भाजपने केवळ शिवसेनेशी युती नाही तोडली तर हिंदूंशी नाते तोडले आहे. आता हिंदूंचा घंटानाद काय असतो ते विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ.. आता मी मुख्यमंत्री होऊनच दाखवणार, आडवा येईल त्याला आडवे करणार, असा निर्धार व्यक्त करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीफुटीनंतर झालेल्या शिवसेनेच्या पहिल्या जाहीर सभेत प्रचाराचे रणशिंग फुंकले.
लाट कशाला म्हणतात ते आता शिवसैनिक दाखवून देतील, असे भाजपला खडसावून सांगताना शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सांगतील त्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवेन, असे आव्हानही उद्धव यांनी जाहीरपणे दिले.
महालक्ष्मी रेसकोर्सच्या आवारात शनिवारी रात्री शिवसेनेच्या पहिल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी २५ वर्षांची युती तोडल्याबद्दल भाजपला जबाबदार धरले. महाजन, अडवाणी, अटलजी, मुंडे यांची आता आठवण येते. आता समोरच्या पक्षात त्या पातळीचा नेता दिसत नाही, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. महाजन-मुंडे कुटुंबांशी असलेले संबंध यापुढेही जपणार. पंकजा आणि प्रीतम या दोघी आपल्या बहिणी असल्याने त्यांच्याविरोधात सेना निवडणूक लढणार नाही, असेही उद्धव यांनी जाहीर केले. नरेंद्र मोदींशी आपले भांडण नाही. त्यांना लोकसभा निवडणुकीत आम्ही साथ दिली, पण साथ दिल्यावर जर लाथ मिळणार असेल तर छत्रपती शिवरायांची साथ सेनेला कशी असते हे या निवडणुकीत दाखवून देऊ, असेही त्यांनी सुनावले. शिवसेना आपल्या सर्व जागा भाजपला द्यायला तयार आहे, पण त्याआधी कर्नाटकाने व्यापलेली महाराष्ट्राची भूमी परत मिळवून द्या, असे आव्हान देत, दोनचार जागांसाठी युती तोडणारा भाजप हा कर्मदरिद्री पक्ष आहे, असा टोलाही त्यांनी मारला.
उमेदवारी न मिळाल्याने काही नाराज शिवसैनिक भाजपला जाऊन मिळत असल्याबद्दल उद्धव यांनी खंत व्यक्त केली. ते आपल्याला संपवायला निघाले आहेत. तुमच्यासाठी मी छातीवर वार झेलण्यास निघालो आहे, कृपा करून पाठीत वार करू नका, असे भावनिक आवाहनही उद्धव यांनी नाराज शिवसैनिकांना केले.
*मांजर समजून तुम्ही ज्याच्या गळ्यात घंटा बांधली, तो वाघ आहे!
*जेवढे हत्ती सोडायचे तेवढे महाराष्ट्रात सोडा, शिवसैनिक त्यांच्या सोंडा कापतील.
*हव्या तितक्या जागा भाजपला सोडायला, शिवसेना म्हणजे गोडाऊन नाही.
*भाजपने युती नव्हे, हिंदूत्वाशी नाते तोडले. देशातील हिंदू तुम्हाला माफ करणार नाहीत.
*आज मुंडे महाजन असते, तर ही वेळ आली नसती.
*रामदास आठवले सोबत आले, तर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देतो.
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2014 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्री होऊनच दाखवणार!
भाजपने केवळ शिवसेनेशी युती नाही तोडली तर हिंदूंशी नाते तोडले आहे. आता हिंदूंचा घंटानाद काय असतो ते विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ..

First published on: 28-09-2014 at 02:41 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will be cm says uddhav thackeray