राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन हात करताना नाकी नऊ आलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये आता उमेदवार निश्चितीवरून घमासान सुरू आहे. ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार निश्चितीवरून काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश व ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. उमेदवार निश्चितीसाठी सुरू असलेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत हा प्रकार झाल्याने उपस्थित सर्वच नेते अवाक झालेत.
बैठकीत उपस्थित असलेल्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना तेथूनच उमेदवारी देण्यात यावी, असा प्रस्ताव मोहन प्रकाश यांनी मांडला. त्यावर मुकुल वासनिक यांनी जोरदार आक्षेप घेतला. वडेट्टीवार हे चिमूरमधून आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी तेथूनच लढावे. सुरक्षित मतदारसंघाच्या नावाखाली त्यांना ब्रह्मपुत्रा मतदारसंघातून उमेदवारी देऊ नये, असा प्रतिवाद वासनिक यांनी मोहन प्रकाश यांना केला. त्यावरून उभय नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. परस्परांना महाराष्ट्राचे किती ‘ज्ञान’ आहे, इथपर्यंत ही खडाजंगी पोहोचली. अखेरीस मल्लिकार्जुन खरगे यांनी मध्यस्थी करून उभय नेत्यांना शांत राहण्याची विनंती केली. उमेदवारी वाटपावरून पक्षात अनेक मतभेद आहेत. गत विधानसभा निवडणुकीत चार हजार मतांनी पराभूत झालेल्यांना उमेदवारी न देण्याचा प्रस्ताव ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवई यांनी मांडला. जे उमेदवार चार हजार मतांनी पराभूत झाले आहेत, त्यांना उमेदवारी देणे म्हणजे ती जागा गमावण्यासारखे असल्याचे त्या म्हणाल्या. त्यावर बैठकीतील सदस्यांचे एकमत झाले. याशिवाय २००९ च्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या उमेदवारास यंदा संधी देऊ नये, यावरदेखील काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसची उमेदवार निश्चितीची पारंपरिक प्रक्रिया राहुल गांधी यांच्यामुळे मोडीत निघाली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा भर आहे. केंद्रीय निवडणूक समितीने निश्चित केलेली यादी अंतिम मंजुरीसाठी राहुल गांधी यांच्याकडेच पाठवली जाणार आहे.