एकीकडे शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली असतानाच खुद्द उद्धव यांनीच शनिवारी आपल्याला या पदात स्वारस्य नसल्याचे जाहीर केले. येथील जाहीर सभेत उद्धव यांनी ही घोषणा केली. राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारला ‘चले जाव’चा इशारा देणाऱ्या शिवसेनेच्या जनआंदोलनाची सुरुवातही येथून झाली.
येथील माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकाराने लोहा येथे शनिवारी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. अभिनेता व सेनेचे उपनेते अमोल कोल्हे व सचिव आदेश बांदेकर यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी कसून प्रयत्न केले पाहिजेत व त्यासाठी जोरदार तयारी करण्याचे आवाहन केले. उद्धव यांनी हाच धागा पकडून मुख्यमंत्रिपदात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, ‘आघाडीचे दिवस आता भरले आहेत. हे सरकार खोटय़ा जाहिराती करून जनतेची फसवणूक करीत आहे. शिवशाही व आताच्या काळातील कामांची तुलना झाली पाहिजे, असे सांगतानाच हे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी मतदारांनी सज्ज व्हावे. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनापासून काँग्रेस-राष्ट्रवादी ‘चले जाव’चे जनआंदोलन सुरू करीत आहोत’, असे ते म्हणाले.
चिखलीकरांनी भाषणात विस्ताराने भूमिका मांडली. खासदार चंद्रकांत खैरे, संजय जाधव व रवींद्र गायकवाड, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, धोंडूतात्या पाटील (लातूर) व आनंदराव जाधव (हिंगोली), आमदार मीरा रेंगे, आदी उपस्थित होते.
पवारांना टोला
शरद पवार यांनी आमचा पक्ष फोडला. आता त्यांचा पक्ष फुटत आहे. एकेक चांगले नेते आमच्याकडे येत आहेत. आता तुम्हाला कसं वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गद्दारांचा पक्ष आहे, असा आरोपही उद्धव यांनी या वेळी केला.
संग्रहित लेख, दिनांक 7th Sep 2014 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्रिपदाची इच्छा नाही..
एकीकडे शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली असतानाच खुद्द उद्धव यांनीच शनिवारी आपल्याला या पदात स्वारस्य नसल्याचे जाहीर केले.
First published on: 07-09-2014 at 03:06 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No interest in cm post uddhav thackeray