ठाणे आणि नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्य़ातील विधानसभेच्या २४ जागांपैकी अधिकाधिक जागांवर विजय मिळविण्याची चांगली संधी यंदा शिवसेना-भाजप या दोन पक्षांना असली तरी योग्य उमेदवाराची निवड करणे आणि होऊ घातलेली बंडाळी मोडून काढणे, ही दोन मोठी आव्हाने स्थानिक नेतृत्वांना पेलावी लागतील, असे दिसते. लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्य़ांमधील चारही जागांवर युतीला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे विधानसभेतही हीच स्थिती कायम राहील अशा आविर्भावात युतीचे नेते आता वावरू लागले आहेत. शिवसेनेचे मुंबईतील नेते काहीही म्हणोत, पण ‘मोदी येतील आणि आपल्याला तारून नेतील’, अशी हवा या येथील सेना इच्छुकांमध्ये आहे. प्रत्यक्षात आघाडीचे आणि विशेषत: राष्ट्रवादीचे आव्हान मोडून काढण्यासाठी युतीच्या उमेदवारांना जंगजंग पछाडावे लागेल, अशीच सध्याची चिन्हे आहेत.
 नवी मुंबईत गणेश नाईक, कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड, वसई-विरार परिसरात हितेंद्र ठाकूर यांच्यासह ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात असलेला राष्ट्रवादीचा वरचष्मा संपविणे वाटते तितके सोपे नाही. या सगळ्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आमदारांना आव्हान असले, तरी युतीच्या गोटात सर्वकाही आलबेल नाही. ठाणे, कल्याण, नवी मुंबई, मुरबाड, बदलापूर यासारख्या शहरांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद आहेत. लोकसभेतील विजयामुळे जवळपास प्रत्येक मतदारसंघात सेनेतील इच्छुकांचा आकडा किमान अध्र्या डझनाच्या घरात आहे. कल्याणमधील परिस्थिती वेगळी नाही. या सगळ्यांना ‘शब्द’ देऊन विद्यमान संपर्कप्रमुख एकनाथ िशदे यांनी पेच वाढवला आहे.
ठाण्यासारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही नेमका हाच घोळ सुरू आहे. कल्याण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी यासारख्या परिसरात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधील इच्छुक उमेदवारांमध्ये आतापासूनच संघर्ष उभा ठाकला आहे. बदलापुरात शिवसेनेच्या वामन म्हात्रेंना किसन कथोरे नकोत, तर कथोरेंचे खासदार कपिल पाटीलांशी जमेना. या अशा परिस्थितीत युतीच्या प्रत्येक उमेदवाराला आघाडीशी लढण्यापूर्वी स्वकीयांशी लढावे लागेल, अशी सध्याची परिस्थिती आहे.

कल्याण :
कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि कळवा मुंब्रा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. मराठी मतदारांची संख्या अजूनही अधिक असलेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे रवींद्र चव्हाण हे आमदार आहेत. या सुशिक्षित मतदारसंघात आमदार चव्हाण यांची कामगिरी फारशी चमकदार होण्याऐवजी वादग्रस्तच ठरली आहे. येथून मनसेने एखादा सुशिक्षित उमेदवार िरगणात उतरवला तर चव्हाण यांना बालेकिल्ल्यातच कडवी लढत द्यावी लागेल, असे सध्याचे चित्र आहे.

ठाणे :
ठाणे शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला पूरक असले तरी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातून पक्ष कुणाला उमेदवारी देतो याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. येथून राष्ट्रवादीकडून विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे िरगणात उतरण्याची चर्चा आहे. नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघात यंदा पालकमंत्री गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ऐरोलीतून संदीप नाईक यांच्याविरोधात विजय चौगुले आणि वैभव नाईक अशा दोन नावांवर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मीरा-भाइंदर मतदारसंघात मात्र भाजपचे नरेंद्र मेहता यांच्यासाठी पहिल्यांदाच अनुकूल चित्र दिसत आहे.

भिवंडी :
कपिल पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे येथील सहा मतदारसंघांत पक्षाला ‘अच्छे दिन’ येण्याची स्वप्ने पडू लागली असून काँग्रेस आघाडीला अंगावर घेण्याऐवजी भाजपचे स्थानिक पुढारी शिवसेनेलाच आव्हान देऊ लागल्याचे चित्र आहे. मुरबाडचे राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे सध्या भाजपच्या वाटेवर असले तरी त्यांच्या प्रवेशाला पक्षातूनच विरोध सुरू झाल्याने शिवसेनाही मतदारसंघासाठी आक्रमक बनली आहे. भिवंडी ग्रामीणमधून भाजपचे विद्यमान आमदार विष्णू सावरा यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध होऊ लागला आहे.

पालघर :
हितेंद्र ठाकूर यांचा मतदारसंघावरील वरचष्मा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खालसा झाला असला तरी नालासोपारा, बोईसर, वसई-विरार या पट्टय़ात ठाकुरांचा पाडाव करणे तितके सोपे नाही. मात्र या भागातील शिवसेनेचे नेते विवेक पंडित यांनी ठाकुरांपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. पालघर मतदारसंघात विद्यमान राज्यमंत्री राजेंद्र गावित यांची अवस्था बिकट असून शिवसेनेला हा मतदारसंघ मिळविण्याची चांगली संधी आहे. डहाणू-विक्रमगड परिसरातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते एकापाठोपाठ शिवसेनेत दाखल होऊ लागल्याने आघाडीला धक्का बसला आहे.