शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबतच्या जागावाटपाच्या मुद्द्यावर आणखी ताठर भूमिका घेतली असून, यापुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपच्या कोणत्याही नेत्याला भेटणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. भाजपच्या कोणत्याही नेत्याला यापुढे जागावाटपाबाबत चर्चा करायची असेल, तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे इतर ज्येष्ठ नेते त्यांची भेट घेतील. मात्र, उद्धव ठाकरे भाजपच्या कोणत्याही नेत्याला भेटणार नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. शिवसेनेने जागावाटपाचा अंतिम प्रस्ताव रविवारी भाजपपुढे ठेवला आहे. त्यामुळे याबद्दल आणखी चर्चा करण्यात उद्धव ठाकरे यांना काहीही स्वारस्य नसल्याचे समजते. दरम्यान, यासंदर्भात पक्षाने अधिकृतपणे कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
शिवसेनेने भाजपपुढे ११९ जागांचा प्रस्ताव रविवारी ठेवला होता. या प्रस्तावात शिवसेनेने स्वतःसाठी १५१ जागा ठेवल्या असून, मित्रपक्षांना १८ जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रस्तावात भाजपकडील नऊ जागा शिवसेना देईल, त्या भाजपला घ्याव्या लागतील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हा संपूर्ण प्रस्तावच भाजपने थेटपणे फेटाळला आहे.
शिवसेना १४०, भाजप १३० आणि घटकपक्षांना १८ जागा असा प्रस्ताव भाजपने शनिवारच्या बैठकीत ठेवला होता. मात्र, शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळला होता. आपण कोणत्याही स्थितीत १५१ जागा लढविणार असल्याचे शिवसेनेने आपला अंतिम प्रस्ताव देताना स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Sep 2014 रोजी प्रकाशित
भाजप नेत्यांशी चर्चेस उद्धव ठाकरे अनुत्सुक
शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबतच्या जागावाटपाच्या मुद्द्यावर आणखी ताठर भूमिका घेतली असून, यापुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपच्या कोणत्याही नेत्याला भेटणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

First published on: 22-09-2014 at 11:34 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray may not meet bjp leaders