29 September 2020

News Flash

जातिवादाचा ‘पराभव’?

जातिवादाचा पराभव झाला आणि विकास विजयी ठरला.

गुजरात निवडणुकीचा निकाल आल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया होती, जातिवादाचा पराभव झाला आणि विकास विजयी ठरला. त्यांची ही प्रतिक्रिया मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य आणि जिग्नेश-अल्पेश-हार्दकि या तिकडीने उभ्या केलेल्या कडव्या आव्हानाच्या पाश्र्वभूमीवरच समजून घ्यावी लागते. खरे तर अय्यर यांनी मोदींना उद्देशून ते नीच-जातीय असल्याचा उल्लेख कुठेही केलेला नव्हता. त्यांनी तसा उल्लेख केला असे जे मोदींचे म्हणणे आहे तो शुद्ध कांगावा होता. जनतेची सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा तो प्रयत्न अत्यंत केविलवाणा होता. अय्यर यांनी जर खरोखरच तसे वक्तव्य केले असते तर ब्राह्मणी श्रेष्ठत्वाच्या मिथ्या धारणेतून उगम पावलेला उच्चजातीय दंभ म्हणून त्यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेताही आला असता. पण काँग्रेसने अय्यर यांना नाहकच बळीचा बकरा बनवले. मोदींनी अय्यर यांच्या वक्तव्याचे निमित्त करून व्हिक्टिम-कार्ड खेळण्याची आयतीच चालून आलेली संधी साधली. यानिमित्ताने मोदींनी हिंदू-मुस्लीम जाती-कार्डदेखील खेळून घेतले. त्यांनी असाही कांगावा केला की उच्चनीचतेची परंपरा आपली नाही, मोगलांची (सूचकार्थाने मुसलमानांची) आहे. अशा एक ना अनेक क्ऌप्त्या वापरून मोदींनी आपल्या गृहराज्यातील पराभवाची नामुष्की टाळली; पण पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा मात्र पार रसातळाला नेऊन ठेवली. अय्यर यांच्या वक्तव्याचे निमित्त करून मोदी जर जातिवादाच्या विरोधात लटका आक्रोश करत असतील तर त्यांची ही राजकीय खेळी नीटपणे समजून घ्यायला हवी. स्वत मोदी हे धर्माने हिंदू आहेत. त्यांना त्यांची जातीय ओळख त्यांचा जन्म ज्या जातीत झाला तिथून म्हणजेच आई-वडिलांकडून मिळाली. हिंदू धर्मात जातीची ओळख एकदा चिकटली की ती आजन्म सोबत असते. जातीची ओळख पुसून टाकता येत नाही. जातीच्या ओळखीसोबतच त्या त्या जातीला आणि जातीसदस्यांना जातीची एक सुनिश्चित पायरी प्राप्त होते. जातीची ती पायरी म्हणजे त्या त्या जातीसदस्यांना जन्मजात प्राप्त झालेल्या सामाजिक दर्जाची निदर्शक असते. जन्मानुसार पायरी व पायरीनुसारच दर्जा हे जातीच्या उतरंडीचे अपरिवर्तनीय सूत्र आहे. मृत्यूनंतरही जात पिच्छा सोडत नाही. हिंदू धर्मात राहून जातीचा त्याग केवळ असंभवनीय आहे आणि ब्राह्मणी धर्मशास्त्रांच्या परंपरेनुसार जातीचा त्याग धर्मनिषिद्ध मानला जातो. अर्थात हिंदू धर्म आणि जातव्यवस्था एकजीव आणि अभिन्न आहे. हिंदू धर्म म्हणजेच जात आणि जात म्हणजेच हिंदू धर्म हीच वास्तविकता आहे. मोदी शूद्र (अर्थात अन्य मागासवर्गीय) जातीमधून आलेत, असे त्यांचे म्हणणे आहे. शूद्र जाती जर ब्राह्मणी धर्मशास्त्रांनुसार नीच मानल्या गेल्या असतील तर मोदींनी अय्यर यांच्याऐवजी वर्णजातीसमर्थक ब्राह्मणी-मूल्यपरंपरेचा, वर्णजातीसमर्थक धर्मशास्त्रांचा, वर्णजातसमर्थक प्रतीकांचा आणि वर्णजातव्यवस्थेचाही निषेध करायला हवा होता. पण तसे काहीही न करता ते जातीच्या मुद्दय़ावरून मतदारांच्या मनात स्वतविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा स्वस्तातला मार्ग निवडताना दिसतात.

वस्तुस्थिती ही आहे की स्वत मोदीच वर्णजातव्यवस्थेचे, वर्णजातवर्चस्ववादी मूल्य-परंपरेचे आणि ब्राह्मणी धर्मशास्त्रांचे कडवे समर्थक आहेत. त्यांनी अनेकदा वर्णजातव्यवस्थेची एक आदर्श समाजव्यवस्था म्हणून भलावण केलेली आहे. त्या त्या जातींनी त्यांच्याकरिता नेमून दिलेली कामे निमूटपणे करणे म्हणजे ईश्वराची सेवा होय असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची ती भूमिका उघडपणे वर्णजातव्यवस्थेचे मिथ्या उदात्तीकरण करणारी आहे. जातीचा निर्देश जर त्यांना खरोखरच इतका अपमानास्पद वाटत असेल तर त्यांनी जातीअंताचा कायदा संसदेत आणायला हवा. जातिव्यवस्था कायद्याने निषिद्ध असल्याचे घोषित करावे. जातीशी निगडित सर्व प्रकारचे खासगी, कौटुंबिक वा सार्वजनिक व्यवहार बेकायदेशीर ठरवावेत. मोदी यापकी काहीही करणार नाहीत आणि ते तसे करूही शकणार नाहीत.

ज्या धर्मग्रंथांनी, शास्त्र-पुराणांनी वर्ण-जातव्यवस्थेचे समर्थन केले ती सर्वच्या सर्व तुर्क-मुघलपूर्व काळात रचली गेलेली आहेत. अरब-तुर्क-मुघल राजवटींच्या कित्येक शतके अगोदरपासूनच भारतीय उपखंडात वर्ण-जातव्यवस्था सर्वदूर पसरलेली होती. त्यामुळे उच्चनीचतेला मानणारा जातिवाद आपल्या परंपरेचा भाग नसून ती मुघलांची परंपरा होय असे जे मोदींचे म्हणणे आहे ते तितकेच हास्यास्पद आहे, जितकी त्यांची मुंबई येथील सायन्स काँग्रेसमधील विधाने हास्यास्पद होती. तिथे त्यांनी प्राचीन भारतात प्लास्टिक सर्जरीचे तंत्र अस्तित्वात होते हे सांगत असताना चक्क पौराणिक मिथकांचा हवाला दिला होता. जातीचा संबंध मुघलांशी जोडून त्यांनी गुजरातची निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लीम अशा धार्मिक वळणावर नेण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने त्यांनी हिंदू मतदारांना धार्मिक आवाहन केले. संकुचित राजकीय लाभाकरिता धर्माचा वापर करणे म्हणजे घटनाद्रोह होय. म्हणूनच गुजरात निवडणुकीत भाजपचा विजय म्हणजे जातिवादाचा पराभव नसून तो जातवर्चस्ववादी, धर्माध शक्तींचा विजय आहे असाच निष्कर्ष काढावा लागतो.

जिग्नेश-अल्पेश-हार्दकि हे तिघेही आपापल्या जातिसमूहाच्या संघर्षांत्मक राजकारणातून पुढे आले आहेत. जिग्नेश मेवानी हा अगदी उघडपणे आंबेडकरी प्रेरणा घेऊनच राजकारणात उतरला आहे. त्याने गुजरातमधील जातीय अत्याचारांच्या विरोधात जी लढाई सुरू केली ती देशभरातील मुक्तिगामी राजकारणाला दिशा देणारी लढाई आहे. त्याचे राजकारण जातिवादाचे नसून ते जातवर्गोच्छेदक, समतागामी आणि मुक्तिगामी जाणिवेचे आहे.

दलित अत्याचाराच्या प्रश्नाला वाचा फोडणे किंवा जातवर्गोच्छेदक प्रेरणेचे राजकारण करणे याला जर कुणी जातिवाद म्हणत असेल तर ते गैर आहे. अल्पेश ठाकोर हा गुजरातमधील ओबीसींच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक उन्नतीच्या आकांक्षांचा प्रतिनिधी आहे. त्याच्या राजकारणाची प्रेरणा स्पष्टपणे वर्गोन्नत्तीची आहे. हार्दकि पटेल ज्या पाटीदारांचे प्रतिनिधित्व करतो आहे, तो एक वरचढ शेतकरी जातिसमूह असला तरी तो एकसाची नाही. तो समूह गंभीररीत्या आंतरिक वर्गभेदांनी पोखरला गेलेला आहे. हार्दकिचा पाठीराखा असलेला वरचढ शेतकरी जातवर्गातून आलेल्या शेतकरी तरुणांचा जो वर्ग आहे तो शेतीक्षेत्रातील व्यापक अरिष्टामुळे त्रस्त झालेला आणि वैफल्यात लोटला गेलेला आहे. तसेच त्यापकी एक मोठा हिस्सा निम्नवर्गातील अर्धशिक्षित, बेरोजगार आणि भणंग तरुणांचा आहे. अल्पेश व हार्दकि यांचे आंदोलन मुख्यत्वे आरक्षणकेंद्री आहे. ते ज्या जातिसमूहांचे प्रतिनिधित्व करीत आहेत ते जातिसमूह सामाजिक-आर्थिक न्यायासाठी आसुसलेले आहेत. आरक्षणाची त्यांची आग्रही भूमिका लक्षात घेता त्यांच्या राजकारणाची मुख्य प्रेरणा वर्गोन्नतीचीच आहे हे लक्षात येते.

गुजरातच्या या तरुण तिकडीने जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते सर्वच प्रश्न आत्यंतिक मागास स्वरूपाच्या जातिव्यवस्थाक अर्थोत्पादनसंबंधांनी जन्मास घातलेल्या व्यापक अशा सामाजिक-आर्थिक अरिष्टातून उगम पावले आहेत. शोषित-कष्टकरी-उत्पादक जातिसमूहांच्या आकांक्षांना आणि त्यांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित भौतिक प्रश्नांना वाचा फोडणे म्हणजे जातिवाद असू शकत नाही. जातिव्यवस्थेचे बळी असणारांनाच जातिवादाचे समर्थक ठरवणे ही संघ-भाजपला साजेशी खासी फॅसिस्ट रणनीती आहे. जिग्नेश-अल्पेश-हार्दकि या तिघांच्याही राजकारणाचा जनाधार जरी वरकरणी जातीय वाटत असला तरी त्यांच्या राजकारणाचा वैचारिक / सद्धांतिक पाया जातिवादाचा किंवा जातवर्चस्ववादाचा मुळीच नाही.

उलट संघ-भाजपचा जनाधार जरी वरकरणी बहुजातीय स्वरूपाचा वाटत असला तरी त्यांच्या राजकारणाचा वैचारिक-सद्धांतिक पाया सुरुवातीपासूनच वर्णजातवर्चस्ववादी, भांडवली आणि ब्राह्मणीच राहिलेला आहे. याची साक्ष आपणास मोदींच्या मंत्रिमंडळातील त्यांचे एक विश्वासू सहकारी अनंत हेगडे यांच्या वक्तव्यातून मिळते. आम्ही येथे संविधान बदलण्यासाठीच आलो आहोत, हे विधान करताना धर्म-जातींची तरफदारी हेगडे यांनी केली आहे.  भाजप सरकार अशा प्रवृत्तींना जर प्रोत्साहन आणि संरक्षण देणार असेल तर स्पष्ट आहे की त्यांचे सर्वाचे संगनमत आहे.

देवेंद्र इंगळे

ingledevs@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2018 3:06 am

Web Title: alpesh thakor jignesh mevani and hardik patel vs bjp
Next Stories
1 आदिवासींची पुन्हा फरपट?
2 विरोध-विकास-वाद : उत्क्रांती: विकासाची एक पूर्वपीठिका
3 विकासाचे राजकारण : ‘अंमल’ आणि त्याची ‘बजावणी’!
Just Now!
X