मिळवला. विखे जिल्हय़ात सर्वाधिक म्हणजे ७५ हजार मतांनी विजयी झाले. जिल्हय़ाच्या राजकारणात नगर शहराला फारसे राजकीय महत्त्व नाही, तरीही येथील निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होती. अनिल राठोड यांच्या सलग पाच विजयांनंतर राष्ट्रवादीने या वेळी चुरशीच्या निवडणुकीत ही जागा खेचून आणली आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. शिवसेनेचे यश पारनेरपुरतेच मर्यादित राहिले. भाजपने तीन जागा वाढवताना एक जागा  शिवसेनेकडून हिसकावली. एका जागेवर भाजपमुळेच शिवसेनेला पराभव पत्कारावा लागला. भाजपच्याही पाच विजयी उमेदवारांपैकी दोघे काँग्रेसच्या प्रवाहातील आहेत.